PM Kisan E-KYC : 30 जूनपर्यंत PM किसानची ई केवायसी करा, अन्यथा पैसे बंद, 23 व्या हप्त्याचे 2000 रुपये शेतकऱ्यांना कधी मिळणार?


PM Kisan E-KYC मुंबई : पीएम किसान म्हणजेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी  योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी केंद्र व राज्य शासनाने वार्षिक ई-केवायसी प्रमाणीकरण पूर्ण करणे बंधनकारक केले आहे. राज्यातील शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीचे 2000 रुपये मिळवायचे असल्यास त्यांनी ई-केवायसी 30 जूनपूर्वी करुन घ्यावी.  ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी 30 जून 2026 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नाही अशा शेतकऱ्यांनी त्वरीत ई-केवायसी करुन घेणे आवश्यक आहे.

ई केवायसी कशी करायची?

पीएम किसान सन्मान निधी योजना 2019 पासून सुरु करण्यात आली आहे. या योजनेतील शेतकऱ्यांनी लाभ सुरु ठेवण्यासाठी ई – केवायसी पूर्ण करणं आवश्यक आहे. पीएम किसान सनन्मान निधी योजनेतून शेतकऱ्यांना एका वर्षात 6000 रुपये तीन समान हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना दिले जातात. पीएम किसान सन्मान निधीच्या  लाभार्थी शेतकऱ्यांना बायोमॅट्रिक आणि फेस ऑथेंटिकेशन या दोन पद्धतींनी प्रमाणीकरण पूर्ण करता येईल. 

सीएससी केंद्र आणि मोबाईलवरुन ई-केवायसी

पीएम किसानची ई केवायसी करायची असल्यास शेतकरी बायोमॅट्रिक प्रमाणीकरणाद्वारे ई-केवायसी करण्यासाठीजवळच्या सामायिक सुविधा केंद्राला (CSC Center) भेट देऊन प्रक्रिया पूर्ण करु शकतात. तसेच शेतकरी स्वतःच्या मोबाईलवर ‘पीएम-किसान’ मोबाईल अॅप डाऊनलोड करून स्वतःच्या चेहऱ्याव्दारे ई-केवायसी पूर्ण करू शकतील. ही केवायसी पूर्ण करण्याची मुदत 30 जूनपर्यंत आहे. 

दरम्यान, वृद्ध, आजारी किंवा दिव्यांग लाभार्थ्यांना हालचाली संबंधी अडचणी आहेत आणि केंद्रावर जाणे शक्य नाही, त्यांच्यासाठी प्रशासनाकडून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.  गाव पातळीवरील ग्रामस्तरीय नोडल अधिकारी व क्षेत्रीय कर्मचारी अशा शेतकऱ्यांकडे वैयक्तिकरीत्या लक्ष देऊन फेस ऑथेंटिकेशनद्वारे त्यांची ई-केवायसी पूर्ण करण्यात मदत करतील अशी माहिती आहे. 

शेतकऱ्यांच्या खात्यात 22 हप्त्यांची रक्कम जमा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एनडीए सरकारकडून 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ही योजना जाहीर करण्यात आली होती. फेब्रुवारी 2019 पासून मार्च 2026 पर्यंत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 22 हप्त्यांची रक्कम जमा करण्यात आली आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 22 व्या हप्त्याची रक्कम 13 मार्चला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. आता पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 23 व्या हप्त्याची रक्कम कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे. सर्वसाधारणपणे पीएम किसानच्या दोन हप्त्यांमध्ये चार महिन्यांचा कालावधी ठेवला जातो. पेरणीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी 23 व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. 

 

हेदेखील वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *