Twisha Sharma Case: मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये नोएडा येथील रहिवासी असलेल्या 33 वर्षीय त्विशा शर्मा हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला आता एक नवे आणि अत्यंत गंभीर वळण मिळाले आहे. त्विशाच्या वडिलांनी या प्रकरणी कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) शी संबंधित 46 मोबाईल नंबरची एक यादी सार्वजनिक करत अत्यंत खळबळजनक खुलासा केला आहे. त्विशाच्या मृत्यूनंतरच्या दुसऱ्याच दिवशी तिची सासू आणि माजी जिल्हा न्यायाधीश गिरिबाला सिंह यांनी अनेक प्रभावशाली व्यक्तींना आणि न्यायाधीशांना लागोपाठ फोन कॉल केल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. या दाव्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणाभोवती संशयाचे मोठे जाळे निर्माण झाले आहे.
Twisha Sharma Case: न्यायाधीशांपासून सीसीटीव्ही तंत्रज्ञांपर्यंत फोन
त्विशाच्या वडिलांनी सामायिक केलेल्या 46 मोबाईल क्रमांकांच्या सीडीआर यादीनुसार, ट्विशाचा मृत्यू झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तिची सासू गिरीबाला सिंह यांनी अनेक आजी-माजी न्यायाधीश, प्रशासकीय पातळीवरील प्रभावशाली लोक आणि सीसीटीव्ही तंत्रज्ञांशी (CCTV Technicians) संपर्क साधला होता. कुटुंबीयांनी हे कॉल डिटेल्स अत्यंत संशयास्पद असल्याचे सांगत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी थेट केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपवण्याची मागणी केली आहे. हा संपूर्ण खटाटोप आणि फोन कॉल्स प्रकरणाचा तपास प्रभावित करण्यासाठी आणि पुरावे नष्ट करण्यासाठी केले गेले असावेत, असा थेट आरोप मृत महिलेच्या कुटुंबीयांनी केला आहे.
Twisha Sharma Case: सीसीटीव्ही फुटेजसोबत छेडछाड?
मृतकाच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, सीडीआर यादीतील एक नंबर अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश (ADJ) चा असल्याचे समोर येत आहे, ज्यांच्याशी 13 मे रोजी वारंवार संवाद साधण्यात आला. तसेच मध्य प्रदेशातील एका प्रमुख तपास यंत्रणेत कार्यरत असलेल्या जस्टिसचाही एक नंबर यात आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या यादीत सीसीटीव्ही कॅमेरा इन्स्टॉल करणाऱ्या विनोद वाणी आणि रोहित विश्वकर्मा या तरुणांचेही नंबर आहेत. त्विशाच्या मृत्यूनंतर या तंत्रज्ञांना फोन केले गेल्यामुळे सीसीटीव्ही फुटेजसोबत छेडछाड झाली असण्याची शक्यता तीव्र झाली आहे.
या प्रकरणाशी संबंधित लोकांचे जबाब आणि सीसीटीव्ही फुटेजची वेळ (Timing) यामध्ये मोठी तफावत आढळली आहे. सायबर तज्ज्ञ शोभित चतुर्वेदी यांनीही यापूर्वीच सीसीटीव्ही फुटेजची फॉरेन्सिक तपासणी (Forensic Audit) करण्याची गरज व्यक्त केली होती. आता वडिलांच्या या नव्या दाव्यामुळे या शंकेला बळकटी आली आहे.
Twisha Sharma Case: काय आहे मूळ प्रकरण?
12 मे रोजी भोपाळमधील कटारा हिल्स पोलीस ठाण्याच्या हद्दीत 33 वर्षीय त्विशा शर्मा हिचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता. मात्र, त्विशाच्या माहेरच्या लोकांनी सासरच्या मंडळींवर हत्येचा थेट आरोप केला आहे. ट्विशाचा पती आणि सासूने तिची हत्या करून आत्महत्येची खोटी कथा रचल्याचा दावा वडील व भावाने केला आहे. कटारा हिल्स पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पती समर्थ, सासू गिरीबाला सिंह यांच्याविरुद्ध हुंडाबळी आणि छळवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी पोलिसांनी 6 सदस्यांची विशेष तपास समिती (SIT) स्थापन केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
आणखी वाचा