Shrinidhi Ghatate: भर रस्त्यात शिवीगाळ, अंगावर अक्षरशः धावून गेले अन्…; लोकप्रिय मराठी गायिकेसोबत संतापजनक प्रकार, VIDEO


Marathi Singer Shrinidhi Ghatate: आजकाल वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणे, चुकीच्या दिशेने वाहन चालवणे, इतरांना त्रास देणे, जाब विचारला तर उलट शिवीगाळ किंवा दमदाटी करणे, अशा कित्येक घटना आपल्या आजूबाजूला सर्रास घडताना दिसतात. अनेकदा या बेशिस्तीचा फटका सर्वसामान्य नागरिकांनाच नाही, तर कलाकारांनाही बसताना दिसतो. अशीच एक संतापजनक घटना मराठी गायिका श्रीनिधी घटाटे (Shrinidhi Ghatate) हिच्यासोबत घडली आहे. भर रस्त्यात या गायिकेला आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याला एका जोडप्याने अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. एवढेच नाही, तर ट्राफिकमध्ये गाडीवरून खाली उतरत आक्रमकपणे हे जोडपं त्यांच्या अंगावर जाऊ लागलं. गायिकेने यासंदर्भात तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर व्हिडिओ शेअर करत आपला संताप व्यक्त केला आहे.

नेमकं घडलं काय?

लोकप्रिय मराठी गायिका श्रीनिधी घटाटे हिची instagram पोस्ट सध्या चर्चेत आहे. तिने या पोस्टमध्ये तिच्या कारमधून रेकॉर्ड केलेला एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये भर रस्त्यात ट्रॅफिकच्या मधोमध दुचाकी थांबवून एक महिला घाणेरड्या शिव्या देत अंगावर धावून जात असल्याचं दिसतंय.  महिलेसोबत तिचा नवराही गायिका श्रीनिधी आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याला भांडताना दिसतोय. गाडीवर उतरून या दोघांनीही त्यांच्या दिशेने धाव घेत मारहाण करण्याचाही प्रयत्न केला.या संपूर्ण प्रसंगाच काही भाग तिने मोबाईलमध्ये कैद केला असून तो व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केलाय.

या घटनेविषयी माहिती देताना श्रीनिधीने हा प्रकार इमॅजिका रिसॉर्टकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडल्याचं तिने सांगितलं. ती म्हणाली,”हे अत्यंत धक्कादायक आणि अस्वस्थ करणारे आहे.आम्ही आमच्या फार्महाऊसकडे जात असताना रस्त्यावर अक्षरशः वाहतुकीचा गोंधळ पाहायला मिळाला. अनेक जण सर्रास चुकीच्या बाजूने वाहन चालवत होते. त्यामुळे संपूर्ण लेन अडली होती आणि वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. अशाच एका व्यक्तीने चुकीच्या लेनमधून येत आमच्या कारला जवळपास धडक दिली.माझ्या होणाऱ्या पतीने त्याला शांतपणे हा वन-वे रस्ता नसल्याचं सांगत योग्य लेनमधून वाहन चालवण्याची विनंती केली. पण त्यावर त्या व्यक्तीने आणि त्याच्या पत्नीने आमच्याशी अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ केली आणि आक्रमक होत मारहाण करण्याचाही प्रयत्न केला.कायदा पाळण्याची हीच शिक्षा आहे का? आज वाहतुकीचे नियम पाळणाऱ्या नागरिकांनाच धमकावलं जात आहे, तर नियम मोडणारे लोक गुंडांसारखे रस्त्यावर वावरत इतरांमध्ये भीती निर्माण करत आहेत.@dgpmaharashtra, अशा बेजबाबदार आणि हिंसक वर्तनाविरोधात कठोर कारवाई व्हावी, ही माझी मनापासून विनंती आहे. कायद्यापेक्षा आक्रमकपणा मोठा आहे, असा समज बाळगणाऱ्या लोकांच्या ताब्यात आपले रस्ते राहता कामा नयेत.

तिच्या या पोस्टवर अनेकांनी संताप व्यक्त केलाय. अशा  लोकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. तिच्या चाहत्यांनी ती बरी आहे का ? अशी विचारपूस ही कमेंट सेक्शनमध्ये केली आहे. रस्त्यावर वाहन चालवणं किती भीतीदायक झालं आहे अशा प्रतिक्रिया समोर येत आहेत.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *