क्रिकेट खेळणं सोपं आहे… पण एखादी क्रिकेट टीम सांभाळणं प्रचंड कठीण काम. 2025 चा सीझन. मुंबई आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या टी20 क्रिकेट लीगचा कार्यक्रम एकाच वेळी घोषित झाला. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या एमपीएलसाठी रायगड रॉयल्स या फ्रँचायझीनं महिला आणि पुरूष अशा दोन्ही गटात टीम उतरवल्या. पण दुसरीकडे याच फ्रँचायझीनं मुंबई टी20 लीगमध्येही एक टीम विकत घेतली. ती होती मराठा रॉयल्स.
एकाच वेळी दोन स्पर्धा. एक पुण्यात आणि एक मुंबईत. ऑक्शन… सराव सामने… आणि त्यानंतर प्रत्यक्ष स्पर्धा सुरू झाली. रायगड रॉयल्स आणि मराठा रॉयल्स दोन्हीही संघांनी जबरदस्त परफॉर्म करत एमपीएल आणि मुंबई टी20 लीगच्या फायनलमध्ये धडक मारली. मराठा रॉयल्स पहिल्याच फटक्यात विजेती ठरली आणि तिकडे गहुंजे स्टेडियमवर रायगड रॉयल्स उपविजेती. या दोन्ही संघांच्या यशात एका व्यक्तीचा फार मोठा वाटा होता. ती व्यक्ती म्हणजे राजस्थान रॉयल्सचे माजी खेळाडू, महाराष्ट्राचे माजी रणजीपटू, सध्याचे महाराष्ट्र अंडर-16 सिलेक्टर आणि रायगड रॉयल्स-मराठा रॉयल्सचे सीईओ पराग मोरे.
तीन तीन टीमचं नियोजन, त्यांचं व्यवस्थापन आणि इतर सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी पराग मोरेंनी त्या सीझनमध्ये लिलया हाताळल्या. त्याचा मोठा फायदा फ्रँचायझीला झाला. यंदा मात्र महाराष्ट्र प्रीमियर लीग रद्द झाली. त्यामुळे पराग यांना मुंबई टी20 लीगकडे पूर्णपणे लक्ष केंद्रित करता आलं. त्यांनी यंदाही जोरदार मोर्चेबांधणी केली आणि महत्त्वाची बाब ही की 13 जूनच्या रात्री वानखेडे स्टेडियमवर मराठा रॉयल्सनं पुन्हा एकदा, सलग दुसऱ्यांदा मुंबई टी20 लीगची ट्रॉफी उंचावली. संघाच्या या यशात पराग मोरे यांचं योगदान खेळाडूं इतकच महत्त्वाचं ठरलं.
“एखादी कंपनी चालवायचं म्हटलं तर त्याचं एक स्ट्रक्चर असतं. पण फ्रँचायझी घ्यायची आणि त्याचं काम पाहायचं ही सगळ्यात चॅलेंजिंग गोष्ट आणि तितकीच स्ट्रेसफुलदेखील. फार कमी वेळ मिळतो तुम्हाला तयारीसाठी. टीम घेतली, ऑक्शनमधून प्लेअर्स घेतले आणि खेळायला उतरलो असं होत नाही. त्यासाठी खूप प्लॅन करावे लागतात, स्ट्रॅटेजी आखावी लागते. आणि ते सगळं व्यवस्थित जुळून आलं तरच तुमचं यश पक्कं.” – पराग मोरे, संचालक, राजस्थान रॉयल्स अकॅडमी, पुणे
खेळाडू ते क्रिकेट प्रशासक
पराग मोरे यांचा जन्म पुण्याचा. 8 जून 1985. लहानपणापासूनच क्रिकेटची आवड जोपासणाऱ्या पराग यांनी महाराष्ट्राच्या अंडर-19, अंडर-16, अंडर-19, अंडर-22 आणि अंडर-25 संघाचं प्रतिनिधित्व केलंय. 2004-05 या मोसमात त्यांनी तामिळनाडूविरुद्ध रणजी पदार्पण केलं. त्यानंतर 2008 सालच्या आयपीएलच्या पहिल्याच मोसमात राजस्थान रॉयल्सनं पराग यांना संघात घेतलं. त्या पहिल्याच सीझनमध्ये राजस्थाननं विजेतेपदाची ट्रॉफी उंचावली. पराग यांना त्या सीझनमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही पण पहिले दोन सीझन शेन वॉर्नसारख्या दिग्गजाच्या छायेत वावरल्यानं बरंच काही शिकायला मिळाल्याचं पराग सांगतात. त्याचा फायदा त्यांना पुढच्या काळात झाला.
खेळाडू म्हणून कारकीर्द पूर्णविराम दिल्यानंत पराग मोरे यांनी नवे क्रिकेटर घडवण्याकडे, युवा क्रिकेटर्सना प्रशिक्षण देण्याकडे भर दिला. महाराष्ट्राच्या अंडर-16 संघाचे सिलेक्टर म्हणून त्यांची वर्णी लागली. राज्यातील ग्रामीण आणि निमशहरी भागातील खेळाडूंना संधी मिळवून देण्यासाठी पराग मोरे यांच्या युनायटेड क्रिकेट क्लबकडून प्रशिक्षण शिबिरं राबवली जातात.
राजस्थान रॉयल्स पुणेचे ‘कारभारी’
आयपीएल फ्रँचायझी राजस्थान रॉयल्सनं देशभरातून चांगले क्रिकेटर घडवण्याचा विडा उचललाय. आज तुम्ही पाहत असलेला वैभव सूर्यवंशी हे राजस्थान रॉयल्सचंच प्रॉडक्ट. असे खेळाडू घडवण्यासाठी जयपूर, गुवाहाटी, नागपूर आणि पुण्यामध्येही राजस्थान रॉयल्सनं अकॅडमी सुरू केल्या आहेत. 2024 मध्ये पुण्यात राजस्थान रॉयल्स अकॅडमी सुरू झाली. पराग मोरे या अकॅडमीचे संचालक म्हणून काम पाहतात. युवा खेळाडूंना अत्याधुनिक प्रशिक्षण, फिटनेस आणि क्रिकेटसाठीच्या सर्व सुविधा इथे उपलब्ध करून दिल्या जातात. इतकंच नव्हे तर श्रीलंकेचा महान गोलंदाज चामिंडा वास, दिग्गज फलंदाज कुमार संगकारा यांच्यासह अनेक मोठमोठ्या खेळाडूंचं मार्गदर्शन अकॅडमीतील खेळाडूंना वेळोवेळी मिळतं.
युवा खेळाडूंना मार्गदर्शन आणि त्यांना एक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी पराग यांचा नेहमीच प्रयत्न असतो. आणि त्यासाठी ते सातत्यानं कार्यरत आहेत. एक खेळाडू ते प्रशिक्षक आणि प्रशासकापर्यंतचा पराग मोरे यांचा हा प्रवास थक्क करणारा आहे.
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा घरच्या मैदानावर पराभव करत विजयीरथ रोखला