Rohit Pawar Baramati janta Darbar: राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार पक्ष) कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) हे सध्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणात कमालीचे सक्रिय झाले आहेत. याच सक्रियतेचा पुढचा आणि अत्यंत महत्त्वाचा टप्पा आज बारामतीत पाहायला मिळणार आहे. आमदार रोहित पवार यांनी आज बारामतीमध्ये एका ‘जनता दरबारा’चे आयोजन केले आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी 2029 च्या निवडणुकीबाबत केलेल्या विधानाच्या पार्श्वभूमीवर या जनता दरबारामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आमदार रोहित पवार यांचा हा जनता दरबार आज दुपारी ठीक 3 वाजता सुरू होणार आहे. बारामतीमधील शारदानगर येथील प्रतिष्ठित ‘आप्पासाहेब पवार सभागृहात’ हा कार्यक्रम पार पडणार आहे. या जनता दरबाराच्या माध्यमातून रोहित पवार बारामतीमधील नागरिकांशी थेट संवाद साधणार असून त्यांच्या स्थानिक समस्या जाणून घेणार आहेत.
Rohit Pawar: बारामतीत ‘रोहित दादा’ ॲक्टिव्ह
बारामती हा प्रदीर्घ काळापासून पवार कुटुंबाचा, विशेषतः उपमुख्यमंत्री अजित पवार (अजितदादा) यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र, अजित पवार यांच्या निधनानंतर गेल्या काही दिवसांपासून बारामती विधानसभा मतदारसंघात रोहित पवार यांनी आपले लक्ष केंद्रित केल्याचे दिसत आहे. त्याचा पुढचा टप्पा म्हणजे आज आप्पासाहेब पवार सभागृहात रोहित पवार जनता दरबार घेत आहेत. त्यामुळे बारामतीचा पुढचा दादा कोण? हे ठरवण्यासाठी आणखी एका दादाची बारामती भर पडत आहे का? अशी चर्चा आता रंगली आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी आमदार रोहित पवार यांनी 2029 च्या विधानसभा निवडणुकीबाबत बोलताना अत्यंत महत्त्वाचे संकेत दिले होते. भविष्यात बारामतीत पुन्हा एकदा पवार कुटुंबातील सदस्यांमधील थेट राजकीय सामना होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. आता रोहित पवार बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये रोहित पवार ॲक्टिव्ह झाल्याने ते ही तयारी 2029 सालच्या निवडणुकीच्या दृष्टीने करत आहेत का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.
Rohit Pawar: पेट्रोल-डिझेल दरवाढीवरून रोहित पवारांचा सरकारवर निशाणा
दरम्यान, आज देशात पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत सरकारवर निशाणा साधलाय. देशात पेट्रोल-डिझेलचे दर मेलोडीच्या चॉकलेटप्रमाणे दर तीन-चार दिवसांनी लिटरमागे 1– 1 रुपयांनी वाढत असून आज त्यात पुन्हा वाढ झाली. पुढील काही दिवसांत मेलोडी चॉकलेटच्या पॅकेटप्रमाणे प्रति लिटर 50 रुपये वाढ झाली तरी आश्चर्य वाटणार नाही. शिवाय 50 रुपये वाढ झाली म्हणून तुम्हाला कुणी 1 लिटर पेट्रोल-डिझेल गिफ्टही देणार नाही आणि पंपावर तासनतास रांगेत उभं राहूनही पेट्रोल-डिझेल मिळेलच याचीही खात्री नाही.
सुरवातीला टाळ्या-थाळ्या वाजवण्याचा प्रयोग झाल्यानंतर आता परदेशात फिरु नका, पेट्रोल-डिझेल वाचवा, सोनं खरेदी करु नका, तेल खाऊ नका असं लोकांना सांगणारं स्वातंत्र्यानंतरचं पहिलं सरकार अशी ‘दैदिप्यमान’ कामगिरी या सरकारने केलीय. ‘अच्छे दिन’च्या नावाखाली सत्तेत आलेल्या या सरकारने देशभरातील झुरळांची अशा प्रकारे जिरवण्याचं काम सुरु केलंय, पण त्रस्त झुरळं आता संघटीत होत असून सरकारसाठी ही धोक्याची घंटा आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
आणखी वाचा