Maharashtra Rain News Updates: पुढील चार दिवस कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (Maharashtra Rain News) वर्तविला आहे. त्याचप्रमाणे मराठवाड्याच्या काही भागातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर पुढील 4 दिवस मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. (Maharashtra Weather News)
हवामान विभागाने आज विदर्भातील अनेक जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केले आहे. पूर्व विदर्भातील भंडारा, नागपूर, वर्धा, चंद्रपूर तर पश्चिम विदर्भातील अमरावती आणि अकोला जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केले आहे. त्यामुळे आज विदर्भातील बहुतांशी भागांमध्ये सर्वदूर मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल अशी शक्यता आहे. (Maharashtra Rain News)
मुंबईला पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा- (Mumbai Rain Updates)
मुंबईला पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईतील काही भागात अतिवृष्टीची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे. ज्यात, 200 मिमी पर्यंत 24 तासात पावसाची नोंद होऊ शकते. दरम्यान, पुढील 72 तासांत मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात देखील चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईवर ओढवलेलं पाणीसंकट कमी होण्यास मदत होईल.
पालघर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून जोरदार पाऊस- (Palghar Rain News)
पालघर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून जोरदार पाऊस सुरू असून आजही हवामान खात्याने पालघर जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट घोषित केला आहे. सध्याही जिल्ह्यात पावसाची सुरू असून आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे त्यामुळे पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड यांनी शाळा महाविद्यालय अंगणवाड्यांना सुट्टी घोषित केले आहे. तर या पडत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील नदी नाले ओसांडून वाहत असून जिल्ह्यातील प्रमुख धामणे आणि कवडास या धरणांमध्ये चांगला पाणीसाठा ही निर्माण झाला आहे दुसरीकडे जव्हार, मोखाडा सारख्या भागांमध्ये पाणीटंचाई जाणवत होती त्या पाणीटंचाईचा संकट आता मिटण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील भात पेरण्याच्या कामाला वेग येणार असून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे तर आज पालघरला रेड अलर्ट असल्याने आवश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा अस आवाहनही नागरिकांना प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
ठाण्यात पावसाची जोरदार बॅटिंग- (Thane Rain Updates)
ठाण्यात ऑरेंज अलर्ट दिल्याप्रमाणे सकाळपासून पावसाची जोरदार बॅटिंग बघायला मिळत आहे. मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी सखल भागात पावसाचे पाणी साचले होते. पण त्याचा निचरा लवकर झाल्याने दैनंदिन कामांवर त्याचा फारसा परिणाम झाला नाही. पावसामुळे पूर्व द्रुतगती मार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरू आहे. मुंबईहून घोडबंदर रोड, कल्याण, नाशिक कडे जाणारी वाहतूक संथ गतीने आहे, याचाच आढावा घेतला आहे.
रायगडमध्ये पुढील तीन दिवस खबरदारीचे, 2 ते 4 जुलैदरम्यान अतिमुसळधार पावसाचा इशारा- (Raigad Rain Updates)
भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार रायगड जिल्ह्यात पुढील तीन दिवस खबरदारीचे आहेत. रायगड जिल्ह्यासाठी 2 ते 4 जुलैदरम्यान अतिमुसळधार ते अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने होणाऱ्या मुसळधार पावसाने जिल्ह्यात नद्यानाल्यांना पूर, सखल भागात पाणी साचणे आणि घाटमाथ्यावर दरडी कोसळण्याचा धोका वाढण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. अरबी समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता असल्याने मच्छीमारांनी पुढील आदेशापर्यंत समुद्रात जाऊ नये असेही सांगण्यात आले आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवावीत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
तळकोकण आणि गोवा किनारपट्टी वर वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळणार- (Konkan Rain News)
सिंधुदुर्ग जिल्ह्यात 2 जुलैला यलो अलर्ट तर 3 जुलै ते 5 जुलै या कालावधीत पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. या कालावधीत जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. त्यामुळे नागरिकांनी मुसळधार पावसात आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडणे टाळा. अतिमुसळधार किंवा अतिवृष्टीच्या परिस्थितीत कोणत्याही परिस्थितीत सुरक्षित ठिकाणी रहा. विजा चमकत असल्यास झाडाखाली उभे राहू नये असे आवाहन प्रशासनाने केलं आहे. तर कोकण आणि गोवा किनारपट्टी वर वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळण्याचा हवामान विभागाचा अंदाज असून वाऱ्याचा वेग ताशी 40-50 किमी असून तो ताशी 60 किमीपर्यंत वाढू शकतो. त्यामुळे सर्व बंदरांवर ‘3’ नंबरचा धोक्याचा इशारा देणारा बावटा लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
नागपूर शहरात रात्री सर्वत्र दमदार पाऊस- (Nagpur Rain News)
नागपूर शहरात रात्री सर्वत्र दमदार पाऊस झाल्यानंतर काही तास थांबलेल्या पावसाने पहाटेपासून पुन्हा रिमझिम स्वरूपात सुरुवात केली आहे… हवामान विभागाने आज नागपूर सह वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, अमरावतीसाठी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. काल रात्री अनेक दिवसांच्या खंडानंतर नागपुरात सर्वत्र दमदार पाऊस झाला.. विजांच्या कळकळाटासह झालेल्या पावसामुळे वातावरणात चांगलाच गारवा निर्माण झाला आहे… त्यामुळे यंदा तीव्र तापमानासह लांबलेल्या उन्हाळ्यानंतर पहिल्यांदाच दिलासादायक पाऊस झाल्याने नागपूरकरांची घामांच्या धारापासून सुटका होण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
भंडाऱ्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची जोरदार हजेरी- (Bhandara Rain News)
हवामान विभागानं आज भंडारा जिल्ह्याला येलो अलर्ट दिला होता. मात्र, दिवसभर अगदी रिपरिप पाऊस पडला. सायंकाळी भंडारा, मोहाडी, लाखनी, पवनी आणि तुमसर तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक भागात विजांच्या कडकडाटासह पावसानं जोरदार हजेरी लावली. मागील अनेक दिवसांपासून भातपिक लागवड आणि पेरणी खोळंबलेली आहे. सायंकाळी जिल्ह्यात सर्वत्र आलेल्या पावसामुळं आता शेतकरी सुखावला असून शेतीच्या कामांना आता वेग येण्याचं चित्र बघायला मिळेल.
मुंबईत जोरदार पाऊस, VIDEO:
संबंधित बातमी:
Uddhav Thackeray Special Report : ऑपरेशन टायगरनंतर उद्धव ठाकरे आत्मचिंतन करणार?