लोहगडावरील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात दररोज नवी माहिती समोर येत आहे. 18 जून रोजी केतन अग्रवालचा मृत्यू झाला होता, पोलिस तपासात त्याची होणारी बायको सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतनने कट रचून ही हत्या केल्याचे समोर आले आहे. या प्रकणात सध्या कसून चौकशी केली जात आहे, विविध ठिकाणांवरून पुरावे गोळा केले जात आहेत. अशातच आज सियाचा भाऊ साहिलची या प्रकरणात कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीतून काही धक्कादायक माहिती समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सियाच्या भावाची कसून चौकशी
केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात आज साहिलची तब्बल 10 तास चौकशी करण्यात आली. यावेळी त्याला वेगवेगळे प्रश्न विचारण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिलने आपल्या जबाबात सांगितले की, सियाने त्याला किंवा कुटुंबातील इतर कोणालाही तिला हे लग्न करायचे नाही, असे कधीच सांगितले नव्हते. साहिलने पुढे असेही म्हटले की, जर सियाने कुटुंबाला केतनशी लग्न करायचे नसल्याचे सांगितले असते, तर कुटुंबाने हे लग्न पुढे नेले नसते.
काय म्हणाला साहिल?
सध्या सुरू असलेल्या तपासाअंतर्गत पोलिसांकडून कुटुंबातील सदस्यांचे जबाब नोंदविण्याचे काम सुरू आहे. साहिलच्या जबाबानुसार, केतनसोबतच्या लग्नाबाबत सियाची कोणतीही हरकत असल्याची माहिती कुटुंबाला कधीच देण्यात आली नव्हती. तसेच सियाच्या कुटुंबाची चेतनसोबत तिच्या लग्नाला देखील कोणतीही हरकत नव्हती, असेही समोर आले आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे.
नेमकं प्रकरण काय?
18 जून रोजी पुण्यातील लोहगड किल्ल्यावर केतन अग्रवालला दरीत ढकलून त्याचा खून केल्याचे समोर आले होते. डोंगरावरून पाय घसरून पडल्याने अपघाती मृत्यूची माहिती सुरुवातीला समोर आली होती. मात्र संशयानंतर या प्रकरणाचा पोलिसांनी तपास केला असता केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांनी मिळून या घटनेचा कट रचल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना अटक केली आहे. सध्या दोघांनाही 29 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
नोव्हेंबरमध्ये होणार होते लग्न
केतन अग्रवाल आणि सिया गोयल यांचा साखरपुडा काही महिन्यांपूर्वी झाला होता आणि नोव्हेंबर महिन्यात त्यांचे लग्न होणार होते. यासाठीच्या तयारीलाही सुरुवात करण्यात आली होती. मात्र त्यापूर्वीच सिया आणि चेतनने केतनचा कट रचून खून केल्याचे समोर आले आहे. आता पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.