मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष स्व. अजित अनंतराव पवार उर्फ अजितदादा पवार यांना मरणोत्तर ‘पद्मविभूषण’ पुरस्काराने सन्मानित करावे, अशी मागणी महाराष्ट्र विधानमंडळातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी केली आहे. 28 जानेवारी 2026 रोजी निधन झालेल्या अजितदादा पवार यांनी महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणावर मोठा ठसा उमटवला, असं आमदरांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री हसन मुश्रीफ, चेतन तुपे, माजी मंत्री अनिल पाटील, माणिकराव कोकाटे, संजय बनसोड, आमदार सरोज अहिरे यांच्यासह राष्ट्रवादीचे इतर आमदार यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात मुख्य प्रतोद चेतन तुपे यांनी म्हटले आहे की, 28 जानेवारी 2026 रोजी झालेल्या अत्यंत दुर्दैवी अपघातात आपण महाराष्ट्राचे आणि आपल्या सर्वांचे लाडके नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित अनंतराव पवार (अजितदादा) यांना गमावले. ही महाराष्ट्राची आणि देशाची कधीही न भरून निघणारी हानी आहे.
अजितदादांना मरणोत्तर पद्मविभूषण मिळावा
अजितदादांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत महाराष्ट्राच्या सामाजिक, आर्थिक आणि औद्योगिक विकासाला एक नवी दिशा दिली. एक कणखर प्रशासक, अहोरात्र कष्ट करणारे लोकप्रतिनिधी आणि ‘अॅक्शन ओरिएंटेड’ नेते म्हणून त्यांनी जनमानसावर अधिराज्य गाजवले. त्यांच्या या महान राष्ट्रसेवेचा आणि नेतृत्वाचा यथोचित सर्वोच्च गौरव म्हणून त्यांना भारत सरकारचा अत्यंत मानाचा ‘पद्मविभूषण’ (मरणोत्तर) पुरस्कार जाहीर व्हावा, ही महाराष्ट्रातील तमाम जनतेची आणि आम्हा सर्वांची तीव्र भावना आहे.
राज्याचे अर्थमंत्री म्हणून त्यांनी विक्रमी वेळा राज्याचा अर्थसंकल्प मांडून प्रत्येक क्षेत्राला न्याय दिला. पायाभूत सुविधा, रस्ते विकास, मेट्रो आणि सिंचन क्षेत्रात त्यांनी घेतलेले निर्णय क्रांतिकारी ठरले.महाराष्ट्रातील सहकार चळवळ मजबूत करण्यात आणि शेतकऱ्यांना संकटकाळात थेट आर्थिक मदत मिळवून देण्यात त्यांनी नेहमीच आग्रही भूमिका घेतली होती.
अजितदादांचे अचानक जाणे हे एका युगाचा अंत झाल्यासारखे आहे. अशा या महान लोकनेत्याच्या अथांग परिश्रमांचा, दूरदृष्टीचा आणि जनसेवेचा मरणोत्तर सर्वोच्च सन्मान होणे हे संपूर्ण राज्यासाठी आणि देशासाठी अभिमानास्पद ठरेल. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे अर्थमंत्री आणि लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी शेती, सिंचन, रस्ते आणि सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. त्यांच्या कार्याची दखल घेऊन केंद्र सरकारने त्यांना ‘पद्मविभूषण’ पुरस्कार द्यावा अशी शिफारस महाराष्ट्र शासनाने तातडीने केंद्राकडे पाठवावी, अशी विनंती पत्रात करण्यात आली आहे. हे विनंती पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा आणि विधानपरिषदेतील सर्व आमदारांच्यावतीनं देण्यात आलं आहे.
Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून