Mumbai Fake DCP Arrested : बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्याकडून डॉक्टरेट स्वीकारणे असो वा दिग्गज अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्यासोबतचे रुबाबदार फोटो सेशन असो; एका पोलीस अधिकाऱ्याचा हा थाट पाहून कोणीही थक्क होईल. डीसीपी (DCP) दर्जाचा मोठा अधिकारी असल्याचा बनाव करून गेल्या 10 वर्षांपासून अनेकांना कोट्यवधींचा चुना लावणाऱ्या एका भामट्याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने (Crime Branch) अटक केली आहे. अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे, हा तोतया डीसीपी दुसरा कोणी नसून स्वतः लोहमार्ग पोलिसांमधील (Railway Police) सहाय्यक फौजदार मोहम्मद गौस इब्राहिम खतीब आहे.
हा महाशय स्वतःला ‘डीसीपी डॉ. राज खातीब’ असे सांगून हायप्रोफाईल वर्तुळात वावरत होता. त्याने डीसीपी नावाचा वापर करून केवळ सेलिब्रिटींनाच भुरळ घातली नाही, तर सर्वसामान्य नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक केली. अडकलेले पैसे काढून देणे, कर्ज मिळवून देणे किंवा चक्क पोलीस खात्यात नोकरी लावण्याच्या नावाखाली त्याने अनेक लोकांना कोट्यवधींचा गंडा घातला आहे.
Mumbai Police Crime Branch : 1 कोटी 60 लाखांच्या कार लोनच्या आमिषाने फसवणूक
या भामट्याने नुकतेच एका व्यक्तीला 1 कोटी 60 लाख रुपयांचे कार लोन मिळवून देण्याचे आमिष दाखवले होते. या कामाच्या मोबदल्यात त्याने तक्रारदाराकडून 10 लाख रुपये उकळले. मात्र, महिना उलटूनही लोन मंजूर न झाल्याने तक्रारदाराला संशय आला. त्यांनी थेट मुंबई पोलीस मुख्यालयात जाऊन ‘डीसीपी डॉ. राज खातीब’ यांच्याबाबत चौकशी केली. तेव्हा मुख्यालयात अशा नावाचे कोणतेही डीसीपी कार्यरत नसल्याचे समोर आले आणि या मोठ्या फसवणुकीचा पर्दाफाश झाला.
Fake DCP Trapped In Andheri : अंधेरीतील हॉटेलमध्ये रचला सापळा
सत्य समोर आल्यानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष 3 ने तातडीने सूत्रे हलवली. पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी 48 लाख रुपयांच्या एका नवीन डीलिंगचा बहाणा केला. त्याला अंधेरी येथील एका नामांकित हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावण्यात आले. हा तोतया डीसीपी पूर्ण रुबाबात हॉटेलमध्ये पोहोचताच, दबा धरून बसलेल्या गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या. सध्या तो पोलिसांत नोकरी लावण्याच्या नावाखाली एका तरुणाची 12 लाखांची फसवणूक केल्याच्या चौथ्या गुन्ह्यात पोलीस कोठडीत आहे.
Railway Police Assistant Sub Inspector : सहाय्यक फौजदार ते तोतया डीसीपीचा प्रवास
विशेष म्हणजे, मोहम्मद गौस इब्राहिम खतीब हा स्वतः रेल्वे पोलिसांत सहाय्यक फौजदार (ASI) म्हणून कार्यरत आहे. त्यामुळे त्याला पोलीस खात्यातील अंतर्गत कामकाजाची, अधिकाऱ्यांच्या राहणीमानाची आणि त्यांच्या रुबाबाची इत्यंभूत माहिती होती. याच गोष्टीचा फायदा घेत तो 2015-16 च्या सुमारास स्वतःला एसीपी (ACP) म्हणवून घेत लोकांना फसवत होता. त्यानंतर त्याने स्वतःचेच ‘प्रमोशन’ करून घेतले आणि तो थेट ‘डीसीपी’ म्हणून वावरू लागला. गेल्या 10 वर्षांत त्याच्यावर कोणाला साधा संशयही आला नाही.
DCP Fake ID Orderly Culture : विश्वास बसावा म्हणून ‘ऑर्डरली’ घेऊन फिरायचा
लोकांचा आपल्यावर पूर्ण विश्वास बसावा यासाठी या भामट्याने डीसीपी दर्जाचे बनावट ओळखपत्र (Fake ID) तयार केले होते. इतकेच नव्हे तर, खऱ्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांप्रमाणे तो स्वतःसोबत एका माणसाला ‘ऑर्डरली’ (बॉडीगार्ड) म्हणून कायम सोबत ठेवायचा. या ऑर्डरलीचे काम फक्त लोकांसमोर ‘येस सर, येस सर’ करत आरोपीचा रुबाब वाढवणे हेच होते.
याशिवाय तो सोशल मीडियावर स्वतःचे विविध रिल्स आणि व्हिडीओ पोस्ट करून लोकांवर प्रभाव पाडायचा. आतापर्यंत त्याने अधिकृतपणे चौघांना 48 लाखांचा गंडा घातल्याचे समोर आले असून, अटक होताच त्याचे नवीन नवीन कारनामे आणि तक्रारदार समोर येत आहेत.
ही बातमी वाचा: