Ketan Agrawal and Siya Goyal: केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणाच्या तपासात आता धक्कादायक बाबी समोर येत आहेत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सिया गोयल (Siya Goyal) हिला केतनसोबत लग्न करायचे नव्हते. केतनला टक्कल होते, तो डोक्यावर केसांचा विग वापरत असल्याचे सियाला खटकत होते आणि त्यातूनच दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला होता. तपासानुसार, सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी (Chetan Chaudhari) यांनी केतनची हत्या करण्याचा कट रचला. केतनला (Ketan Agarwal) ट्रेकिंगची आवड असल्याची माहिती दोघांना होती. याच गोष्टीचा फायदा घेत त्याला एखाद्या किल्ल्यावर नेऊन खोल दरीत ढकलून अपघाताचा बनाव करण्याचा कट आखण्यात आला. यासाठी लोहगड किल्ल्याची (Lohagad Fort) निवड करण्यात आली. आरोपींनी तीन वेळा किल्ल्यावर जाऊन रेकी केल्याचे तपासातून समोर आले आहे. कोणत्या ठिकाणी खोल दरी आहे, कुठून ढकलल्यास अपघातासारखे भासेल, याची त्यांनी पाहणी केल्याचा पोलिसांचा दावा आहे. (Pune Crime news)
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, 14 जून रोजी केतन आणि सिया प्रथमच लोहगड किल्ल्यावर गेले होते. तेथे एका टोकावरून केतनला ढकलण्याचा कथित प्रयत्न झाला. मात्र, खाली पडताना केतनने झाडाची फांदी पकडल्याने त्याचा जीव वाचला. त्यावेळी “साप आला होता” असे सांगून सियाने प्रसंग झाकण्याचा प्रयत्न केल्याचा दावा तपासातून समोर आला आहे. यानंतर, केतनला एकटीने दरीत ढकलणे शक्य नसल्याचे लक्षात आल्याने सियाने चेतनची मदत घेतल्याचा पोलिसांचा दावा आहे. 18 जून रोजी चेतनही लोहगड किल्ल्यावर गेला. तपासानुसार, किल्ल्यावर फिरत असताना चेतन काही अंतर राखून चालत होता. योग्य संधी साधून आणि सियाच्या इशाऱ्यानंतर चेतनने केतनला खोल दरीत ढकलल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.
या घटनेनंतर सुरुवातीला हा अपघात असल्याचे मानले जात होते. मात्र, तपास पुढे सरकत असताना मोबाईल कॉल रेकॉर्ड, आरोपींची हालचाल, घटनास्थळावरील पुरावे आणि इतर तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी कट उघडकीस आणला आहे.
Siya Goyal news: सिया गोयलला तुरुंगात भेटायला कुटुंबातील कोणीचं आलं नाही
सिया गोयल हिला अटक झाल्यानंतर तुरुंगात तिला भेटण्यासाठी कोणीही आले नाही, अशी माहिती लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिली. एखाद्या आरोपीला अटक केल्यानंतर सहसा त्याच्या कुटुंबातील सदस्या त्याला भेटायला तुरुंगात येतात. मात्र, सियाला भेटाला कोणीही आले नाही. सिया ही तिचे आई-वडील आणि भावासोबत राहत होती. तिचे वडील सध्या रुग्णालयात आहेत. आईही त्यांच्यासोबत आहे. तर दुसरीकडे चेतन चौधरी याला भेटायला त्याचे वडील तुरुंगात येऊन गेले.
आणखी वाचा
Ketan Agarwal Case Pune :मुलीच्या कृत्याने सियाचे आई-वडील हादरले, म्हणाले; दोषी असेल तर माझ्या मुलीलाही लोहगडावरुन ढकलून द्या!