ऑपरेशन टायगर फेल होणार? ओमराजेंच्या भेटीनंतर वरुण देसाईंनी दिली प्रतिक्रिया, ज्या विषयावर… – Marathi News | Operation Tiger to Fail Varun Sardesai Reacts After Midnight Meeting With Omraje Nimbalkar


महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा तीव्र चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा जोरात आहे.दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करण्याची तयारी ओमराजे निंबाळकर करत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, याच दरम्यान पुण्यात मध्यरात्री अत्यंत नाट्यमय घडामोडी घडल्या.

पुण्यातील मध्यरात्रीची हायव्होल्टेज भेट

ठाकरे गटाने ओमराजे निंबाळकर यांना मनधरणीसाठी मोठा प्रयत्न केला. पक्ष सचिव वरुण सरदेसाई आणि आमदार कैलास पाटील हे दोघे मध्यरात्री १ वाजता अचानक ओमराजे निंबाळकर यांच्या पुण्यातील निवासस्थानी पोहोचले. उद्धव ठाकरे यांचा महत्त्वाचा निरोप घेऊन दोन्ही नेते त्यांच्या घरी गेल्याने राजकीय वर्तुळात सस्पेन्स वाढला आहे.

वरुण देसाईंनी मांडली स्पष्ट भूमिका

वरुण सरदेसाई यांनी थेट भूमिका स्पष्ट करण्यास टाळाटाळ केली. ते म्हणाले, “ओम दादांबाबत जो निर्णय झाला, तो अनपेक्षित होता. त्यांच्या संपूर्ण परिवाराला मोठा धक्का बसला आहे. यावर आम्ही चर्चा केली. ते आजही शिवसेना (ठाकरे गट) च्या चिन्हावर निवडून आलेले खासदार आहेत. त्यांनी पहिल्यांदा आमदारकी जिंकली आणि नंतर तीनवेळा खासदारकी मिळवली. आम्ही पक्ष सचिव म्हणून त्यांची भेट घेतली आणि काही अंतर्गत मुद्द्यांवर चर्चा केली. मात्र, सर्व गोष्टी माध्यमांसमोर सांगणे योग्य नाही. जर सर्व उघड करायचे असते, तर आम्ही मध्यरात्री भेटलो नसतो.”

कैलास पाटील काय म्हणाले?

आमदार कैलास पाटील यांनी मात्र मनधरणीचे प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, “गेल्या २० वर्षांपासून ओमराजे ज्या गोष्टींसाठी संघर्ष करत आहेत, त्यांना न्याय मिळाला नाही, अशी त्यांची भावना आहे. तरीही आम्ही प्रयत्न सोडलेले नाहीत. आम्ही उद्धव ठाकरे साहेबांचा निरोप घेऊन त्यांच्याकडे आलो होतो. उद्धव साहेबांबद्दल ओमराजे यांच्या मनात आजही आदरभावना कायम आहे. त्यामुळे ते पक्षातच राहतील, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. साहेबांचा निरोप ऐकल्यानंतर ओम दादांनी ‘मला उद्याचा एक दिवस द्या, त्यानंतर मी माझा निर्णय सांगतो’ असे सांगितले आहे. त्यामुळे पुढचे २४ तास अत्यंत महत्त्वाचे आहेत.”



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *