Shreyas Talpade Reduced Dairy Food Intake In Diet: सध्या FDA च्या धडक कारवायांमुळे सोशल मीडियावर भेसळयुक्त पदार्थांबाबत मोठी चर्चा रंगली आहे. FDA चे आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांनी अनेक दुकानं, हॉटेल्स आणि दूध डेअरींवर धाड मारत कित्येक टनांचा भेसळयुक्त अन्नपदार्थांचा साठा (Stock Of Adulterated Food Items) सील केला आहे. तेव्हापासूनच भेसळीचं धडकी भरवणारं वास्तव सर्वांसमोर आलं असून यामुळे सर्वसामान्यांना धडकी भरली आहे. दूध, पनीर, खवा यांसारख्या रोजच्या वापरातील गोष्टींमध्ये होणाऱ्या भेसळीमुळं सर्वसामान्यांचे आरोग्य धोक्यात आलंय. त्यामुळे आता नेमकं खायचं तरी काय? असाच प्रश्न सर्वसामान्यांसमोर उभा राहिला आहे. अशातच आता या प्रकरणावर मराठी अभिनेता श्रेयस तळपदे (Marathi Actor Shreyas Talpade) यानं भाष्य केलंय. नुकतच्याच एका मुलाखतीत बोलताना श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) यानं त्याच्या आयुष्यात, घरात आहारात मोठे बदल केल्याचं सांगितलंय. दूध, दुधाचे पदार्थ आहारातून अगदीच काढूनच टाकल्याचं श्रेयसनं सांगितलं आहे.
अभिनेता श्रेयस तळपदेचा ‘द इंडियन स्टोरी’ हा बहुप्रतीक्षित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सध्या श्रेयस या सिनेमाचं जोरदार प्रमोशन करताना दिसतोय. सामाजिक आशय असलेला बहुचर्चित ‘द इंडिया स्टोरी’ (The India Story) हा कोर्टरूम ड्रामा असलेला सिनेमा रिलीजच्या आधीपासूनच चर्चेत आहे. या सिनेमात श्रेयस तळपदेसोबत काजल अग्रवालही दिसणार आहे. या सिनेमातल्या दोघांच्याही व्यक्तिरेखा एका धक्कादायक सत्याचा शोध घेत असताना त्यांना कोणत्या संघर्षाला सामोरे जावे लागतं, याचं चित्रण करण्यात आलंय. हा सिनेमा 24 जुलैला प्रदर्शित केला जाणार आहे.
खाद्यपदार्थांमधील भेसळीबाबत श्रेयस तळपदे नेमकं काय म्हणाला? (Shreyas Talpade On Adulterated Food Items)
बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदे म्हणाला की, “सोशल मीडियावर भेसळीबाबत येणारे व्हिडीओ काही वेळा जुने किंवा बनवलेले असू शकतात. पण, जर आपण त्यातले 90% व्हिडीओ बाजूला ठेवले, तरी उरलेल्या 10% व्हिडीओंमध्ये काहीतरी तथ्य असतंच. आता तर वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांनी जी धडक मोहीम सुरू केली आहे, त्यातून भेसळीचं भीषण वास्तव उघड होत आहे. हे सगळं पाहिल्यानंतर आम्ही आमच्या घरातील डेअरी प्रॉडक्ट्सचा वापर अत्यंत कमी करून टाकला आहे…”
“आम्ही आमच्या मुलीसाठीसुद्धा दूध आणि दुग्धजन्य पदार्थ खूप कमी केलेत…”
खाद्यपदार्थांमधील भेसळींचा धसका घेत श्रेयस तळपदेनं घरात दुग्धजन्य पदार्थांचं सेवन करणं जवळपास बंदच केलंय. इकंच काय तर, त्यानं त्याच्या मुलीच्या आहारातील दूध आणि दुधाच्या पदार्थांचं प्रमाणही खूपच कमी केलंय. याबाबत बोलताना श्रेयस म्हणाला की, “यापूर्वी आमच्या घरी आठवड्यातून सात ते आठ वेळा जेवणात पनीर किंवा दुधाचे पदार्थ असायचे. पण आता आम्ही आमच्या मुलीसाठीसुद्धा दूध आणि दुग्धजन्य पदार्थ खूप कमी केले आहेत. मी स्वतः रोज रात्री हळद-दूध प्यायचो, ते आता पूर्णपणे बंद केलं आहे. चहामध्येही आता फक्त दोन थेंब दूध असतं, नाहीतर मी कोरा चहा किंवा ब्लॅक कॉफी पिण्याला प्राधान्य देतो”.
“आपल्या आरोग्यासाठी जितकी काळजी घेता येईल, तितकी आम्ही घेतोय…”
“घरात कधी पनीर खावंसं वाटलंच, तर अगदी खात्रीशीर आणि विश्वासार्ह सोर्स असेल तिथूनच पनीर आणलं जातं. आम्ही नॉनव्हेज खातो, नशिबाने अजून माशांमध्ये (Fish) काही इंजेक्ट केलं जात नाही, त्यामुळे ते आम्ही नीट खातो. बाकी घरात साधी खिचडी किंवा बटाट्याची भाजी आवडीने खाल्ली जाते. बाजारातून आणलेल्या पालेभाज्यासुद्धा शक्य तितक्या धुवून आणि उकळून घेतल्या जातात. आपल्या आरोग्यासाठी जितकी काळजी घेता येईल, तितकी आम्ही घेत आहोत…”, असं श्रेयसनं सांगितलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव