Last Updated:
दक्षिण आशियात एका नव्या देशाच्या निर्मितीचे संकेत दिल्याने बलुचिस्तानच्या स्वातंत्र्य चळवळीची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे पाकिस्तानच्या भवितव्याबाबत नव्या चर्चांना उधाण आले आहे.
नवी दिल्ली/ काबुल: अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे पाकिस्तानच्या भवितव्याबाबत नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. सालेह यांनी थेट कोणत्याही देशाचे नाव न घेता दक्षिण आशियात एका नव्या देशाच्या निर्मितीची सुरुवातीची चिन्हे दिसत आहेत, असे म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर अनेकांनी त्याचा संबंध बलुचिस्तान किंवा पश्तूनिस्तानच्या स्वातंत्र्य चळवळीशी जोडला आहे.
सोमवारी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये सालेह यांनी, आपल्या प्रदेशात एक नवीन देश उदयास येण्याची सुरुवात झाली आहे. तुमच्या मते त्या देशाचे नाव काय असेल? असा प्रश्नही विचारला. त्यांनी कोणत्याही प्रदेशाचे नाव स्पष्टपणे घेतले नसले तरी त्यांच्या अलीकडील पोस्ट पाहता त्यांचा रोख बलुचिस्तानकडे असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
अमरुल्ला सालेह हे अफगाणिस्तानमध्ये तालिबान सत्तेवर येण्यापूर्वी उपराष्ट्रपती होते. 2021 मध्ये तालिबानने काबूलवर ताबा मिळवल्यानंतर त्यांनी देश सोडला. ते तालिबानचे कट्टर विरोधक मानले जातात. त्याचबरोबर पाकिस्तानच्या लष्करावरही त्यांनी अनेकदा कठोर टीका केली आहे.
गेल्या आठवड्यात बलुचिस्तानमध्ये झालेल्या एका हल्ल्यानंतर त्यांनी पाकिस्तान सरकार, पाकिस्तानी लष्कर आणि काबूल प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या महिन्यात त्यांनी बलुचिस्तानमधील हिंसाचार आणि तेथील परिस्थितीवर अनेक वेळा भाष्य केले आहे.
There are preliminary signs that a new country will be born in our region. Guess its name.
— Amrullah Saleh (@AmrullahSaleh2) July 13, 2026
बलुचिस्तानमध्ये पाकिस्तान सरकार आणि लष्कराविरोधातील संघर्ष नवा नाही. अनेक दशकांपासून तेथील काही संघटना स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी करत आहेत. मात्र गेल्या काही महिन्यांत हा संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. एका बाजूला सशस्त्र बलुच गटांनी पाकिस्तानी लष्करावर हल्ले वाढवले आहेत तर दुसऱ्या बाजूला स्थानिक संघटनांनी मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू ठेवले आहे.
पाकिस्तानी लष्कराने अनेक वर्षे कठोर कारवाया करून हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला आहे. अलीकडच्या काळातही सुरक्षा दलांनी अनेक ऑपरेशन्स राबवली आहेत. तरीही विविध माध्यमांतील अहवालांनुसार बलुचिस्तानातील काही भागांवरील पाकिस्तान सरकारचे नियंत्रण कमकुवत झाले असून काही ठिकाणी स्थानिक सशस्त्र गटांचा प्रभाव वाढल्याचे सांगितले जाते. काही सरकारी इमारतींवरही बंडखोरांनी ताबा मिळवल्याचे दावे करण्यात आले आहेत. मात्र या दाव्यांची स्वतंत्रपणे अधिकृत पुष्टी झालेली नाही.
1947 मध्ये भारताच्या फाळणीनंतर पाकिस्तानची स्थापना झाली. त्यानंतर 1971 मध्ये पूर्व पाकिस्तान वेगळा होऊन बांगलादेशची निर्मिती झाली आणि पाकिस्तानचे पहिले विभाजन झाले. आता बलुचिस्तानमधील वाढत्या असंतोषामुळे पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा देशाच्या अखंडतेबाबत चर्चा सुरू झाली आहे. काही विश्लेषकांच्या मते परिस्थिती गंभीर असली तरी स्वतंत्र देशाची निर्मिती होईल, असा निष्कर्ष काढणे सध्या घाईचे ठरेल.
बलुचिस्तानमधील अस्थिरतेसाठी पाकिस्तान सरकार आणि लष्कर अनेकदा भारतावर आरोप करत आले आहेत. तसेच काही पाकिस्तानी विश्लेषकांनी अफगाणिस्तान आणि इस्रायल यांच्यावरही या संघर्षाला पाठिंबा देत असल्याचे आरोप केले आहेत. दुसरीकडे बलुच संघटनांचे म्हणणे वेगळे आहे. त्यांच्या मते ते आपल्या जमिनी, नैसर्गिक संसाधने आणि स्थानिक हक्कांचे संरक्षण करण्यासाठी संघर्ष करत आहेत. त्यांच्या दाव्यानुसार, बलुचिस्तानच्या संसाधनांचा पुरेसा लाभ स्थानिक नागरिकांना मिळत नाही.
सध्या अमरुल्ला सालेह यांच्या पोस्टमुळे पाकिस्तानातील राजकीय आणि सुरक्षा परिस्थितीबाबत पुन्हा चर्चा रंगली असली तरी त्यांनी कोणत्याही नव्या देशाचे नाव स्पष्टपणे घेतलेले नाही. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याचा नेमका संदर्भ काय होता याबाबत अद्याप अधिकृत स्पष्टता आलेली नाही.
Mumbai,Maharashtra
Jul 13, 2026 11:33 PM IST
New Country: आशिया खंडात आणखी एक देश तयार होणार, बड्या नेत्याच्या ‘गुपित’ पोस्टमुळे जगभरात प्रचंड खळबळ; त्या देशाचे नाव काय असेल?
