Mobile Smartphone gets Costlier: आजकाल मोबाईलशिवाय कुणाचंही पान हलत नाही, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सध्या मोबाईलमध्ये बहुतांश लोकांचा संपूर्ण डेटा असतो. काही जण मोबाईलला स्टेट्स म्हणूनही पाहतात. पण सध्या महागाईच्या चटक्यामुळे जनता होरपळली आहे. महागाईची झळ मोबाईल बाजारालाही बसत असल्याचं दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या 2 ते 3 महिन्यांत सर्वच प्रमुख मोबाईल कंपन्यांच्या मोबाईल फोनचे दर गगनाला भिडले आहेत. आता मोबाईल फोन घेतानाही खिशाला कात्री बसणार एवढं मात्र नक्की.
केवळ सामान नाही तर, महागाईची झळ आता मोबाईल मार्केटलाही बसत असल्याचं दिसत आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यांत सर्वच प्रमुख मोबाईल कंपन्यांनी त्यांच्या मोबाईल फोनचे दर साधारणपणे 30 ते 40 टक्क्यांनी वाढवले असल्यची माहिती आहे. सध्या सणासुदीचे दिवस आहेत. मुख्य शॉपिंग साइट्सवर मोबाईल फोनच्या किंमतीमध्ये घट होईल, यासाठी लोक वाट पाहत असतात. मोबाईलच्या दुकानांमध्येही सेल लागतील, याचीही ग्राहक वाट पाहत असतात.
महागाईची झळ आता मोबाईल बाजारालाही बसतेय (Mobile phone prices Rise by 30-40 percent)
सध्या सणासुदीचा काळ असला तरी, मोबाईल फोनचे दर वाढल्यामुळे खरेदीदारांनी मोबाईल दुकानांकडे पाठ फिरवलीये. मोबाईल बाजारात गर्दी नसल्याचे अनेक विक्रेत्यांनी माहिती दिली. मुळात सर्वच मोठ्या मोबाईल कंपन्यांना इलेक्ट्रॉनिक चीपचा पुरवठा कमी झाला आहे. इलेक्ट्रॉनिक चीप बनवणाऱ्या अनेक मोठ्या कंपन्यांनी सध्या ए आय (आर्टिफिशियल इंटेलिजन्स ) लक्ष केंद्रित केल्याने, मोबाईलसाठीच्या इलेक्ट्रॉनिक चिप्सचा पुरवठा मर्यादित झाल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
याच कारणामुळे मोबाईल बाजारात सध्या अडचण निर्माण झाली असल्याचं बोललं जात आहे. नव्या मोबाईलचे दर वाढलेले असल्याने त्यांची विक्री कमी झाली आहे. मात्र, रिफर्बिश्ड म्हणजेच सेकंड हॅन्ड मोबाईलचा बाजार चांगला सुरू आहे. नवीन फोन खरेदी करण्याऐवजी ग्राहक अर्धा किंमतीत मिळणारे मोबाईल फोन, म्हणजेच रिफर्बिश्ड मोबाईल फोन खरेदी करणे पसंत करत असल्याचं काही विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या: