Last Updated:
बुलढाणा जिल्ह्यातील न्यायदेवी गावातील महिला सरपंचाने गावकऱ्यांची तहान भागवण्यासाठी अनोखा आदर्श महाराष्ट्रासमोर ठेवला आहे.
बुलढाणा : स्वातंत्र्याची 75 वर्ष उलटली तरी देशातील कित्येक गावांना पाण्यासाठी वणवण भटकावं लागतंय. सरकारच्या कागदी योजना आणि प्रशासनाचा ढिसाळपणा यामुळे नागरिक तहानलेलेच राहतात, पण जेव्हा सरकार हतबल होतं तिथे एका महिलेचं मातृत्व आणि नेतृत्व धावून येतं. बुलढाणा जिल्ह्यातील न्यायदेवी गावातील महिला सरपंचाने गावकऱ्यांची तहान भागवण्यासाठी अनोखा आदर्श महाराष्ट्रासमोर ठेवला आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील न्यायदेवी गावातील महिला सरपंचाने गावकऱ्यांची तहान भागवण्यासाठी स्वतःचं मंगळसूत्र गहाण ठेवलं. सरकारी मंजुरी आणि निधीची वाट न पाहता, त्यांनी एका स्त्रीसाठी सर्वात अमूल्य असलेला दागिना मंगळसूत्र गहाण ठेवून तब्बल 6 लाख रुपये उभे केले. या पैशातून स्वतःच्या शेतात विहीर खोदून संपूर्ण गावाची तहान भागवली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील ‘न्यायदेवी’ गावातील सरपंच वत्सला तायडे यांनी हा अभूतपूर्व आदर्श महाराष्ट्रासमोर ठेवला आहे.
डोळ्यांतील अश्रू पाहून काळीज हेलावले
न्यायदेवी गावात गेल्या अनेक वर्षांपासून भीषण पाणीटंचाई होती. वय झालेल्या वृद्ध महिलांनाही डोक्यावर हंडे घेऊन पाण्यासाठी मैलोन्मैल भटकावे लागायचे. जेव्हा गावातील महिलांच्या डोळ्यात अश्रू आणून ग्रामपंचायतीत आपल्या व्यथा मांडायच्या, तेव्हा तत्कालीन सरपंच वत्सला तायडे यांना ते सहन झाले नाही. आम्ही सरपंच होतो तेव्हा लोकांचे पाण्यासाठी होणारे हाल पाहून आमचे काळीज पिळवटून निघायचे. आता आम्हाला ते सहन झाले नाही. शेवटी आम्ही स्वतःच्या आमचे दागिने मोडून, मंगळसूत्र गहाण ठेवून स्वतःच्या शेतात विहीर खोदली, अशी भावना सरपंच वत्सला तायडे यांनी व्यक्त केल्या.
6 लाख रुपये खर्चून उभारली ‘नळ योजना
वत्सला तायडे या केवळ विहीर खोदून थांबल्या नाहीत, तर त्यांनी स्वतःच्या विहिरीवरून गावात 7 वेगवेगळ्या ठिकाणी नळ बसवले. गेल्या 3 वर्षांपासून त्या स्वतःच्या विहिरीचे पाणी संपूर्ण गावाला मोफत देत आहेत. यामुळे गावातील महिलांची पायपीट थांबली असून ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. गावातील एका महिला म्हणाली की, पाण्यासाठी आम्हाले खूप त्रास होता. 2-4 किलोमीटर डोक्यावर हांडे घेऊन जावं लागे. सरपंच माऊलीने आमच्यासाठी खूप चांगलं काम केलं.
पाण्याची टाकी आणि शासकीय मंजुरीची गरज
स्वतःचे मंगळसूत्र गहाण ठेवून वत्सला तायडे यांनी गावाची तात्पुरती तहान तर भागवली आहे, परंतु ही समस्या कायमस्वरूपी सुटण्यासाठी आता शासकीय मदतीची नितांत गरज आहे. विहिरीला पाणी असले तरी गावात एक मोठी पाण्याची टाकी आणि हक्काची शासकीय नळ योजना मंजूर व्हावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. तसे झाल्यास न्यायदेवी गावच्या पुढच्या पिढीचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटेल.
सरकारने या प्रकरणात तातडीने लक्ष घालण्याची गरज
वत्सला तायडे यांची ही यशोगाथा सध्या संपूर्ण महाराष्ट्रात कौतुकाचा आणि अभिमानाचा विषय ठरत आहे. आता गरज आहे ती सरकारने या प्रकरणात तातडीने लक्ष घालून गावासाठी कायमस्वरूपी नळ योजना आणि पाण्याची टाकी मंजूर करण्याची आहे.
Mumbai,Maharashtra
