Msedcl Smart Meter: स्मार्ट मिटरमुळे विज बिल शुन्य होणार? ‘त्या’ व्हायरल पोस्टबद्दल अखेर सरकारचा मोठा खुलासा | पुणे बातम्या (Pune News)


४८ तासांमध्ये तुमचं मिटर बदललं जाणार आहे, असा मेसेज महावितरणने पाठवल्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. स्मार्ट मिटर खरंच फायदेशीर आहे का, वीज बिल कमी येणार की जास्त येणार याबद्दल कोणतीही माहिती अनुभवानुसार उपलब्ध नाही. महावितरणकडूनही AI चे व्हिडीओ शेअर करून स्मार्ट मिटर चांगले असल्याचा प्रसार केला जात आहे. पण, ज्यांच्याकडे स्मार्ट मिटर बसवले आहे, त्यांना भरमसाठ बिल आल्यामुळे बदलापूर, अंबरनाथ परिसरात ग्राहकांनी आंदोलन केलं आहे. मनसे आणि शिवसेनेनं सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे.

स्मार्ट मिटरमुळे बिल शून्य होणार?

अशातच स्मार्ट मिटरमुळे विज बिल शून्य होईल, असा खोडसाळपणाचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.या पोस्टची खुद्द दखल राज्य सरकारने घेतली आहे. “स्मार्ट मीटर बसविल्यामुळे वीज बिल शून्य होईल, हा दावा खोटा आहे.

स्मार्ट मीटरमुळे केवळ वीज वापराचे मोजमाप आणि बिलिंगची पद्धत बदलणार आहे. वीज मोफत होत नाही किंवा वीजबिल माफ होत नाही. स्मार्ट मीटर बसविल्यानंतरही ग्राहकांना वापरलेल्या वीजेचे शुल्क नियमाप्रमाणे भरावे लागणार आहे, असं राज्य सरकार जनसंपर्क विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. 

महावितरणकडून स्मार्ट मिटरबद्दल काय सांगितलं जातं?

महावितरणकडून मागील काही दिवसांपासून स्मार्ट मिटरबद्दल ,सोशल मीडियावर प्रचार केल जात आहे. स्मार्ट मिटर हे किती चांगले आहे, याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. जुने मीटर बदलून आता नव्या तंत्रज्ञानाचे ‘स्मार्ट मीटर’ लावण्यात येत आहेत. या स्मार्ट मीटरमुळे दररोज सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत वीज वापरल्यास घरगुती ग्राहकांना प्रतियुनिट ८० पैसे ते १ रुपयापर्यंत थेट सूट मिळणार आहे, असा दावा महावितरणने केला आहे.

“नवीन स्मार्ट मीटर पूर्णपणे मोफत आणि पोस्टपेड आहे. मीटर रीडिंग स्वयंचलित होणार असल्याने चुकीच्या बिलांचा मनस्ताप संपणार आहे. विशेष म्हणजे, तुम्ही किती वीज वापरता, याची माहिती दर अर्ध्या तासाला थेट तुमच्या मोबाईलमधील ॲपवर दिसणार आहे.

युनिट जास्त दाखवतं का? स्मार्ट मिटर हे तुम्ही जेवढी विज वापरतात, तेवढीच विज ते मोजतं. डिजीटल मिटरमध्ये उशिरा विजेच्या युनिटची मोजणी होते. तर स्मार्ट मिटरमध्ये तात्काळ मोजणी होते.

महावितरण दूरून मिटर नियंत्रित करू शकतं का? – विज विभाग फक्त रिडिंग पाहू शकतो. मिटरमध्ये छेडछाड झाली हे बघू शकतो. मिटरमध्ये युनिट वाढवणे हे कुणालाही शक्य नाही. स्मार्ट मिटरमध्ये चिप बसवलेली आहे, त्यामुळे अचूक गणना ही मिटरमध्ये होते.

आपला डेटा सुरक्षित राहतो का? – स्मार्टचा डेटा हा एनक्रिप्टेड आहे, त्यामध्ये कोणतीही छेडछाड करता येत नाही. जर कुणी छेडछाड केली तर तात्काळ हे उघड होतं.

डिजीटल मिटरपेक्षा चांगलं कसं? – फरक स्पष्ट आहे, डिजीटल मिटरमध्ये मॅन्युअल रिडिंग होते, तक्रार केली असेल तर सोडवण्यास उशीर होतो. स्मार्ट मिटरमध्ये स्वंचलित रिडिंग, तक्रार कुणी केली असेल तर लगेच सोडवली जाते. विजेवर तुमचं पूर्ण नियंत्रण मिळतं.

स्मार्ट मिटरचा फायदा काय? रिडर न येता अचूक बिल येणार, थेट देखरेख आणि तक्रारीचं निराकरण केलं जाईल. स्मार्ट मिटरमध्ये ९ ते ५ वाजेपर्यंत सोलर हॉर्समध्ये घरगुती ग्राहकांना प्रतियुनिट ८५ पैशांची घसघशीत सवलत दिली जाते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *