Yashasvi Jaiswal : यशस्वी जयस्वालनं आता राजस्थान रॉयल्स सोडून दिलं पाहिजे, मुंबई इंडियन्सच्या माजी खेळाडूचा सल्ला, नव्या टीमचं नाव सुचवलं


मुंबई : आयपीएल 2026 च्या एलिमिनेटरमध्ये वैभव सूर्यवंशीनं वादळी फलंदाजी केली. 29 बॉलमध्ये वैभव सूर्यवंशीनं 97 धावांची खेळी केली.  वैभवच्या या खेळीची सर्वत्र जोरदार चर्चा आहे. मात्र, राजस्थानचा दुसरा सलामीवीर यशस्वी जयस्वाल देखील चर्चेत आहे.  यशस्वी जयस्वाल यानं 15 सामन्यांमध्ये  426 धावा केल्या आहेत. मात्र, वैभव सूर्यवंशीच्या आक्रमक फलंदाजीसमोर त्याची कामगिरी झाकोळून जातेय. आर. अश्विन यानं देखील काही दिवसांपूर्वी  यशस्वी जयस्वालच्या टीममधील स्थानाला धक्का पोहोचतोय, त्याचं महत्त्व कमी होतंय, असं म्हटलं होतं. मुंबई इंडियन्सचा माजी क्रिकेटपटू अंबाती रायडू यानं यशस्वी जयस्वालला मोठा सल्ला दिला आहे. यशस्वी जयस्वालनं आता टीम बदलली पाहिजे, असं रायडूनं म्हटलं. राजस्थान रॉयल्सकडून वैभव सूर्यवंशी नेहमी अशाच प्रकारे खेळेल, नेहमी अशीच स्थिती निर्माण होईल, असं रायडूनं म्हटलं. यामुळं नव्या चर्चेला सुरुवात होताना पाहायला मिळते. एकेकाळी यशस्वी जयस्वाल राजस्थान रॉयल्सचा पोस्टर बॉय होता. आता वैभव सूर्यवंशीनं ती जागा पटकावली आहे. 

अंबाती रायडू काय म्हणाला?

अंबाती रायडू म्हणाला की, आता त्याला (यशस्वी) ला टीम बदलली पाहिजे, कारण तो नेहमी त्या व्यक्तीसोबत (वैभव सूर्यवंशी)  अशी फलंदाजी करु शकत नाही आणि दिवसेंदिवस तो बाजूला पडत जाईल. कारण, यशस्वी स्वत: एक स्टार आहे, तो दुसऱ्या टीममध्ये गेला तर स्वत:च्या जीवावर मॅच जिंकवून देईल. आता त्याला स्पेस आणि प्लॅटफॉर्मची गरज आहे, असंही अंबाती रायडूनं म्हटलं. 

अंबाती रायडू यानं आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्सचं देखील प्रतिनिधीत्व केलं आहे. अंबाती रायडून वैभव सूर्यवंशीचा उल्लेख करत म्हणाला की, हा खेळाडू नेहमीच असंच खेळत राहील आणि त्याच्या सोबत असलेल्या खेळाडूंना बाजूला करत राहील. यामुळं वैभव सूर्यवंशीसोबत एक वरिष्ठ पार्टनर असावा, जो त्याच्या यशानं आनंदी होईल, नाकी त्याच्यासोबत स्पर्धा करेल. यशस्वी जयस्वाल मुंबईचा असल्यानं त्याच्यासाठी मुंबई इंडियन्स चांगली टीम ठरेल, असंही अंबाती रायडूनं म्हटलं. 

वैभव सूर्यवंशीनं 2026 च्या आयपीएलमध्ये 15 डावांमध्ये 45.33 च्या सरासरीनं आणि 242.86 च्या स्ट्राइक रेटनं 680  धावा केल्या आहेत. या हंगामात त्यानं 55 चौकार आणि 65 षटकार मारले आहेत. तर, यशस्वी जयस्वालनं या हंगामात 15 डावात 32.76 च्या सरासरीनं 153.23 च्या स्ट्राइक रेटनं 426 धावा केल्या आहेत. यामध्ये 52 चौकार आणि 18 षटकारांचा समावेश आहे. 

दरम्यान, वैभव सूर्यवंशीनं आयपीएलच्या एलिमिनेटरच्या सामन्यात 29 बॉलमध्ये 97 धावा केल्या होत्या. या डावात त्यानं 12 षटकार मारले. वैभव सूर्यवंशीनं वीरेंद्र सेहवाग, ख्रिस गेल, शेन वॅटसन या सारख्या दिग्गजांना मागं टाकलं. 

 

हेदेखील वाचा

आणखी वाचा





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *