Uddhav Thackeray Speech at Shivsena Vardhapan Din: माझ्या नेतृत्त्वावर होणारे आरोप तुम्हाला खरे वाटत असतील तर मी शिवसेना पक्षप्रमुख हे पद सोडायला या क्षणी तयार आहे. माझ्या जागी एखाद्या सामान्य शिवसैनिकाला त्या पदावर बसवा. मला नेतृत्त्वाची कोणतीही हाव नाही. मी कोणत्याही क्षणी शिवसेना पक्षप्रमुख हे पद सोडायला तयार आहे, असे वक्तव्य उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात केले. आज मुंबईतील षणमुखानंद सभागृहात शिवसेना ठाकरे गटाचा 60 वा वर्धापनदिन पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाचा समारोप अत्यंत नाट्यमयरितीने केला. उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख हे पद सोडण्याची भाषा करताच उपस्थित शिवसैनिकांनी जागेवरुन उठून त्या प्रस्तावाला विरोध केला. उद्धव ठाकरे यांच्या या अनपेक्षित प्रस्तावामुळे आता ठाकरे गटात काही संघटनात्मक बदल होणार का, अशी चर्चा आता रंगू लागली आहे. एकनाथ शिंदे यांनी ‘ऑपरेशन टायगर’ राबवून दुसऱ्यांदा शिवसेना फोडून हा पक्ष खिळखिळा केला आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांची शिवसेना पक्षप्रमुखपद सोडण्याची ही खेळी ठाकरे गटाची नव्याने बांधणी करण्यात आणि पक्षात नवी जान फुंकण्याच्यादृष्टीने गेमचेंजर ठरणार का, हे आता बघावे लागेल.
उद्धव ठाकरे यांनी आपल्या संपूर्ण भाषणात नेहमीप्रमाणे भाजप आणि शिंदे सेनेला लक्ष्य केले. तसेच शिंदे सेनेसोबत जाणाऱ्या सहा खासदारांवरही टीकास्त्र सोडले. मात्र, आपल्या भाषणाच्या शेवटी त्यांनी अचानकपणे शिवसेना पक्षप्रमुख पदावरुन पायउतार होण्याची भाषा केल्याने अनेकांना धक्का बसला. मी कसा आहे, तुम्हाला माहिती आहे. माझ्यावर बोट दाखवलं तर मी एक क्षण पदावर राहत नाही, हे तुम्ही मी मुख्यमंत्रिपद सोडलं तेव्हा पाहिलं आहे. मला पदाची हाव असती तर मी विधान परिषदेत गेलो असतो. आता शिवसेना पक्षाला 60 वर्षे पूर्ण होत आहेत. मी देखील गेली 12-13 वर्षे संघटनेचे नेतृत्व करत आहे. आता माझ्या नेतृत्त्वावर आरोप होत असतील तर मी या पदावरुन उतरायला तयार आहे. याचं उत्तर विचार करुन द्या. माझ्यावरील आरोप तुम्हाला खरे वाटत असतील तर मी पद सोडायला तयार आहे. फक्त अट एकच आहे की, ही सोन्यासारखी शिवसेना दरोडेखोर आणि गद्दारांच्या हातात जाऊन द्यायची नाही. माझ्यावर कोणी आरोप करत असेल तर त्याला उत्तर तुम्ही द्यायचं आहे. मला नेतृत्त्वाची हाव नाही. त्यामुळे मी पद सोडायला तयार आहे. बाकी मी डगमगलेलो नाही, खचलेलो नाही. अनेक संकटं आणि वादळं आली तरी मी पहाडासारखा उभा राहीन. पण ज्यावेळी मी पद सोडावं असं तुम्हाला वाटेल तेव्हा मी पद सोडल्याशिवाय राहणार नाही, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाचा शेवट केला.
Omraje Nimbalkar Operation Tiger: ही पापं कुठे फेडाल, तुमच्या कपाळावरचा गद्दारीचा शिक्का कसा पुसाल?
लोकसभा निवडणुकीत धाराशिवमध्ये माझी सभा झाली होती, तेव्हा भाषण संपल्यानंतर एक शेतकरी माझ्याकडे बटवा घेऊन आला. त्याने त्याच्याकडील पैशाचा बटवा खासदार निवडून आणण्यासाठी मदत म्हणून देऊ केला होता. समोरुन पैशांचा महापूर असतानाही अशा शेतकरी आणि सामान्य लोकांच्या जीवावर आपण ती निवडणूक जिंकली. मग आता येथील खासदार दुसऱ्या पक्षात जात असतील तर हे पाप कुठं फेडतील? त्यावेळी धाराशिवचे उमेदवारच बोलले होते की, खंडोजी खोपडे आणि सूर्याजी पिसाळ म्हटलं की तुम्हाला काय आठवतं? त्यांना 400 वर्षे झाली तरी गद्दारीचा शिक्का पुसता आला नाही तर तुम्हाला गद्दारीचा शिक्का पुसायला किती वर्षे जावी लागतील, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
Shivsena Vardhapan Din: भाजपची वाटचाल ‘वन पार्टी, नो इलेक्शन’कडे, लोकशाहीला धोका, देश अराजकाच्या दिशेने चाललाय: उद्धव ठाकरे
आजचा वर्धापन दिनाच्या दिवशी शिवसैनिक खचून गेलेला असेल असे अनेकांना वाटत होते, पण शिवसैनिक उलट पेटून उठला असेल. आम्ही 30 वर्षे भाजपसोबत राहून भाजपमध्ये विलीन झालो नाहीत तर आता काँग्रेसमध्ये काय विलीन होऊ? अनेकजण म्हणतात की, शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होण्याची भीती वाटली म्हणून त्यांनी पक्ष सोडला. पण मला आता ही भीती वाटते की उद्या महाराष्ट्र भाजपच मिंधे सेनेत विलीन होईल की काय? आजघडीला भाजपचे दोन तृतीयांश खासदार हे बाहेरुन आलेले आहेत. तुमच्यात विचारांचं वांझोटेपण आहे, मग आमची पोरं किती दिवस पळवणार, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी भाजपला विचारला.
उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे बाहेर फिरत नाहीत, असा आरोप होता. पण मी सभा घेतल्या नसत्या, मी फिरलो नसतो तर खासदार निवडून कसे आले असते? मोदींचा चेहरा नसताना शिवसेनेचे 9 खासदार निवडून आले. लोकसभा निवडणुकीला मी दहा सभा घेतल्या. मातोश्री आणि ठाकरे कुटुंबावर जळतात त्यांना ठाकरे कुटुंबाने काय सोसलंय हे माहिती नाही. आदित्यने फिरायला पाहिजे, असे म्हणता, पण आमच्यावर राजकीय हल्ले झाले, घाणेरडे आरोप झाले तेव्हा बचाव करायला यांच्यापैकी एकजण तरी पुढे आला होता का? 2024 साली मोदींची लाट असताना मतदारांनी माझ्यावर आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर विश्वास ठेऊन नऊ खासदार निवडून दिले. ते खासदार आता फोडले, ही फोडाफोडी करुन तुम्हाला काय मिळणार आहे, आणखी किती सत्तापिपासू होणार आहात, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे सेनेला विचारला.
भाजपने दगा दिला तेव्हा मला मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारावी लागली. त्यामुळे अनेकांचा जळफळाट झाला. मातोश्रीने फक्त वाढायचं काम करायचं, जेवायचं काम आम्हीच करणार, जे काय मिळेल मंत्रिपद, मुख्यमंत्रिपद ते मलाच हवं, माझंच कार्ट खासदार झालं पाहिजे, हा त्यांचा आग्रह होता, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केले.
आज ज्या पद्धतीने देशाचे राजकारण चालू आहे, त्यामुळे लोकशाहीवरचा विश्वास उडत चालला आहे. देश अराजकाच्या दिशेने चालला आहे. भाजपची वाटचाल वन पार्टी, नो इलेक्शनच्या दिशेने सुरु आहे. पण भाजप याच वाटेने जात राहिली तर दीर्घकाळ त्यांची सत्ता राहणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून दिला.
Omraje Nimbalkar : होय, भावनिकदृष्ट्या मी चुकलोय, पण राजकीयदृष्ट्या माझा निर्णय योग्यच; ओमराजे निंबाळकरांनी मौन सोडलं