अन्न व औषध प्रशासन विभागाचा मोर्चा आता पुण्याकडे, स्वारगेट परिसरात टाकली अचानक धाड


पुणे : सनदी अधिकारी तुकाराम मुंढेंनी (Tukaram mundhe) अन्न व औषध प्रशासन विभागाचा पदभार स्वीकारताच आपलं काम दाखवून दिलंय. कालच तुकाराम मुंढेंनी पत्रकार परिषद घेऊन विभागाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यापासून गेल्या महिनाभरात  त्यांच्या विभागाने केलेल्या कारवाईची माहिती दिली. तसेच, यापुढे गुटखा, तंबाखूनजन्य पदार्थांच्या उत्पादकांपासून ते विक्रेते आणि ग्राहकांवरही मकोका (Mcoca) अंतर्गत कारवाई केली जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली. त्यामुळे, पुन्हा एकदा गुटखा विक्रेते आणि मेडिकल क्षेत्रातील काळे धंदेवाल्याचे धाबे दणाणले आहेत. अशातच राज्यातील विविध शहरानंतर आता अन्न व औषध प्रशासन विभागानं (एफडीएने) आपला मोर्चा पुण्याकडे वळवला आहे. पुण्यात धाड सत्र सुरु करण्यात आलं आहे. 

जोपर्यंत स्वच्छता होत नाही तोपर्यंत दुकान बंद ठेवण्याचे आदेश

अन्न व औषध प्रशासन विभागानं पुण्यातील स्वारगेट बस स्टॉप वर असलेल्या सगळ्या दुकानांवर अचानक धाड टाकली आहे. आयुक्त तुकाराम मुंडे यांची टीम पुण्यातल्या स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये पाच ते साडेपाचच्या दरम्यान दाखल झाली होती. विविध दुकानांमध्ये पाहणी करून त्यांची माहिती घेऊन सूचना सांगण्यात आल्या. दुकाने देखील खाली करुन जोपर्यंत स्वच्छता होत नाही तोपर्यंत दुकान बंद ठेवण्याचे सांगण्यात आले आहे.

आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या रुग्णालयांवर कडक कायदेशीर कारवाई होणार

तुकाराम मुंढे यांनी गुटखा, तंबाखूजन्य पदार्थांसह, हॉटेल व्यवासायिकांसह, दूध भेसळांवरील कारवाईचा धडाका लावल्यानंतर मेडिकल दुकानदारांनाही इशारा दिला आहे. रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या रुग्णांना औषधे आणि वैद्यकीय साहित्य रुग्णालयाच्याच आत असणाऱ्या अधिकृत फार्मसीमधून (मेडिकल) खरेदी करण्याची सक्ती करणाऱ्या रुग्णालयांना अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने मोठा दणका दिला आहे. “रुग्णालयातील फार्मसीमधूनच औषध खरेदी करणे कायद्याने बंधनकारक नाही. औषधे कुठून खरेदी करायची, हा सर्वस्वी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांचा अधिकार आहे,” असा महत्त्वपूर्ण आदेश एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जारी केला आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या रुग्णालयांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी पत्रकार परिषदेत दिला.

अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 अंतर्गत गुटखा आणि निकोटीनयुक्त पानमसाल्यावर आधीपासूनच बंदी आहे. मात्र बनावट कागदपत्रे, बेनामी व्यवहार, गुप्त गोदामे आणि आंतरराज्य पुरवठा साखळीच्या माध्यमातून हा व्यापार सुरू असल्याचे अनेक तपासांतून समोर आले आहे. त्यामुळे अशा प्रकरणांकडे आता केवळ अन्नसुरक्षा उल्लंघन म्हणून नव्हे, तर संघटित गुन्हेगारी म्हणून पाहिले जाणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *