Ranveer Singh Responds After FWICE Ban: बॉलिवूडचा (Bollywood News) बाजीराव आणि असंख्य तरुणींच्या गळ्यातील ताईत असणारा रणवीर सिंह (Ranveer Singh) सध्या अडचणीत सापडला आहे. आताही अडचणीत अडकण्याचं कारण एक सिनेमाच आहे, तो म्हणजे, ‘डॉन 3’ (Don 3). रणवीर सिंह (Actor Ranveer Singh) याच्याविरोधात फिल्म वर्कर्सची मोठी संस्था FWICE म्हणजेच, फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजनं (Federation of Western India Cine Employees) मोठं पाऊल उचललं आहे. FWICE नं रणवीर सिंह याला बॅन केलं (FWICE Banned Ranveer Singh) असून त्याच्याविरोधात ‘नॉन-कोऑपरेशन डायरेक्टिव्ह’ (Non-Cooperation Directive) जारी करण्यात आला आहे. यानुसार सिनेसृष्टीतील विविध संघटना आणि संबंधित घटकांना रणवीर सिंह याच्यासोबत काम न करण्याचे निर्देश देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, दिग्दर्शक फरहान अख्तर याचा ‘डॉन 3’च्या शुटिंगला सुरुवात होण्याच्या फक्त काहीच दिवस आधी रणवीर सिंहनं अचानक सिनेमातून माघार घेतली. याच पार्श्वभूमीवर FWICE कडून त्याच्यावर कारवाई करत बॅन करण्यात आलं आहे. या घडामोडींमुळे सिनेमाच्या निर्मितीवर परिणाम झाल्याचा दावा केला जात असून, त्यातूनच FWICE नं कठोर भूमिका घेतल्याची चर्चा आहे.
रणवीर सिंहच्या अडचणींमध्ये वाढ
‘डॉन 3’ सिनेमासंदर्भात सुरू असलेल्या वादात ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज’ (FWICE) मध्यस्थी करण्यासाठी पुढे आली होती. ‘न्यूज18’च्या वृत्तानुसार, फेडरेशनचे मुख्य सल्लागार अशोक पंडित यांनी हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचं म्हटलं होतं. तसेच, सिनेमाचं शुटिंग सुरू होण्याच्या काही दिवस आधी कलाकारानं असा प्रोजेक्ट सोडण्याच्या वाढत्या प्रवृत्तीबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केलेली. या प्रकरणावर सविस्तर चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात येणार असून त्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलेलं.
दरम्यान, ‘डॉन 3’ हा सिनेमा आधीपासूनच विविध कारणांमुळे विलंबाचा सामना करतोय. सिनेमातली मोठी स्टारकास्ट आणि त्यासंबंधित घडामोडींमुळे तो सातत्यानं चर्चेत राहिला आहे. यापूर्वी FWICEचे अध्यक्ष बी. एन. तिवारी, मुख्य सल्लागार अशोक पंडित, मुख्य सचिव अशोक दुबे आणि खजिनदार गंगेश्वरलाल श्रीवास्तव हे या विषयावर महत्त्वाच्या अंतर्गत बैठकीत सहभागी होणार असल्याची माहिती समोर आली होती. या बैठकीनंतर फेडरेशनच्या भूमिकेची अधिकृत घोषणा करण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली जाईल, अशीही अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती.
बॅन झाल्यानंतर रणवीर सिंहकडून निवेदन जारी
FWICE च्या निर्णयाला प्रतिसाद म्हणून, रणवीर सिंहच्या प्रवक्त्यानं एक निवेदन जारी केलं असून त्यात असं म्हटलंय की, “रणवीर सिंह सिनेसृष्टीचा, आणि ‘Don’ फ्रँचायझीशी संबंधित असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा, अत्यंत आदर करतो. ‘डॉन 3’ संदर्भात अलीकडे घडलेल्या घडामोडींविषयी त्यानं पूर्णपणे मौन बाळगणं पसंत केलंय. व्यावसायिक बाबींची उकल नेहमीच सन्मान, प्रगल्भता आणि परस्पर आदरानं व्हायला हवी, असा त्याचा ठाम विश्वास आहे.
“काही काळापासून विविध अफवा आणि बातम्या समोर येत आहेत, या तर्कवितर्कांवर सार्वजनिकरित्या प्रतिक्रिया देण्याची किंवा त्यात सहभागी होण्याची गरज रणवीरला कधीच वाटली नाही. त्याचं संपूर्ण लक्ष केवळ त्याच्या कामावर आणि आगामी प्रोजेक्ट्सवर केंद्रीत आहे. ‘डॉन 3’ फ्रँचायझीशी संबंधित असलेल्या प्रत्येकाबद्दल त्याच्या मनात आदर आणि सदिच्छा आहेत. तसेच, या मालिकेची यशाची मालिका भविष्यातही अशीच अखंड सुरू राहावी, अशी त्याची मनापासून इच्छा आहे. अशा प्रसंगी मौन बाळगणं आणि शांत, संयमितपणे वागणं ही नेहमीच त्याची वैयक्तिक पसंती राहिली आहे आणि भविष्यातही तो याच दृष्टिकोनाचं पालन करण्याचा मानस असल्याचं रणवीरचं म्हणणं आहे…”
रणवीर-फरहान वाद कधी मिटणार?
‘डॉन 3’ सिनेमा गेल्या अनेक वर्षांपासून विविध कारणांमुळे रखडलाय. रणवीर सिंह यांच्याआधी अभिनेत्री कियारा अडवाणी हिनंही हा प्रकल्प सोडला होता. गर्भधारणेमुळे तिनं सिनेमातून माघार घेतल्याचं सांगितलं गेलं. त्यानंतर मुख्य खलनायकाची भूमिका साकारणार असल्याची चर्चा असलेले विक्रांत मेसी यांनीदेखील सिनेमातून बाहेर पडल्याची बातमी समोर आली. मात्र, वादाला खऱ्या अर्थानं तोंड फुटलं ते रणवीर सिंह यांनी सिनेमा सोडल्यानंतर.
‘धुरंधर’सारखा मोठा ब्लॉकबस्टर सिनेमा दिल्यानंतर रणवीर सिंह यानं अचानक ‘डॉन 3’मधून माघार घेतल्यानं निर्मात्यांचं मोठं नुकसान झाल्याचा दावा करण्यात आलाय. निर्माते फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांनी रणवीर यानं सिनेमाच्या शुटिंगला अवघे दहा दिवस शिल्लक असताना प्रोजेक्ट सोडल्याचा आरोप केला. त्यामुळे प्रोडक्शन हाऊसला मोठा आर्थिक फटका बसल्याचंही त्यांनी म्हटलंय.
दुसरीकडे, रणवीर सिंह यानं या आरोपांना उत्तर देताना सिनेमाच्या कामात सातत्यानं विलंब होत असल्याचं सांगितलं. तसेच, सिनेमाच्या पटकथेवरही आपण समाधानी नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. या वादानंतर फरहान अख्तर यांनी रणवीर यांच्याकडे 40 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केल्याचं वृत्त आहे. मात्र, ही रक्कम अद्याप भरलेली नसल्याचं सांगितलं जातंय. आता FWICE कडून रणवीर सिंह यांच्याविरोधात कथितपणे नॉन-कोऑपरेशनची भूमिका घेतल्यानंतर हा वाद कोणत्या दिशेनं जातो आणि रणवीर पुढे काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण सिनेसृष्टीचं लक्ष लागलंय.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
ABP माझाच्या बातम्या LIVE…
https://www.youtube.com/watch?v=Jx7-0SL4Tq4
आणखी वाचा