मुंबई : राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नवी दिल्ली येथे पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ असल्याचं म्हटलं. यामुळं राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी कोणीही नाराज नाही, असं म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य खोडून काढण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी आमचा पक्ष एनडीएसोबत जाणार नसल्याचं म्हटलंय.
पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?
शरद पवार यांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ आहेत, काय करतील माहिती नाही. मोदी शाह सरकार हात धुवून लागलेलं आहे, विरोधी पक्ष अस्तित्वात नसावा, अशी त्यांची इच्छा आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे जे केलं ते पवार साहेबांच्या एनसीपीत होऊ शकतं. खासदार सोडून जातील की नाही मात्र अस्थिर आहेत, असं ऐकतोय, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
बजरंग सोनवणे काय म्हणाले?
बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी आमच्या पक्षातील कोणताही खासदार अस्वस्थ नाहीये. आम्ही आठ खासदार एकसंघ आहोत. आम्ही सर्व जण सुप्रिया ताईंच्या नेतृत्त्वात सभागृहात काम करतो. आदरणीय साहेबांच्या आदेशानं, सहकार्यानं काम करतो, असं बजरंग सोनवणे म्हणाले. आम्हाला ऑफर यायचा प्रश्न नाही, आम्ही ऑफरच्या पलीकडे आहोत, त्यामुळं आम्हाला ऑफर यायचा प्रश्न नाही, असं खासदार बजरंग सोनवणे म्हणाले. आम्ही आठच्या आठ जण एकत्र आहोत, असंही सोनवणे यांनी म्हटलं.
शशिकांत शिंदे काय म्हणाले?
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हा पक्ष एनडीएमध्ये सामील होणार असल्याच्या सर्व चर्चांना शशिकांत शिंदे यांनी पूर्णपणे फेटाळून लावले आहे. ते म्हणाले कालच पक्षाचे सर्व आमदार आणि खासदारांनी शरद पवार साहेबांची भेट घेतली असून सर्वजण पक्षाशी एकनिष्ठ आहेत.चर्चांमध्ये तथ्य नाही: एनडीएमध्ये जाण्याबाबत पक्षात कोणतीही चर्चा सुरू नाही आणि तसा कोणताही विषय उद्भवू शकत नाही.आगामी काळात महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांमध्ये अधिक चांगला समन्वय राखण्यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू, असंही प्रदेशाध्यक्ष शिंदे म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे लोकसभेतील खासदार
सुप्रिया सुळे : बारामती
अमोल कोल्हे : शिरुर
धैर्यशील मोहिते पाटील: माढा
सुरेश म्हात्रे : भिवंडी
अमर काळे : वर्धा
निलेश लंके : अहमदनगर दक्षिण
बजरंग सोनवणे : बीड
भास्कर भगरे : दिंडोरी
Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून