Success Story : सोलापूरच्या शेतकऱ्याची कमाल, नव्या पद्धतीने केली शेती, कलिंगड लागवडीतून कमावले 51 लाख! | शेती बातम्या


Last Updated:

अवघ्या 11 एकर शेतात कलिंगडाची यशस्वी लागवड करून तब्बल 51 लाख रुपयांची बंपर कमाई केली आहे. त्यांच्या या अभूतपूर्व यशामुळे संपूर्ण जिल्ह्यात त्यांचे कौतुक होत असून, इतर शेतकऱ्यांसाठी ते एक प्रेरणास्थान बनले आहेत.

+

News18

News18

सोलापूर : पारंपरिक शेतीला आधुनिकतेची आणि योग्य नियोजनाची जोड दिली, तर शेतीमधूनही मोठी उलाढाल करता येते, हे सोलापूर जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी रणजीत उबाळे यांनी सिद्ध करून दाखवले आहे. त्यांनी आपल्या अवघ्या 11 एकर शेतात कलिंगडाची यशस्वी लागवड करून तब्बल 51 लाख रुपयांची बंपर कमाई केली आहे. त्यांच्या या अभूतपूर्व यशामुळे संपूर्ण जिल्ह्यात त्यांचे कौतुक होत असून, इतर शेतकऱ्यांसाठी ते एक प्रेरणास्थान बनले आहेत.

पारंपरिक पिकांना फाटा; नगदी पिकाची निवड

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील नरखेड गावात राहणारे रणजीत उबाळे यांनी पारंपरिक पिकांच्या चक्रात अडकून न पडता कलिंगडासारख्या नगदी पिकाची निवड केली. लागवडीपूर्वी त्यांनी जमिनीची उत्तम मशागत करून घेतली. जमीन सुपीक होण्यासाठी त्यांनी संपूर्ण 11 एकर क्षेत्रात शेणखताचा भरपूर वापर केला. त्यानंतर आधुनिक पद्धतीने मल्चिंग पेपर टाकून बेड तयार करण्यात आले. कलिंगडाच्या पिकाला पाण्याची अचूक मात्रा मिळण्यासाठी त्यांनी ठिबक सिंचन (ड्रिप) पद्धतीचा अवलंब केला, ज्यामुळे पाण्याची मोठी बचत झाली.

एकाच दिवसात 40 हजार रोपांची लागवड 

योग्य नियोजनाच्या जोरावर रणजीत यांनी 11 एकर क्षेत्रात तब्बल 40 हजार कलिंगडाच्या रोपांची लागवड अवघ्या एका दिवसामध्ये पूर्ण केली. वेळेवर खते, सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि अचूक कीड व्यवस्थापन केल्यामुळे पिकाची गुणवत्ता अत्यंत दर्जेदार राहिली. उबाळे यांच्या कष्टाला निसर्गानेही चांगली साथ दिली, ज्यामुळे एका एका कलिंगडाचे वजन तब्बल 5 ते 6 किलोपर्यंत भरले.

खर्च आणि उत्पन्नाचे गणित

या आधुनिक शेतीसाठी रणजीत उबाळे यांना लागवडीपासून ते काढणीपर्यंत जवळपास 23 लाख रुपयांचा खर्च आला. मात्र, त्यांनी केवळ उत्पादनावरच भर दिला नाही, तर बाजारपेठेचाही अचूक अभ्यास केला होता. तर आतापर्यंत कलिंगड विक्रीतून 40 लाख रुपये मिळाले असून आणखीन 11 लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार असल्याची माहिती शेतकरी रणजित उबाळे यांनी दिली. त्यांच्या 11 एकर शेतातून जवळपास 250 टन कलिंगडाचे उत्पादन निघाले असून, बाजारात त्यांना सरासरी 20 रुपये प्रति किलो प्रमाणे चांगला दर मिळाला.

आतापर्यंत कलिंगड विक्रीतून त्यांना 40 लाख रुपये मिळाले असून, उर्वरित मालातून आणखी 11 लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे, अशी माहिती स्वतः रणजीत उबाळे यांनी दिली आहे. खर्च वजा जाता त्यांना या पिकातून तब्बल 28 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळणार आहे. जिद्द, आधुनिक तंत्रज्ञान आणि चिकाटीच्या जोरावर शेतीत मिळवलेले हे यश इतर तरुण शेतकऱ्यांसाठी नक्कीच मार्गदर्शक ठरेल.

मराठी बातम्या/कृषी/

Success Story : सोलापूरच्या शेतकऱ्याची कमाल, नव्या पद्धतीने केली शेती, कलिंगड लागवडीतून कमावले 51 लाख!



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *