Raj Thackeray: जगाचा इतिहास सांगतो की, जेव्हा सत्ताधारी समोरचे विरोधक संपवतात, तेव्हा त्यांच्यातच (स्वतःच्याच पक्षात) दुश्मन तयार होतात आणि तेच त्यांना संपवतात. ही विरोधक निर्माण होण्याची प्रक्रिया आता भाजपमध्ये सुरू झाली असल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. सध्या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुरू असलेले राजकारण खूप घाणेरडे, भयानक आणि गलिच्छ असल्याचे ते म्हणाले. आमदार खासदारांच्या खरेदी-विक्रीवर भाष्य करताना ते म्हणाले की, प्रश्न विकत घेणाऱ्यांचा नाही, तर विकले जाणाऱ्यांचा आहे; जर कुणी देहविक्रीला तयारच असतील, तर त्यासाठी गिऱ्हाईक असतातच.
हे सर्व अमित शहांचे राजकारण
राज ठाकरे म्हणाले, सत्तेचा अमरपट्टा कोणीही घेऊन आलेला नसतो. उद्या सत्ता गेल्यावर सध्या सुरू असलेल्या या गलिच्छ आणि फोडाफोडीच्या राजकारणाचा फटका भविष्यात भारतीय जनता पक्षाला नक्कीच बसेल आणि त्यांनाही याचा त्रास होईल. हे सर्व अमित शहांचे राजकारण सुरू आहे, ज्यामध्ये शिवसेनेचे आणि टीएमसीचे खासदार फोडून त्यांना भाजपमध्ये न घेता त्यांचा वेगळा गट करण्यात आला; जेणेकरून भविष्यात पंतप्रधान पदावर दावा सांगताना अंतर्गत विरोध झालाच, तर या बाहेरील गटांचा पाठिंबा मिळवता येईल. सध्याचे भाजपचे राजकारण हे पत्त्याच्या उलट्या बंगल्यासारखे आहे. यात सर्वात खालचा पत्ता नरेंद्र मोदींचा आहे, तो पत्ता एकदा सटकला की सगळं कोलमडून पडेल. आज जे काही टिकून आहे, ते फक्त मोदींवरती टिकून आहे, बाकीच्यांवर नाही, असे त्यांनी नमूद केले.
ममतांचा पराभव साधी सरळ गोष्ट नाही
एसआयआरवर ते म्हणाले, दरवर्षी नवीन मुले 18 वर्षांची होतात, त्यामुळे मतदार याद्यांची नोंदणी ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. परंतु, या सगळ्या प्रक्रियेचा सगळ्यात मोठा फटका पश्चिम बंगाल आणि बिहारला बसला असून, तिथे 27 लाख मते काढली गेली. यामुळे ममता बॅनर्जींसारख्या मुख्यमंत्र्यांचा पराभव होतो, ही काही साधी सरळ गोष्ट नाही आणि यात मोठी सरकारी यंत्रणा लावली जाते, असा आरोप त्यांनी केला.
शहरांच्या उभारणीकडे कोणाचेही लक्ष नाही
राज यांनी सांगितले की, पहिल्याच पावसात मुंबई आणि ठाण्यात बऱ्याच ठिकाणी पाणी साचले आणि चेंबूरमध्ये बसवर झाड कोसळले शहरांच्या उभारणीकडे कोणाचेही लक्ष नाही. आपल्याकडे ‘डेव्हलपमेंट प्लान’ येतो पण ‘टाऊन प्लॅनिंग’ होत नाही. नुसते रस्ते आणि उड्डाणपूल बांधून शहरे उभी राहत नाहीत. केवळ बिल्डरांना प्लॉट देत राहणे, त्यातून पैसे मिळवणे आणि पैशातून पुन्हा फोडाफोडीचे राजकारण करणे, एवढेच फक्त आता महाराष्ट्रात सुरू आहे, ठाण्यासारख्या शहरात योग्य नियोजनाअभावी अनेक जुनी झाडे पडत आहेत, असे त्यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या
Operation Tutari Special Report : राज्यात ऑपरेशन तुतारी? शरद पवार गटात दोन मतप्रवाह