E 20 Petrol: E20 पेट्रोल वादात देशातील ऐतिहासिक निकाल, कंपनीला द्यावी लागणार नवी कार की २० लाख रुपये? | ऑटो


Last Updated:

E 20 Petrol And Car : देशभरात सध्या इथेनॉल मिश्रित असलेल्या ई-२० (E20) इंधनावरून जोरदार चर्चा सुरू आहे. या ई-२० वरून विविध मते व्यक्त केली जात असून लोकांच्या मनात अनेक शंका आहेत.

E20 पेट्रोल वादात देशातील ऐतिहासिक निकाल, कंपनीला द्यावी लागणार नवी कार की २० लाख रुपये?
E20 पेट्रोल वादात देशातील ऐतिहासिक निकाल, कंपनीला द्यावी लागणार नवी कार की २० लाख रुपये?

रायपूर: देशभरात सध्या इथेनॉल मिश्रित असलेल्या ई-२० (E20) इंधनावरून जोरदार चर्चा सुरू आहे. या ई-२० वरून विविध मते व्यक्त केली जात असून लोकांच्या मनात अनेक शंका आहेत. या चर्चांच्या दरम्यान, छत्तीसगडमधील रायपूर जिल्हा ग्राहक न्यायालयाने (अतिरिक्त पीठ) एका नामांकित कार कंपनी आणि स्थानिक डीलरला जोरदार चपराक लगावली आहे. E20 पेट्रोल आणि कारच्या इंजिनमधील बिघाडाबाबत आलेला हा देशातील अशा प्रकारचा पहिलाच ऐतिहासिक निकाल आहे.

ग्राहकाची फसवणूक आणि खराब सेवेप्रकरणी कोर्टाने कंपनी व डीलर या दोघांनाही दोषी धरले आहे. ग्राहक मंचाचे अध्यक्ष प्रशांत कुंडू आणि सदस्य डॉ. आनंद वर्गीस यांच्या खंडपीठाने पीडित डॉक्टर ग्राहकाला त्याच मॉडेलची नवीन E20 पेट्रोल सपोर्ट करणारी कार देण्याचे आदेश दिले आहेत.

कंपनी आणि डीलरला ४५ दिवसांची मुदत

ग्राहक न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे की, जर कंपनी आणि डीलरने पुढील ४५ दिवसांच्या आत ग्राहकाला नवीन कार दिली नाही, तर त्यांना गाडीची मूळ किंमत, आरटीओ (RTO) आणि विम्याचा खर्च मिळून एकूण २० लाख ५० हजार ४९४ रुपये ग्राहकाला परत करावे लागतील. इतकेच नाही तर, या रकमेवर आदेशाच्या तारखेपासून ते प्रत्यक्ष पैसे मिळेपर्यंत ७ टक्के दराने वार्षिक व्याजही द्यावे लागेल. यासोबतच ग्राहकाला झालेल्या मानसिक त्रासाबद्दल १ लाख रुपयांची भरपाई आणि न्यायालयीन खर्चासाठी १०,००० रुपये वेगळे देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

कंपनीने पेट्रोलवर फोडले खापर, पण स्वतःच फसले!

रायपूरमधील नामांकित किडनी रोग तज्ज्ञ डॉ. प्रेमराज देवता यांनी केलेल्या तक्रारीशी संबंधित हे प्रकरण आहे. त्यांनी जून २०२४ मध्ये या प्रसिद्ध कार कंपनीच्या शोरूममधून एक महागडी कार खरेदी केली होती. मात्र, गाडी खरेदी केल्यापासूनच त्यात सातत्याने बिघाड होऊ लागला आणि इंजिन वारंवार बंद पडत होते. जेव्हा डॉक्टर आपली कार घेऊन सर्व्हिस सेंटरला पोहोचले, तेव्हा कंपनी आणि डीलरने ती मोफत दुरुस्त करण्यास स्पष्ट नकार दिला. उलट सर्व्हिस सेंटर आणि कंपनीच्या इंजिनिअर्सनी डॉक्टरांच्या हातावर ५.३० लाख रुपयांचे अव्वाच्या सव्वा खर्चाचे एस्टिमेट (बिल) टेकवले.

कंपनीने आपल्या बचावासाठी म्हटले की, पेट्रोलमध्ये इथेनॉलच्या मिश्रणामुळे (E20 पेट्रोलमुळे) गाडीचे इंजिन खराब झाले आहे. त्यामुळे ही दुरुस्ती वॉरंटीच्या कक्षेत येत नाही. मात्र, जेव्हा हे प्रकरण ग्राहक न्यायालयात पोहोचले, तेव्हा कंपनीच्या या दाव्यातील हवाच निघाली.

न्यायालयात उघड झाली कंपनीची दोन मोठी गुपिते

न्यायालयाच्या चौकशीत कार कंपनीची चलाखी समोर आली. कंपनीने कार विकताना मोठा झोल केला असल्याचे म्हटले जात आहे. डॉक्टर ग्राहकाला जून २०२४ मध्ये जी कार विकण्यात आली होती, तिची निर्मिती प्रत्यक्षात जानेवारी २०२३ मध्ये झाली होती. म्हणजेच, कंपनीने ग्राहकाला अंधारात ठेवून तब्बल पौने दोन वर्षे जुनी कार नवीन किंमतीत गळ्यात मारली होती.

देशभरातील पेट्रोल पंपावर आता इथेनॉल मिश्रित ई २० हे पेट्रोल दिले जात आहे. तपासा दरम्यान आढळले की, या नामांकित कारचे इंजिन नवीन पद्धतीच्या पेट्रोलवर धावण्यास सक्षम नाही. कंपनीने कार विक्री करताना ही बाब आपल्या ग्राहकापासून लपवून ठेवली असल्याचे समोर आले.

पेट्रोलच्या मिश्रणावर ग्राहकाचे कोणतेही नियंत्रण नसल्याचे ग्राहक न्यायलयाने आदेशात म्हटले. कार कंपनीने आपल्या ग्राहकाची जाणीवपूर्वक फसवणूक केली असल्याचे आदेशात स्पष्ट केले.

मराठी बातम्या/ऑटो/

E 20 Petrol: E20 पेट्रोल वादात देशातील ऐतिहासिक निकाल, कंपनीला द्यावी लागणार नवी कार की २० लाख रुपये?



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *