केतन अग्रवाल मर्डर केसमध्ये पोलीसांची पुढली मूव्ह काय ?
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तपास पथक आता आरोपी सिया गोयल हिची ‘लाय डिटेक्टर’ (पॉलिग्राफ) चाचणी करण्याची तयारी करत आहे. यासाठी न्यायालयाची परवानगी घेतली जाऊ शकते. जर सियाने लाय डिटेक्टर चाचणीसाछी संमती दिली, तर चौकशीदरम्यान अनेक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे मिळू शकतील, असं एजन्सीतील अधिकाऱ्यांना वाटतंय. मात्र कायद्यानुसार पॉलिग्राफ चाचणी केवळ न्यायालयाची परवानगी आणि संबंधित व्यक्तीची संमती असेल तरच केली जाऊ शकते; तसेच, या चाचणीचा अहवाल न्यायालयात निर्णायक पुरावा मानला जात नाही.
पोलिसांकडे पुरेसे पुरावे आहेत का ?
केतन अग्रवालच्या मृत्यूनंतर (Ketan Agarwal Murder ) पोलीस या प्रकरणाचा सतत तपास करत आहेत. मात्र, आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, या घटनेचा कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार पुढे आलेला नाही. ज्या ठिकाणी केतन दरीत पडल्याचे सांगितलं जातं, तिथे कोणतेही सीसीटीव्ही कॅमेरेदेखील नव्हते. परिणामी, हा तपास आता पूर्णपणे डिजिटल आणि परिस्थितीजन्य पुराव्यांवर अवलंबून आहे. तपासादरम्यान पोलीस सध्या सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची सखोल चौकशी, त्यांच्या मोबाईल फोन्सचे फॉरेन्सिक विश्लेषण, कॉल डिटेल रेकॉर्ड्स (CDR), कथितरीत्या डिलीट केलेले संदेश, लोकेशन डेटा, सीसीटीव्ही फुटेज आणि गुन्ह्याच्या ठिकाणची पुनर्रचना (रिकन्स्ट्रक्शन), तसेच कुटुंबीय व इतरांचे जबाब या मुद्यांवर काम करत आहेत. मात्र या घटनाक्रमाचे संपूर्ण चित्र स्पष्ट करण्यासाठी तपास यंत्रणा या सर्व बाबींची सांगड घालण्याचा प्रयत्न करत आहेत.
केसमधील कमकुवत दुवा काय ?
या तपासात एक कमकुवत दुवाही आहे. केतनला गडावरून धक्का देण्यात आला की तो स्वतःहून खाली पडला, याबद्दल दुजोरा देण्यासाठी या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत कोणताही साक्षीदार पुढे आलेला नाही. म्हणूनच या प्रकरणाकडे सामान्य खुनाच्या प्रकरणांपेक्षा वेगळ्या दृष्टीकोनातून पाहिले जात आहे. कायदेतज्ज्ञांच्या मते, अशा प्रकरणांमध्ये परिस्थितीजन्य पुराव्यांची संपूर्ण साखळी न्यायालयाकडून तपासली जाते. जेव्हा सर्व परिस्थिती एकाच निष्कर्षाकडे निर्देश करतात आणि इतर कोणत्याही शक्यतेसाठी जागा उरत नाही, तेव्हाच सरकारी पक्षाचा युक्तिवाद भक्कम मानला जातो.
या तपासात सिया आणि चेतन यांच्यातील कथित संबंधांच्या पैलूचाही शोध घेतला जात आहे. तपासादरम्यान जरी त्यांच्यातील संबंध सिद्ध झाले, तरी केवळ त्या एका गोष्टीवरून हत्येचा आरोप सिद्ध होऊ शकणार नाही. ही हत्या करण्यामागे त्यांचा पूर्वनियोजित कट होता का आणि डिजिटल पुराव्यांवरून त्या कटाची पुष्टी होते का, याचीही तपासणी न्यायालय करेल. घटनास्थळावरील परिस्थिती सरकारी पक्षाच्या कथनाशी सुसंगत आहे का? दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, कथित संबंध आणि खुनाचा आरोप यांच्यात स्पष्ट कायदेशीर दुवा प्रस्थापित करणं हे तपास यंत्रणांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
ट्रेकिंगला कोण घेऊन गेलं ?
या केसमधील पुढे आलेला आणखी एक पैलू समोर आला आहे. सियाला लोहगडावर ट्रेकिंगला जायचं नव्हतं आणि केतनसोबत जाण्यास ती टाळाटाळ करत होती, असा दावा तिच्या कुटुंबियांनी केला. दरम्यान, तपास यंत्रणांकडून या घटनाक्रमाची स्वतंत्रपणे पडताळणी केली जात आहे. दोन्ही बाजू न्यायालयात आपापले पुरावे आणि युक्तिवाद सादर करतील. घटनेचे रिक्रिएशन करण्यासाठी पोलिसांनी दोन्ही आरोपी ( सिया आणि चेतन) घटनास्थळाला भेटही दिली. आरोपींचे जबाब आणि घटनास्थळावरील प्रत्यक्ष परिस्थिती यामध्ये किती साम्य आहे, हे तपासणे हा यामागचा उद्देश होता. मात्र, घटनाक्रमाचे रिक्रिएशन हे तपासासाठी नक्कीच उपयुक्त ठरत असलं, तरी केवळ त्या आधारावरच दोष सिद्ध होऊ शकत नाही, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं.
लाय डिटेक्टरबाबत चर्चा का ?
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तपास यंत्रणा आता ‘पॉलिग्राफ चाचणी’ (polygraph test) घेण्याचा विचार करत आहे. तपासाला नवी दिशा देण्यासाठी आरोपीच्या प्रतिसादांचे वैज्ञानिक विश्लेषण करणे हा या चाचणीचा उद्देश आहे. मात्र न्यायालयाच्या परवानगीशिवाय पॉलिग्राफ चाचणी करता येत नाही; तसेच संबंधित व्यक्तीची किंवा आरोपीचीही याला संमती असणे अनिवार्य असते. या चाचणीचा अहवाल स्वतःहून न्यायालयात निर्णायक पुरावा मानला जात नाही. जर या चाचणीतून एखादा नवीन दुवा (lead) मिळाला, तर त्यावर आधारित गोळा केलेला स्वतंत्र पुरावा महत्त्वपूर्ण ठरतो.
मात्र लाय डिटेक्टर टेस्टमुळे सगळं सत्य समोर येईलच याची खात्री नाही . कायदेतज्ज्ञांच्या मते, पॉलीग्राफ चाचणी एखाद्या व्यक्तीला थेट दोषी किंवा निर्दोष ठरवत नाही. चाचणीदरम्यान नवीन माहिती समोर आल्यास आणि तिची स्वतंत्रपणे पुष्टी झाली तर ती तपासासाठी उपयुक्त ठरते. सध्या, या प्रकरणात पोलिसांसाठी परिस्थितीजन्य पुरावा हाच सर्वात मजबूत आधार मानला जात आहे. दरम्यान, तपासाशी संबंधित नसलेली माहितीही समोर आली आहे; दोन्ही कुटुंबांमधील संबंध अधिक दृढ करण्यासाठी चर्चा सुरू असल्याचे वृत्त होते.