Mumbai Local Trains Violent Fight वसई : मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमधील (Mumbai Local Trains) गर्दी आणि त्यातून होणारे वाद नवे नाहीत. मात्र, सध्या सोशल मीडियावर चर्चगेट-विरार लोकल ट्रेनमधील प्रवाशांच्या तुफान हाणामारीचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल (Mumbai Local Train Fight Viral Video) होत आहे. चालत्या ट्रेनमध्ये प्रवाशांमध्ये झालेल्या या राड्यामुळे डब्यातील इतर प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये, लोकल ट्रेनच्या पुरुषांच्या डब्यात प्रवाशांमध्ये जोरदार वाद सुरू असल्याचे दिसत आहे. अत्यंत खचाखच भरलेल्या गर्दीच्या डब्यात उभे राहण्याच्या जागेवरून किंवा गर्दीत धक्का लागल्याच्या कारणावरून हा वाद सुरू झाला असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे.
दरम्यान, पाहता पाहता या वादाचे रूपांतर थेट लाथाबुक्क्या आणि शारीरिक मारहाणीत झाले. आजूबाजूचे इतर प्रवासी हा वाद मिटवण्याचा प्रयत्न करत असतानाच, काही जण एकमेकांवर धावून जाताना या व्हिडिओत स्पष्ट दिसत आहेत. ट्रेनमधीलच एका सहप्रवाशाने हा संपूर्ण प्रकार आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला.
Mumbai Local Trains : लोकल ट्रेनमधील सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर; मुंबईकरांमध्ये तीव्र संताप व्यक्त
मुंबई लोकल ट्रेनमधील सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. या व्हायरल व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर, मुंबईकरांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. कारण नुकतीच लोकल ट्रेनमध्ये एका तरुणाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या घटनेमुळे रोज प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे.
Mumbai Local News: सोशल मीडियावर हाणामारीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल
दरम्यान, सोशल मीडियावर हा व्हिडिओ “चर्चगेट-विरार लोकलमध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी” या कॅप्शनसह मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात असला, तरी या विशिष्ट व्हिडिओतील घटनेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती किंवा रेल्वे प्रशासनाकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. हा व्हिडिओ नेमका कोणत्या तारखेचा आहे, वाद घालणारे प्रवासी कोण होते आणि याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी काही कारवाई केली आहे का, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
हा व्हिडिओ आणि लोकल ट्रेनमधील वाढत्या गुन्हेगारीच्या घटना समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी मुंबई लोकल मधील रोजच्या गर्दीच्या प्रवासावर आणि प्रवाशांच्या वाढत्या मानसिक तणावावर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. “मुंबईकरांचा प्रवास दिवसेंदिवस अधिक खडतर, तणावपूर्ण आणि असुरक्षित होत चालला आहे,” अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत. तसेच, लोकल ट्रेनमधील प्रवाशांच्या जीविताच्या सुरक्षेसाठी रेल्वे प्रशासनाने व पोलिसांनी तात्काळ कठोर पावले उचलावीत, अशी मागणीही आता जोर धरू लागली आहे.
Mumbai Crime : प्रवाशांमधील हिंसक घटनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर
मुंबईत काही दिवसांपूर्वीच लोकलमध्ये दरवाजा बंद करण्याच्या वादातून 24 वर्षीय तरुण मयांक लोहार याची चाकू भोसकून हत्या झाल्याची घटना ताजी असतानाच, सीएसएमटी अंबरनाथ डोंबिवली लोकलमध्ये प्रवाशांमध्ये रक्तरंजित राडा झाल्याची घटना घडली आहे. लोकलमध्ये सिटवर बसण्याच्या जागेवरून झालेल्या वादाचं रूपांतर थेट जीवघेण्या हल्ल्यात झालं आहे. काल (15 जुलै) रात्री 12 च्या सुमारास डोंबिवली आणि ठाकुर्ली स्थानकादरम्यान सीएसएमटी-अंबरनाथ लोकलमध्ये तीन प्रवाशांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या वादात राजू वाघे आणि साहिल खंदारे हे दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. तिसरा प्रवासी प्रितेश कनोजिया याच्यासोबत हा वाद झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमी प्रवाशांना तातडीने मुंबईच्या सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. लोकलमध्ये प्रवाशांमधील हिंसक घटनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.