रिंकू राजगुरूचं पहिलं अल्बम गाणं ‘बाप विठुराया’; ऐकून अंगावर येतील शहारे – Marathi News | Rinku rajguru first album song Baap Vithuraya by Ajay Gogavale watch video


पाऊस आला की विठ्ठलाच्या पंढरीच्या वारीचे वेध हे सगळ्यांना लागतात आणि अशातच अभिनेत्री रिंकू राजगुरू यंदाची वारी अजून खास करण्यासाठी सज्ज होताना दिसतेय. काही दिवसांपूर्वी रिंकूचे वारीमधले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते आणि ती काहीतरी नवीन घेऊन येणार असल्याचा चर्चांना उधाण आलं होतं. आता या सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. ‘सारेगम मराठी’च्या आगामी वारी स्पेशल गाण्यात रिंकूचा एक नवा अंदाज अनुभवायला मिळणार आहे. सारेगम मराठीने सोशल मीडियावर हे गाणं प्रदर्शित केलं आहे.

‘बाप विठुराया’ असं या गाण्याचं नाव असून अजय गोगावले यांच्या दमदार आवाजात हे गाण ऐकायला मिळणार आहे. अजय यांच्या आवाजाची जादू प्रेक्षकांना पुन्हा एकदा बाप विठुराया गाण्यातून अनुभवायला मिळणार आहे. या गाण्याबद्दल बोलताना रिंकू सांगते, “मला खूप आनंद होतोय की माझं पहिलं अल्बम गाणं हे विठ्ठलावर चित्रीत आहे. कारण माझं आणि विठ्ठलाचं नातं खूप अगोदरपासूनच आहे. माझं विठ्ठलावर प्रचंड प्रेम आणि श्रद्धा आहे. तो माझ्या प्रत्येक गोष्टीत माझ्यासोबत असतो. मी त्याच्यासोबत खूप गप्पाही मारते. विठ्ठल हा माझ्या आयुष्यातल्या एक हळवा भाग आहे. त्यामुळे हे गाणं करताना मला असं वाटलं की त्याच्या मनात असावं म्हणून हे सगळं जुळून आलं.”

पहा गाणं-

“कारण आजवर मी कधीच अल्बम साँग केलं नाही. कारण माझी कामाची पद्धत जरा वेगळी आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे हे गाणं अजय गोगावले यांनी गायलं आहे आणि फार वर्षांनी पुन्हा त्यांच्यासोबत काम करता आलं. माझं पहिलं अल्बम साँ असल्याने हे माझ्यासाठी खूप खास आणि जवळचं आहे”, असंही रिंकू पुढे म्हणाली. रिंकूचा कधीही न पाहिलेला वेगळा पण तितकाच लक्षवेधी लूक या गाण्यातून प्रेक्षकांना बघायला मिळतोय आहे. या पहिल्या वहिल्या अल्बम गाण्यासाठी रिंकूदेखील तितकीच उत्सुक आहे. रिंकूने पोस्ट केलेल्या या गाण्याच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *