आयसीसी वुमन्स टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत टीम इंडियाने विजयी घोडदौड यशस्वीरित्या कायम राखली आहे. टीम इंडियाने हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात सलग आणि एकूण दुसरा विजय मिळवला आहे. टीम इंडियाने पाकिस्ताननंतर आता नदरलँड्सवर मात केली आहे. भारतीय महिला संघाने नेदरलँड्सचा 95 धावांनी धुव्वा उडवला आहे. भारताने शफाली वर्मा आणि स्मृती मंधाना या दोघींनी केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर नेदरलँड्ससमोर 210 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र भारतीय गोलंदाजांसमोर नेदरलँड्सला संपूर्ण 20 ओव्हरही खेळता आलं नाही. भारताने नेदरलँड्सला 17.3 ओव्हरमध्ये 114 धावांवर गुंडाळलं. भारताने यासह 2 गुणांची कमाई केली आणि सामना जिंकला.
भारताची बॅटिंग
नेदरलँड्सने टॉस जिंकून भारताला बॅटिंगसाठी भाग पाडलं. भारताने या संधीचं सोनं केलं. भारताने या स्पर्धेतील आपली सर्वोच्च धावसंख्या नोंदवली. तसेच भारताने स्पर्धेत पहिल्यांदाच 200 पार मजल मारली. भारताने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 209 धावा केल्या. भारतासाठी स्मृती मंधाना आणि शफाली वर्मा या दोघींनी सर्वाधिक धावा केल्या. उपकर्णधार स्मृती मंधाना हीने सर्वाधिक 74 धावा केल्या. तर शफालीने 55 रन्स केल्या. तर इतरांनीही योगदान दिलं. त्यामुळे भारताला 200 पार पोहचता आलं.
नेदरलँड्सचा 95 धावांनी धुव्वा
नेदरलँड्सच्या पहिल्या 4 फलंदाजांनी विजयी धावांचा पाठलाग करताना ठीक सुरुवात केली. नेदरलँड्सच्या पहिल्या 4 फलंदाजांनी दुहेरी आकड्यात धावा केल्या. मात्र यापैकी एकीलाही 30 पार पोहचता आलं नाही. त्यानंतर उर्वरित फलंदाजांचा भारतीय गोलंदाजांनी गेम केला.भारतीय गोलंदाजांनी इतर उर्वरित फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठून दिला नाही.
श्री चरणीचा विकेट्सचा चौकार
टीम इंडियासाठी श्री चरणी हीने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. श्रीने या 4 पैकी 3 विकेट्स या एकाच ओव्हरमध्ये घेतल्या. तसेच शफाली वर्मा हीने बॅटिंगनंतर बॉलिंगनेही योगदान दिलं. शफाली वर्मा हीने तिघींना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. नंदनी शर्माने 2 विकेट्स मिळवल्या. तर दीप्ती शर्मा हीने 1 विकेट घेत योगदान दिलं. दीप्ती या एका विकेटसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी मिळवणारी पहिली गोलंदाज ठरली.
टीम इंडियाचा सर्वात मोठा विजय
दरम्यान टीम इंडियाचा हा टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेतील धावांबाबत सर्वात मोठा विजय ठरला. भारताने याआधी श्रीलंकेवर दुबईत 2024 साली 82 धावांनी मात केली होती.