Pawanraje Nimbalkar Case : पवनराजे खटल्याच्या निकालावर एकनाथ शिंदे अमित शाहशी बोलले, यावर पद्मसिंह पाटील यांच्या आमदारपुत्राची प्रतिक्रिया काय? – Marathi News | After Padamsinh Patil Acquittal in pawanraje nimbalkar death case his son rana jagjitsinha first reaction


पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात आज निकाल लागला. तब्बल 20 वर्षानंतर कोर्टाने निकाल देताना मुख्य आरोपी पद्मसिंह पाटील आणि अन्य आठ आरोपींची निर्दोष मुक्तता केली. माफीच्या साक्षीदारावर विश्वास ठेवता येणार नाही असं न्यायालयाचं म्हणणं होतं. यावर आता पद्मसिंह पाटील यांचे सुपूत्र राणा जगजीतसिंह बोलले आहेत. “पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या कारचा चालक समद काझी यांची दुर्देवी हत्या झाली. त्याला 20 वर्ष झाली. गेली 17 वर्ष हा कायदेशीर खटला सुरु होता. न्याया देवतेवर आमचा पूर्ण विश्वास होता. 17 वर्षांनी न्याय देवतेने आम्हाला न्याय दिला आहे” असं राणा जगजीत सिंह म्हणाले. “जे लोक यात होते, त्यांची 17 वर्ष कोण परत करणार. पद्मसिंह पाटील यांची परिस्थिती पाहिली, त्यांना 17 वर्ष सहन करावं लागलं. त्यांचा संबंध नव्हता. राजकीय षडयंत्रण त्यांच्याविरोधात केलं” असा दावा पद्मसिंह पाटील यांचे सुपूत्र राणा जगजीत सिंह यांनी केला.

“टप्याटप्याने या गोष्टी पुढे येतील. निश्चितपणी आम्ही समाधानी आहोत. न्याय देवतेने आम्हाला न्याय दिला. डॉक्टर पद्मसिंह पाटील यांना मी समजावू शकत नाही, अशी परिस्थिती आहे. ही परिस्थिती कशामुळे आली, कोणी षडयंत्र केलं. कोण-कोण प्यादे होते. पद्मसिंह पाटील 1990 साली मुख्यमंत्री होणार होते, त्यांना तसा शब्द दिलेला. पण काही कारणामुळे ते होऊ शकलं नाही. 2009 साली ते खासदार म्हणून निवडून आले. साधारणत: त्या कालावधीत मंत्रिमंडळ विस्तार होणार होता. पण त्यावेळी काही लोकांनी या बाबतीत पुढाकार घेऊन षडयंत्र रचलं” असा आरोप राणा जगजीत सिंह यांनी केला.

सीबीआय या प्रकरणी उच्च न्यायालयात जाणार

“आई तुळजाभवानीचा आशिर्वाद पद्मसिंह पाटील यांच्यामागे आहे. लाखो करोडो जनतेचा त्यांच्यावर विश्वास, प्रेम आहे. न्याय देवतेने न्याय दिला” असं राणा जगजीत सिंह बोलले. “इतके दिवस आम्ही जास्त बोललो नाही, कारण हे सर्व न्याय प्रविष्ट होतं. काहीजण याचा राजकीय फायदा घेत होते. चुकीची विधान करत होते. पण या बद्दल मी काही बोललो नाही. योग्यवेळी गरजेनुसार बोलेन” असं राणा जगजीत सिंह बोलले. सीबीआय या प्रकरणी उच्च न्यायालयात जाणार आहे, एकनाथ शिंदे अमित शाह यांच्याशी बोलले आहेत. यावर राणा जगजीत सिंह बोलले की, “माझा न्याय देवतेवर पूर्ण विश्वास आहे. न्यायालयीन प्रक्रियेनुसार आम्ही आमची बाजू ठामपणे मांडू. आम्हाला न्याय मिळेल”

या गोष्टीच्या खोलात गेलात, तर अनेक गोष्टी लक्षात येतील

“या खटल्याच्या निकालाला 17 वर्ष लागली. कोणी वेळकाढूपणा केला हे आज ना उद्या मी सांगिन. हे धाराशिवचं राजकारण नव्हतं, महाराष्ट्राच राजकारण होतं. या गोष्टीच्या खोलात गेलात, तर अनेक गोष्टी लक्षात येतील. राजकीय टिप्पणी करणार नाही” असं राणा जगजीत सिंह म्हणाले. “पवनराजे निंबाळकर यांची हत्या कोणी केली? काय कारणं आहेत? हे समोर आलं पाहिजे. योग्य तपास झाला तर खरे आरोपी समोर येतील” असं राणा जगजीत सिंह बोलले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *