Marathi Actor Kamlesh Sawant Shares Incident: मराठी (Marathi Films) आणि हिंदी सिनेसृष्टी (Hindi Films) गाजवणारे दमदार अभिनेते म्हणजे, कमलेश सावंत (Kamlesh Sawant). आजवर त्यांनी अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्यात. त्यातल्या बऱ्याचशा भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहेत. विशेषतः पोलिस अधिकारी, खलनायक आणि कणखर स्वभावाच्या व्यक्तिरेखा साकारण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यांनी अनेक गाजलेल्या मराठी आणि हिंदी सिनेमांमध्ये प्रभावी भूमिका साकारून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलीय. अजय देवगन अभिनित ‘दृश्यम’ सिनेमातली त्यांनी साकारलेली गायतोंडे ही पोलिसाची भूमिका विशेष गाजली. कमलेश सावंत यांनी ‘दृश्यम’ (Drishyam) आणि ‘दृश्यम 2’ (Drishyam 2) मध्ये लक्ष्मीकांत गायतोंडेची भूमिका साकारली होती. त्यासाठी आजही त्यांना ओळखलं जातं. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ‘दृश्यम’ सिनेमातल्या भूमिकेनंतर त्यांना आलेला अनुभव सांगितलाय. तसेच, इंडस्ट्रीतल्या आजवरच्या कारकीर्दीत त्यांना आलेले अनेक अनुभवही त्यांनी सांगितलेत. याच मुलाखतीत मराठी अभिनेते कमलेश सावंत यांनी मोठं वक्तव्य केलं, ज्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आजवर इंडस्ट्रीत केलेल्या कामांचे तब्बल 70 लाख रुपये बुडाल्याचं कमलेश सावंत यांनी मुलाखतीत बोलताना सांगितलंय.
मराठी अभिनेते कमलेश सावंत नेमकं काय म्हणाले? (Marathi Actor Kamlesh Sawant Struggle)
मराठी अभिनेते कमलेश सावंत यांनी ‘मित्र म्हणे’ला मुलाखत दिली. त्या मुलाखतीमध्ये बोलताना त्यांनी सांगितलं की, “माझा स्वभाव असा आहे की, मी कुणाला त्रास देत नाही. माझे पैसे द्या म्हणून मागे लागत नाही, मी तगादाही लावत नाही. आतापर्यंत माझं 70 लाखांचं नुकसान झालं आहे. माझे 70 लाख बुडाले आहेत. नाहीतर आता माझ्यावर घराचं कर्ज नसतं. पण, ते पैसे माझे नव्हते असं मी समजतो. मी त्यांना दोन फोन करतो. तिसऱ्यांदा फोन करून सांगतो की, पैसे द्यायचे असतील तर द्या नाहीतर जाऊ दे. मग शेवटी ते पैसे देत नाहीत. आज त्यातले काही प्रोड्युसर नाहीत…”
“ते गेले, माझे पैसेही गेले, विषय संपला…”
“मी केषु रामसे सरांचा ‘फॅमिली’ हा सिनेमा केला होता. ती खूप गोड व्यक्ती होती. 2006 मध्ये माझं 75 हजारांचं फायनल पेमेंट बाकी होतं. त्यांना लॉस झाला म्हणून ते बऱ्याच जणांचे पैसे देऊ शकले नाहीत. चार वर्षांपूर्वी त्यांचं निधन झालं. त्यानंतर त्यांच्या मुलाचा मला फोन आला. कमलेश सर तुमचे किती पैसे बाकी आहेत, सांगाल का? वडिलांच्या निधनानंतर आता आम्ही सगळ्यांचे पैसे देत आहोत, असं त्यांचा मुलगा मला म्हणाला. मी त्याला विचारलं की, तू कोण आहेस? मी तुला ओळखत नाही… तुझ्यासोबत माझा कोणताही व्यवहार नाही. माझा व्यवहार तुझ्या वडिलांसोबत केशू रामसेंसोबत झाला होता. ते गेले, माझे पैसेही गेले, विषय संपला…”
“वडिलांचं कर्ज मुलानं फेडावं अशा जुन्या विचारांचा मी नाही…”
“वडिलांचं कर्ज मुलानं फेडावं अशा जुन्या विचारांचा मी नाही. तुझा आणि माझा कोणताही व्यवहार नाही. त्यानंतर तो मला म्हणाला की, “असं बोलणारे सर तुम्ही पहिले आहात…” हा माझा मोठेपणा नाही. पण, मला ते चुकीचं वाटलं. कदाचित माझ्या वडिलांकडून हे माझ्यात आलं असावं…”, असं कमलेश सावंत यांनी सांगितलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव