एकनाथ शिंदे Image Credit source: टीव्ही 9 मराठी
काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडल्याचं पहायला मिळालं. 6 खासदारांनी पक्षातून बंडखोरी केली. त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली. या सहा खासदारांपैकी दोन खासदारांना केंद्रात मंत्रिपद मिळणार आहे, अशी जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. परभणी लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय जाधव आणि धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांची मंत्रिपदी वर्णी लागणार असल्याची माहिती देखील समोर आली होती. मात्र आता यामध्ये मोठा ट्विस्ट आल्याचा पहायला मिळत आहे. ओमराजे निंबाळकर यांना धक्का बसण्याची शक्यता आहे.
शिवसेना ठाकरे गटातील 6 खासदारांनी बंडखोरी केली, शिवसेना ठाकरे गटात एकून 9 खासदार आहेत, त्यापैकी 6 जणांनी बंडखोरी केल्यामुळे या खासदारांची संख्या दोन तृतियांश झाली आणि ऑपरेशन टायगर यशस्वी पार पडलं. परंतु जेव्हा खासदारांनी बंडखोरी केली होती, त्यावेळी ऐनवेळी ओमराजे निंबाळकर यांनी तळ्यात -मळ्यात भूमिका घेतल्यानं ऑपरेशन टायगर संकटात सापडलं होतं. आपण अजूनही पक्षप्रवेशाबाबत कोणताही निर्णय घेतला नाही, मी आधी माझ्या मतदारसंघात जाईल, कार्यकर्त्यांशी चर्चा करेल आणि त्यानंतर मी माझी भूमिका जाहीर करेल असं त्यावेळी ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलं होतं.
जर ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश केला नसता तर पक्ष सोडलेल्या खासदारांची संख्या पाचच होत असल्यानं ऑपरेशन टायगर संकटात सापडलं असतं, परंतु ओमराजे निंबाळकर यांचं मन वळवण्यात एकनाथ शिंदे यांना यश आलं आणि ओमराजे निंबाळकर यांच्यासह सहा खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. तेव्हापासूनच ओमराजे निंबाळकर यांना मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा आहे. परंतु आता ओमराजे यांना धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण मंत्रिपदासाठी खासदार श्रीरंग बारणे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. त्यावर श्रीरंग बारणे यांची प्रतिक्रिया देखील समोर आली आहे. दरम्यान मंत्रिपदासाठी श्रीकांत शिंदे यांचं नाव देखील चर्चेत आहे. जर श्रीरंग बारणे आणि श्रीकांत शिंदे यांना मंत्रिपद मिळालं तर संजय जाधव आणि ओराजे निंबाळकर यांची मंत्रिपदाची संधी हुकण्याची शक्यता आहे.
नेमकं काय म्हणाले बारणे?
श्रीरंग बारणे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे, अशी चर्चा आता सुरू झाली आहे, यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, केंद्रीय मंत्रिमंडळात कोणाला स्थान द्यायचं हे शिंदे साहेब ठरवतात. शिंदे साहेब कार्यकर्त्याला न्याय देतात, असं त्यांनी यावेळी म्हटलं आहे. दरम्यान फुटलेले खासदार भाजपमध्येही प्रवेश करू शकत होते, मग त्यांना तुमच्याकडे का घेण्यात आलं असा प्रश्नही त्यांना यावेळी विचारण्यात आला. जे सहा खासदार आहेत. ते मुळात बाळासाहेबांच्या विचाराने कार्य करत आहेत. ते पक्ष प्रमुखाला भेटू शकत नव्हते, त्यांच्या मतदारसंघात विकास कार्य होत नव्हतं, म्हणून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला, असं यावेळी बारणे यांनी म्हटलं आहे.