केतन अग्रवालच्या आईचे सियावर गंभीर आरोप
भावी सुनेच्या वाढदिवसानिमित्त मुलगा तिच्याोबत लोहगडावर गेला, पण परत आला तो त्याचा मृतदेह… केतन अग्रवालचं निष्प्राण कलेवर पाहून त्याच्या आईने हंबरडा फोडला. मुलाचं लग्न अवघ्या काही महिन्यांवर आलेलं असतानाच त्याचा मृत्यू होणं, हा धक्का रेखा अग्रवाल अजूनही पचवू शकत नाहीयेत. आणि त्यातच आणखी हादरवणारी गोष्ट म्हणजे, जिच्या स्वागताची सगळे आनंदाने तयारी करत होते, त्याच भावी सुनेने त्यांच्या मुलाला मारून त्यांचा आनंद हिरावून घेतला. सियानेच केतनचा खून केल्याचे समोर आल्यावर केतनच्या आई-वडिलांचा आक्रोश आणखी वाढला. तिला माझ्या मुलाशी लग्न करायचं नव्हतं तर तसं स्पष्ट सांगायचं ना, आम्ही लग्न रद्द केलं असतं, माझ्या मुलाचा जीव घ्यायची काय गरज होती, असा सवाल केतनच्या वडिलांनी, उद्विग्न विशाल अग्रवाल यांनी विचारला. तर केतनच्या आईने , रेखा अग्रवाल यांनी सियाबाबत गंभीर आरोप केले आहेत. तिने आपला मोठा विश्वासघात केल्याचे सांगताना, त्यांच्या डोळ्यातील अश्रूंना खळ नव्हता.
मी माझ्या होणाऱ्या सुनेला, सियाला हे स्पष्टपणे सांगितलं होतं की, आमच्या घरात मद्यपान करण्यास परवानगी दिली जाणार नाही., असं रेखा अग्रवाल यांनी नमूद केलं. मात्र असं असूनही सिया ही ड्रिंक्स घ्यायची आणि तिच्या पालकांना याची कल्पना असूनही त्यांनी ही गोष्ट आमच्यापासून लपवून ठेवली होती, असा दावाही रेखा यांनी केला.
2-3 वेळा सिया घरी आली
“ती (सिया) आमच्या घरी दोन-तीनवेळा आली होती. एकदा पूजेसाठी आणि दोन-तीनदा जेवणासाठी. आमच्या घरी मद्यपान करण्यास परवानगी नाही आणि मी तुला पार्ट्यांनाही जाण्याची परवानगी देणार नाही, असं मी तिला तेव्हाच स्पष्टपणे सांगितलं होतं. मात्र असं असूनही सिया मद्यपान करायची आणि तिच्या पालकांनी ही गोष्ट आमच्यापासून लपवून ठेवली होती,” असे रेखा यांनी एका एनडीटीव्हीशी (NDTV) बोलताना सांगितलं.
सिया गोयल आणि तिचा कथित साथीदार चेतन चौधरी यांनी कट रचून केतनची हत्या केली, त्यांनीच माझ्या मुलाला मारलं, असा आरोप करत त्या दोघांनाही कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केतनच्या आईने केली.
हत्येचा तपास सुरू
सियाच्या वाढदिवसापूर्वी सेलिब्रेशनसाठी लोहगडावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या केतनचा पाय घसरून पडून मृत्यू झाल्याचे आधी मानलं जात होतं. पण अवघ्या आठवड्याभरात या केसचं धक्कादायक सत्य समोर आलं. सिया आणि चेतन यांनीच केतनला ढकललं असा आरोप असून पोलिसांनी त्या दोघांना अटक केली. हा मृत्यू अपघाती नव्हता, असे पोलिसांनी मंगळवारी सांगितले. चेतन आणि सियाला 29 जून पर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.