Jayant Patil : पोलीस धमकी देतात याचा अर्थ त्यांना ड्रग्स सहज उपलब्ध होतं का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा पोलिसांचा ताबडतोब बंदोबस्त केला पाहिजे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी व्यक्त केले. आज हे आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना घाबरवत आहेत, उद्या सामान्य माणसाला अडकवण्यासाठीही असंच करतील, अशी भीतीजयंत पाटील यांनी व्यक्त केली. बुधवारी मुंबई येथे झालेल्या आंदोलनादरम्यानचा पोलिस कर्मचाऱ्याचा विद्यार्थ्यांना धमकावणारा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडिओव रजयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सामान्य माणसाला अडकवण्यासाठीही असंच काही करतील
जयंत पाटील म्हणाले की, मुंबईतील एक पोलीस कर्मचाऱ्याने लहान आंदोलकांना धमकावणारा व्हिडिओ प्रसारित झाला आहे. या पोलिस कर्मचाऱ्यांकडे ड्रग्स येतात कुठून? पोलिस धमकी देतात याचा अर्थ त्यांना ड्रग्स सहज उपलब्ध होते. अशा पोलिसांचा ताबडतोब बंदोबस्त केला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. तसेच मागील पावसाळी अधिवेशनात आपण वाढत्या ड्रग्सबाबत सभागृहात मुद्दा उपस्थित केला होता. काही पोलीस या ड्रग्स माफीयांकडून हफ्ते घेतात व हा काही पोलिसांचा सोर्स ऑफ इन्कम झाला आहे असंही मी म्हटलं होतं असं त्यांनी नमूद केले. आज हे आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना घाबरवत आहेत, उद्या सामान्य माणसाला अडकवण्यासाठीही असंच काही करतील अशी भीती त्यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली आहे की अशा घटनांमुळे लोकांचा पोलीस यंत्रणेवर गैरविश्वास निर्माण होतोय. त्यामुळं वेळीच अशा कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे असे जयंत पाटील म्हणाले.
नेमकं प्रकरण काय?
मुंबई पोलिसांच्या एका कर्मचाऱ्याचा धमकीचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झालाय. व्हिडिओमध्ये एक पोलीस तरुणाला धमकावताना दिसत असून, पुन्हा दिसलास तर 50 ग्रॅमची पावडर टाकेन असे कथित वक्तव्य करताना तो ऐकू येत असल्याचा दावा केला जात आहे. या घटनेनंतर राजकीय वर्तुळातही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. आज झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या व्हायरल व्हिडिओचा उल्लेख करत मुंबई पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. त्यांनी सांगितले की, त्यांच्या मोबाईलवर हा व्हिडिओ आला असून, एका टॅक्सीतील तरुणांना पोलीस अशा प्रकारे धमकावत असल्याचे त्यात दिसत आहे. राज ठाकरे म्हणाले, की, 50 ग्रॅमची पावडर टाकेन, असे म्हणणारा पोलीस स्वतः ड्रग्स सप्लायर आहे का? पोलिसांकडे अशी पावडर कुठून आली? हे नेमकं काय सुरू आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुंबई पोलिसांनी संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई केली आहे. पवन सांगळे असे त्या पोलिसाचे नाव असून, तो सायन पोलीस ठाण्यात चालक म्हणून कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. व्हायरल व्हिडिओनंतर त्याला निलंबित करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया