अब्दुल सत्तार आधी नाराज, आता थेट म्हणाले मी काँग्रेसच्या… शिवसेनेत मोठी खळबळ, चर्चेला उधाण! – Marathi News | Abdul sattar said will meet to eknath shinde cant say what will happen in future after congress leader meeting


Abdul Sattar : विधानपरिषदेच्या निवडणुकीची चांगलीच रणधुमाळी रंगली आहे. या निवडणुकीत महायुतीमध्ये अनेक ठिकाणी बंडखोरी झाल्याचे पाहायला मिळाले आहे. छत्रपती संभाजी नगर-जालना या मतदारसंघात माजी मंत्री तथा आमदार अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव समीर सत्तार यांनी पक्षादेश झुगारून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यानंतर अब्दुल सत्तार यांनी समोर येत भाजपातील स्थानिक नेतृत्त्वावर गंभीर आरोप केले आहेत. शिवसेनेला संपवण्याचे काम केले जात आहे, असे सत्तार म्हणाले आहेत. दरम्यान, त्यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना केलेल्या एका सूचक विधानाची चर्चा होत आहे. या विधानामुळे सत्तार यांच्या मनात नेमकं काय चाललंय? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

नगरसेवकांना निधी मिळत नाही

टीव्ही 9 मराठीशी बोलताना सत्तार म्हणाले की, मी वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहे. त्यांच्याशी चर्चा करणार आहे. समीर सत्तार आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार की नाही, याबाबत मी सांगू शकत नाही. कारण अर्ज दाखल करायला मी त्यांच्यासोबत नव्हतो. मी फॉर्मदेखील भरलेला नाही. नगरसेवकांना निधी मिळत नाही. नगरपालिका चालवणे अवघड झाले आहे. अशा परिस्थितीत त्यांना त्यांचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे.

सत्तार यांच्या मनात नेमके काय आहे?

मी वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहे. दोन दिवसात याबाबतचे चित्र स्पष्ट होईल. मी उद्या जाऊन ही भेट घेईल. त्यांच्यापुढे व्यथा मांडणार. ते जर आम्हाला तुमची गरज नाहीये, असे म्हणाले तर मग ठीक आहे, असे सूचक विधानही सत्तार यांनी केले आहे. या विधानामुळे सत्तार यांच्या मनात नेमके काय आहे? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांनी नुकतेच सत्तार यांची भेट घेतली होती. मी काँग्रेसच्या खासदाराची भेट घेतलेली नाही. काँग्रेसचा खासदार माझ्या घरी आला होता. माझ्याकडे अनेक लोक आले. अनेक नगराध्यक्ष येत आहेत. गेल्या 42 वर्षांपासून मी राजकारणात आहेत. मी माझी भावना मांडली आहे. त्यामुळे लोक मला माझी भेट घेत आहेत. मी त्यांना चहा पाजतो. चर्चा करून ते जातात, असे सत्तार म्हणाले. काँग्रेसच्या लोकांना मी जवळचा वाटत असेल तर त्याला मी काही करू शकत नाही, असे सूचक विधान सत्तार म्हणाले.

भविष्यात काय होईल हे मी सांगू शकत नाही

तसेच, मी एकनाथ शिंदे साहेबांचा कार्यकर्ता आहे. भविष्यात काय होईल हे मी सांगू शकत नाही. त्यावर बोलण्याचा अधिकार हा भविष्यालाच आहे. मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मोहोदयांचा आदर करतो. स्थानिक पातळीवर होत असलेला अनादर यावर मी बोलत आहे. मी फार मोठा पदाधिकारी नाही. मी सिल्लोड-सोयगाव मतदारसंघापुरता राजकारण करणारा पुढारी आहे. आमचा खारीचा वाटा आहे. आमच्यावर अन्याय होत असेल तर त्याची जाणीव वरिष्ठ नेत्यांना करून द्यावी, असे माझ्या मनात होते. तेच मी करतो आहे, असेही सत्तार यांनी स्पष्ट केले.

पाहा व्हिडीओ :



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *