Hasan Mushrif on Amit Shah: देशाच्या स्वातंत्र्यानंतर पहिले गृहमंत्री म्हणून सरदार वल्लभभाई पटेल हे कणखर गृहमंत्री म्हणून होते. त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संस्थाने खालसा केली आणि देश एक करण्याचं काम केलं. अशाच प्रकारचा सरदार वल्लभभाई पटेल यांच्यानंतर एक तगडा गृहमंत्री या देशाला मिळाला की जो आपल्या कोल्हापूरचा जावई आहे, याचा आपल्या सर्वांना अभिमान असला पाहिजे, अशा शब्दात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी कौतुकाचा पाऊस पाडला.
साखर कारखान्याच्या अडचणी मांडणार
हसन मुश्रीफ म्हणाले की, मी 40-45 वर्षे या सहकाराशी जुळलो आहे. आज जिल्हा मध्यवर्ती बँकेचा 45 वर्षे मी अध्यक्ष आहे. आणि या निमित्ताने जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आणि सहकारी साखर कारखान्याच्या अनेक अडचणी आज आम्ही इचलकरंजीमध्ये त्यांच्यासमोर मांडणार आहोत. या क्षेत्रामध्ये पहिलं पाऊल उचलत त्यांनी विकास सेवा संस्थांचं, त्याचं पॅक्स पुनरुज्जीवन करणं, संघीकरण करणं, हे फार महत्त्वाचं पाऊल त्यांनी उचललेलं आहे. सहकारातला एक कार्यकर्ता म्हणून मी मनःपूर्वक त्यांचं अभिनंदन करतो. त्यांनी सांगितले की, मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचेही अभिनंदन करतो. 1400 कोटी रुपये देऊन अनेक वर्षे ज्या आराखड्याची मी वाट पाहत होतो, त्या आई अंबाबाईच्या आराखड्याची सुरुवात या निमित्ताने झाली आहे.
‘विकास भी, विरासत भी’ या मंत्राखाली काम सुरू
दरम्यान, अमित शाह म्हणाले की, माता अंबाबाईच्या निवासस्थानी महाराष्ट्र सरकार जीर्णोद्धार आणि कॉरिडोअरचे काम करत आहे. यामुळे देशभरातील भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. हा कॉरिडोअर 1500 कोटी रुपयांच्या खर्चातून 28 हजार चौ. मीटर जागेवर उभारला जाईल. यामुळे 7व्या शतकातील हे मंदिर पुन्हा नव्या ऊर्जेने भक्तांच्या स्वागतासाठी सज्ज होईल पुरातत्व विभागाशी चर्चा करून आसपासच्या 41 लहान-मोठ्या मंदिरांचे जतन करत हे काम केले जाईल. संपूर्ण मंदिर परिसरात आधुनिक एआय (AI) कॅमेरे, एलईडी प्रकाश व्यवस्था, आउटडोर गॅलरी, लाईट अँड साऊंड शो, बहुउद्देशीय हॉल, अन्नछत्र आणि पोलीस चौकी यांसारख्या सुविधा 6 महिन्यांत पूर्ण केल्या जातील. देशात ‘विकास भी, विरासत भी’ या मंत्राखाली काम सुरू आहे. अयोध्येतील भव्य राम मंदिर, काशी विश्वनाथ कॉरिडोअर, केदारनाथ-बद्रीनाथ धाम, सोमनाथ मंदिर आणि कामाख्या कॉरिडोअरनंतर आता अंबाबाईचा कॉरिडोअर बनत आहे. देशाच्या सुरक्षिततेचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, देशाच्या सीमांमधून होणारी घुसखोरी पूर्णपणे बंद केली जाईल आणि देशभरातील घुसखोरांना बाहेर काढले जाईल.
इतर महत्वाच्या बातम्या
Sushma Andhare On Krishna Ashtikar : कृष्णा आष्टीकर तू उद्धव ठाकरेंसोबत असशील तर उद्या बापाचं पिंडदान करुन दाखव- सुषमा अंधारे