'तुंबाडची मंजुळा' हा चित्रपट 5 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षक-समिक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला आणि बॉक्स ऑफिसवरही त्याची दमदार कमाई झाली. आता या चित्रपटाचा 'थिएट्रिकल रन' संपला आहे. अत्यंत मोजक्या बजेटच्या या चित्रपटाने धमाकेदार कमाई करत तगडा नफा कमावला आहे.
'कोईमोई'ने दिलेल्या वृत्तानुसार, या चित्रपटाचा बजेट फक्त सहा कोटी रुपये आहे. बॉक्स ऑफिसवर या हॉरर कॉमेडी चित्रपटाने 16.39 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. तर या चित्रपटाचा रिटर्न ऑन इन्वेस्टमेंट म्हणजेच गुंतवणुकीवरील नफा 10.36 कोटी रुपये इतका राहिला आहे.
'तुंबाडची मंजुळा' या चित्रपटाची नफ्याची टक्केवारी तब्बल 172.66% इतकी आहे. विविध कोरगांवकर दिग्दर्शित या चित्रपटात ओम भुतकर, सई ताम्हणकर, जितेंद्र जोशी यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर मकरंद अनासपुरे, अंशुमन विचारे, प्रियल नाइक, गणेश पंडित, उमेश जगताप, योगेश शिरसाट, सिद्धेश्वर जडबुके यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.
'तुंबाडची मंजुळा' हा एका कन्नड लेखक-दिग्दर्शकाच्या चित्रपटाचा अधिकृत रिमेक आहे. मराठी चित्रपटात कोकणातल्या एका गावात याची कथा घडते. एका लग्नसोहळ्याची धामधूम सुरू असताना गावातला तरुण केशवला भूताने झपाटल्याची बातमी पसरते. करुणाकर गुरुजींच्या प्रयत्नांतून केशवच्या अंगातलं भूत हे तुंबाड गावातल्या मंजुळेचं आहे, असा निष्कर्ष निघतो.
ही तुंबाडची मंजुळा कोण आहे, तिच्या भूताने केशवलाच का झपाटलं आहे, खरोखरच तुंबाड गावात मंजुळा असते का, त्या भूताला पळवण्यात करुणाकर गुरूजी यशस्वी होतात का, या सर्वांची उत्तरं 'तुंबाडची मंजुळा' या चित्रपटात अत्यंत गमतीशीर पद्धतीने मिळतात.




