आयसीसी वुमन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतून (Icc Womens T20i World Cup 2026) आतापर्यंत 5 संघ बाहेर झाले आहेत. तर उपांत्य फेरीतील 4 जागांसाठी उर्वरित 7 संघांमध्ये चुरस आहे. वुमन्स टीम इंडियाला सलग तिसर सामना जिंकून सेमी फायनलमधील आपलं स्थान आणखी मजबूत करण्याची संधी होती. मात्र दक्षिण आफ्रिकेने भारताला सलग तिसरा सामना जिंकण्यापासून रोखलं. दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियावर विजय मिळवला. टीम इंडियाचा हा पहिला पराभव ठरला. टीम इंडिया वर्ल्ड कप मोहिमेतील आपला चौथा सामना हा बांगलादेश विरुद्ध खेळणार आहे. त्याआधी भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर हीच्या कामगिरीवरुन माजी खेळाडू शिखा पांडे हीने काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
हरमनप्रीतला या स्पर्धेत आतापर्यंत विस्फोटक बॅटिंग करता आलेली नाही. त्यामुळे टीम इंडियाला कुठेतरी त्याचा फटका बसतोय. नेमक्या याच मुद्द्यावरुन शिखा पांडे हीने भाष्य केलं आहे. हरमनप्रीतने विकेटचा विचार न करता आक्रमक खेळावं, असा सल्ला शिखाने भारतीय कर्णधाराला दिला आहे.
शिखा पांडे काय म्हणाली?
शिखाने हरमनप्रीतच्या बॅटिंगबाबत चिंता व्यक्त केली. हरमनप्रीतने तिच्या बॅटिंगच्या स्थानात बदल करायला हवं जेणेकरुन तिला सूर गवसेल, असं शिखाने म्हटलं. हरमनप्रीतने चौथ्या स्थानी बॅटिंगला यायला हवं. तर जेमिमाह रॉड्रिग्स पाचव्या स्थानी फलंदाजीसाठी येऊ शकते, असं शिखा जिओहॉटस्टारच्या गेमप्लान या कार्यक्रमात म्हणाली.
“मधल्या फळीत खेळणाऱ्या हरमनप्रीत कौर हीचा स्ट्राईक रेट कमी असणं भारतासाठी चिंताजनक आहे. सुरुवातीलाच विकेट गेल्यास यास्तिका भाटीया बॅटिंगसाठी येते. तसेच जेमिमाह पाचव्या स्थानी फलंदाजीसाठी येते. हरमनप्रीतची कामगिरी कशीही असो तिने विकेट गमावण्याबाबत विचार करु नये. हरमनप्रीतला आक्रमकपणे खेळायला हवं. हरमनप्रीतला एकदा का सूर गवसला की ती सहज मोठे फटके मारेल”, असा सल्ला देत शिखाने हरमनप्रीतबाबत विश्वास व्यक्त केला.
हरमनप्रीत कौर हीची आकडेवारी
दरम्यान हरमनप्रीतने टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या 10 व्या पर्वातील 3 सामन्यांमध्ये 72 धावा केल्या आहेत. हरमनप्रीतने 24 च्या सरासरीने आणि 109.09 च्या स्ट्राईक रेटने ही कामगिरी केली. त्यामुळे आता हरमनप्रीत चौथ्या क्रिकेट सामन्यात कशी कामगिरी करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.