Parthiv Patel Set To Replace Ajit Agarkar : रोहित शर्मा, सूर्याला कर्णधारपदावरुन हटवणाऱ्या अजित आगरकरांचा गेम ओव्हर? एक Coming Soonची पोस्ट अन् भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ


Parthiv Patel Set To Replace Ajit Agarkar : भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू पार्थिव पटेल हे पुरुषांच्या वरिष्ठ निवड समितीचे अध्यक्ष म्हणून अजित आगरकर यांची जागा घेऊ शकतात, अशी चर्चा सुरू झाली आहे. पार्थिव पटेलच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे या चर्चांना आणखी उधाण आले आहे. पार्थिवने ‘एक्स’वर ‘Coming soon. I’m in’ अशी पोस्ट केली आहे. या पोस्टनंतर पार्थिव पटेल लवकरच बीसीसीआयच्या मुख्य निवडकर्त्याची जबाबदारी स्वीकारणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. मात्र, बीसीसीआयकडून अद्याप याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

अजित आगरकरांच्या कार्यकाळात भारतीय संघाच्या नेतृत्वात मोठे बदल झाले. रोहित शर्मा याच्याकडून टी-20 कर्णधारपदाची जबाबदारी सूर्यकुमार यादवकडे आली होती. त्यानंतर संघाच्या नेतृत्वाची रचना पुन्हा बदलली आणि भारतीय टी-20 क्रिकेट संघाच्या कर्णधारपदावरून सूर्यकुमार यादवच्या जागी श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याला नवीन कर्णधार बनवण्यात आले आहे. त्यामुळे अगरकरांच्या काळातील निवड प्रक्रियेकडे सातत्याने लक्ष राहिलं.

गेल्या काही महिन्यांपासून पार्थिवच्या नावाची चर्चा

पार्थिव पटेलच्या नावाची गेल्या काही महिन्यांपासून निवडकर्ता पदासाठी चर्चा सुरू आहे. जर त्याची नियुक्ती झाली, तर सध्याच्या निवड समितीमध्ये तो सर्वात वरिष्ठ सदस्य ठरतील. पार्थिवने भारताकडून 25 कसोटी सामने खेळले आहेत. निवड समितीतील एस. एस. दास याने 23, प्रज्ञान ओझाने 24, आर. पी. सिंहने 14, तर अजय रात्राने 6 कसोटी सामने खेळले आहेत.

आगरकरांची अखेरची निवड बैठक?

अजित आगरकरच्या नेतृत्वाखालील निवड समितीने नुकतीच वेस्ट इंडिजविरुद्धच्या 3 वनडे आणि 5 टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची निवड केली. याशिवाय इराणी कपसाठी ‘रेस्ट ऑफ इंडिया’ संघाचीही निवड करण्यात आली. ही आगरकर यांची मुख्य निवडकर्ता म्हणून अखेरची निवड बैठक ठरू शकते, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. भारत-अफगाणिस्तान टी-20 मालिकेतील सामनाही आगरकर यांनी दिल्लीमध्ये पाहिला होता. त्यावेळी त्यांच्यासोबत निवड समितीतील आर. पी. सिंह आणि अजय रात्रा हे देखील उपस्थित होते.

BCCI च्या बैठकीनंतर चर्चांना वेग

भारत-अफगाणिस्तान मालिकेतील दुसऱ्या टी-20 सामन्याला आयसीसीचे चेअरमन जय शाह, बीसीसीआयचे अध्यक्ष मिथुन मन्हास आणि उपाध्यक्ष राजीव शुक्ला हेही उपस्थित होते. मुंबईत झालेल्या बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर राजीव शुक्ला यांनी निवडकर्त्यांबाबत निर्णय घेण्याचा अधिकार पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे सांगितले. त्यामुळे आता मुख्य निवडकर्ता बदलाच्या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे.

हाय-प्रोफाइल रिव्ह्यू मीटिंगमध्ये आगरकर गैरहजर

दरम्यान, भारतीय क्रिकेटच्या भविष्यासंदर्भात झालेल्या महत्त्वाच्या रिव्ह्यू बैठकीत अजित आगरकर उपस्थित नव्हते. या बैठकीला मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर, कसोटी आणि वनडे कर्णधार शुभमन गिल, टी-20 कर्णधार श्रेयस अय्यर आणि CoE प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्यासह बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी आगरकर शहराबाहेर असल्यामुळे बैठकीला उपस्थित राहू शकले नसल्याचे सांगितले होते. मात्र, बैठकीचे नियोजन आधीपासूनच करण्यात आले असल्याने अगरकर यांच्या अनुपस्थितीबाबत चर्चा रंगली.

2027 वनडे वर्ल्ड कपच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय?

भारतीय क्रिकेटसाठी आगामी 12 महिने अत्यंत महत्त्वाचे आहेत. 2027 वनडे वर्ल्ड कप आणि सध्याच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सायकलच्या तयारीला आता वेग येणार आहे. या पार्श्वभूमीवर निवड समितीच्या अध्यक्षपदावर बदल होणार का, याकडे क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे. काही जण अजित अगरकर यांना कायम ठेवण्याच्या बाजूने असल्याची चर्चा आहे, तर काही प्रभावशाली मंडळी पार्थिव पटेल यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्याच्या विचारात असल्याचे बोलले जात आहे.

हे ही वाचा –

Gautam Gambhir On Shubman Gill : बुमराहपासून श्रेयसपर्यंत सगळे बाहेर; शुभमन गिल एकटा पडतोय, कोच गौतम गंभीर ODI वर्ल्ड कपआधी टीमबद्दल नेमकं काय म्हणाला?



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *