Shivsena Opration Tiger Eknath Shinde Uddhav Thackeray: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी 2022 मध्ये तब्बल 40 आमदारांना सोबत घेत अखंड शिवसेनेत ऐतिहासिक बंड केलं. यानंतर 4 वर्षांनी पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार शिंदेंच्या गळाला लागले आहेत. या 6 खासदारांनी वेगळा गटही स्थापन केला आहे आणि तसं पत्र लोकसभा अध्यक्षांना दिल्याची माहिती आहे. याचदरम्यान, एक महत्वाची माहिती समोर आली आहे.
ऑपरेशन टायगर (Shivsena Opration Tiger) फुलप्रूफ झालेले असून आता लगेच काहीही जाहीर करायचे नाही, कोणतेही पुरावे द्यायचे नाही असं शिंदे शिवसेनेकडून ठरवण्यात आल्याचं कळतंय. ठाकरे गटाचे कायदेशीर डावपेच बघूनच पुढील पावलं टाकली जातील. पुढील 2 दिवस तरी अधिकृतरित्या काहीही समोर आणलं जाणार नाही, अशी माहिती शिवसेनेच्या वरिष्ठ सूत्रांनी माझाला दिली आहे. अतिशय काटेकोरपणे आणि नियोजन पद्धतीनं ऑपरेशन टायगर राबवलं गेल्याची माहिती हळूहळू समोर येत आहे. रात्रभरात दिल्लीत वायूवेगानं घडामोडी घडत गेल्या. दरम्यान खासदारांचा स्वतंत्र गट लवकरच शिवसेनेत विलीन करण्यात येणार असून शिंदेंचे 6 खासदार 19 जूनला वर्धापनदिनी एकत्र दिसतील आणि आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.
दिल्लीत वायूवेगानं घडामोडी घडल्या- (Shivsena Opration Tiger Eknath Shinde Uddhav Thackeray)
भाऊसाहेब वाकचौरे आधीच दिल्लीत होते. उर्वरित बंडखोरांनी 16 जूनच्या रात्री एकामागून एक दिल्ली गाठली. यामध्ये सर्वात आघाडीवर होते संजय देशमुख आणि संजय जाधव नांदेड विमानतळावरुन स्पेशल चार्डड प्लेननं त्यांनी दिल्ली जवळ केली. पाठोपाठ एकनाथ शिंदेंनीही स्पेशल विमानानं राजधानीकडे कूच केलं. याच दरम्यान संजय दीना पाटीलही दिल्लीत गेल्याची माहिती आहे. तर नागेश पाटील आष्टीकरांनी रस्ते मार्गे हैदराबादला जात दिल्ली गाठली. तिकडे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकारांनी पुण्यातून चार्टर्ड पकडत घाईघाईत दिल्ली दौरा उरकला.
लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांच्या पुढील आदेशाकडे सगळ्यांचं लक्ष- (Shivsena Opration Tiger Eknath Shinde Uddhav Thackeray)
आता संपूर्ण लक्ष लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांच्या पुढील आदेशाकडे लागले आहे. त्यांनी परवानगी दिली तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिंदेसेनेत प्रवेश करण्याचा बंडखोरांचा मार्ग मोकळा होईल आणि शिंदेसेनेच्या खासदारांची संख्या 13 वर पोहोचेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाच्या आगामी विस्ताराच्यावेळी शिंदेसेनेला याचा फायदा होणार आहे. शिंदेसेनेला एक कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्री पद मिळू शकते.
‘ऑपरेशन टायगर’ची टाईमलाइन- (Shivsena Opration Tiger)
- 10 जून- एनडीच्या बैठकीदरम्यान अमित शाह, शिंदेंमध्ये ऑपरेशन टायगरबाबत चर्चा
- अमित शाहांनी मोदींशी चर्चा करून संमती मिळवली
- 10 जून- शाह यांची फडणवीस, शिंदेंसोबत बैठक आणि ग्रीन सिग्नल
- 10 जून- दिल्लीतल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये ठाकरेंच्या खासदारांची शिंदेंसोबत भेट
- 14 जून- उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर खासदारांची बैठक बोलावली
- अनिल देसाई, अरविंद सावंत, राजाभाऊ वाजे बैठकीला हजर
- नागेश आष्टीकर, संजय देशमुख ऑनलाईन उपस्थित
- ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे, संजय जाधव गैरहजर
- 15 जून- खासदार संजय देशमुखांची दिल्लीत प्रतापराव जाधवांशी भेट
- 16 जून- रात्री ठाकरेंचे 6 खासदार दिल्लीत गेल्याच्या बातम्या, शिंदेही रवाना
- फुटीर गटाला मान्यता देऊ नका, अरविंद सावतांचं लोकसभा अध्यक्षांना पत्र
- 17 जून- संजय राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत, राजाभाऊ वाजेंची पत्रकार परिषद
- ठाकरेंच्या 6 खासदारांचा स्वतंत्र गट स्थापन, लोकसभा अध्यक्षांना पत्र
- ठाकरेंकडून सर्व खासदारांना 18 जूनच्या संसदीय पक्ष बैठकीसाठी व्हीप
ठाकरेंच्या नऊ खासदारांची नावे- (Shivsena MP List)
1. अनिल देसाई
2. अरविंद सावंत
3. संजय दिना पाटील
4. राजाभाऊ वाजे
5. संजय जाधव
6. संजय देशमुख
7. नागेश पाटील आष्टीकर
8. ओमराजे निंबाळकर
9. भाऊसाहेब वाकचौरे
कोणते खासदार शिंदे गटात गेले? (Opration Tiger Shivsena MP)
1. संजय जाधव
2. संजय देशमुख
3. नागेश पाटील आष्टीकर
4. ओमराजे निंबाळकर
5. भाऊसाहेब वाकचौरे
6. संजय दिना पाटील
संबंधित बातमी:
Sushma Andhare On Operation Tiger : ओमराजेंबद्दल गौप्यस्फोट, सुषमा अंधारेंची खळबळजनक पत्रकार परिषद