National Organ Donation Day: एका ‘हो’ मुळे अनेकांना मिळालं नवजीवन! अवयवदानाबाबत जनजागृतीची गरज, राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त तज्ज्ञ सांगतात…


National Organ Donation Day: “सर्वात कठीण क्षणी घेतलेला एक ‘हो’चा निर्णय अनेक अनोळखी रुग्णांना नवजीवन देऊ शकतो,” असा भावनिक संदेश देत राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे यकृत प्रत्यारोपण आणि एचपीबी (HPB) शस्त्रक्रिया विभागाचे संचालक डॉ. दिनेश झिरपे यांनी अवयवदानाबाबत समाजात अधिक जनजागृती होण्याची गरज व्यक्त केली आहे.

तणावाच्या काळातही अनेक कुटुंबे अवयवदानासाठी संमती देतात..

डॉ. झिरपे यांनी सांगितले की, अपघातानंतर ब्रेन डेड घोषित झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबासमोर अत्यंत कठीण निर्णय उभा असतो. दुःख आणि भावनिक तणावाच्या काळातही अनेक कुटुंबे अवयवदानासाठी संमती देतात. त्यांच्या या निर्णयामुळे हृदय, यकृत, मूत्रपिंड यांसारख्या अवयवांची प्रतीक्षा करणाऱ्या अनेक रुग्णांना नवजीवन मिळते. त्यांच्या मते, भारतात दरवर्षी हजारो रुग्ण अवयव प्रत्यारोपणाची वाट पाहत असतात. मात्र, योग्य वेळी अवयव उपलब्ध न झाल्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागतो. वैद्यकीय क्षेत्रात प्रत्यारोपण तंत्रज्ञान प्रगत झाले असले, तरी अवयवांची कमतरता ही मोठी समस्या आहे.

अवयवदानाबाबत जनजागृतीची गरज, तज्ज्ञ सांगतात…

डॉ. झिरपे यांनी अवयवदानाबाबत समाजात असलेल्या गैरसमजांवरही भाष्य केले. अवयवदानानंतर मृतदेहाचा अपमान होतो किंवा धार्मिक विधी पार पाडता येत नाहीत, अशा समजुती चुकीच्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अवयव काढण्याची प्रक्रिया पूर्ण सन्मानाने आणि वैद्यकीय नियमांचे पालन करून केली जाते. त्यानंतर सर्व धार्मिक आणि पारंपरिक विधी पूर्वीप्रमाणेच पार पाडता येतात, असे त्यांनी सांगितले. त्यांनी पुढे सांगितले की, अनेक व्यक्ती अवयवदानाचे समर्थन करतात किंवा नोंदणी करतात; मात्र त्याबाबतची इच्छा कुटुंबीयांना सांगत नाहीत. त्यामुळे प्रत्यक्ष निर्णयाची वेळ आल्यावर संभ्रम निर्माण होतो. म्हणून अवयवदानाबाबत कुटुंबात आधीच मोकळेपणाने चर्चा होणे आवश्यक आहे.

अधिकाधिक नागरिकांनी अवयवदानाचा संकल्प करण्याचे आवाहन

राष्ट्रीय अवयवदान दिन हा केवळ जनजागृतीचा दिवस नसून, मृत्यूनंतरही दुसऱ्याला जीवनदान देण्याच्या विचाराचा सन्मान करण्याचा दिवस असल्याचे सांगत डॉ. झिरपे यांनी अधिकाधिक नागरिकांनी अवयवदानाचा संकल्प करण्याचे आवाहन केले.

हेही वाचा :

World Breastfeeding Week: महिलांनो.. सिझेरियननंतरही यशस्वी स्तनपान शक्य! नवमातांच्या प्रश्नांचं उत्तर, ‘ही’ 7 लक्षणं, तज्ज्ञांनी सांगितले महत्त्व

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *