Ketan Agarwal Murder : केतन अग्रवाल हत्या, कोर्टात पोलिसांचे 11 मोठे दावे; रेकी, रिहर्सल, डिलीट डेटा अन् पासपोर्टचं गूढ – Marathi News | Ketan Agrawal Murder : Siya, Chetan Remand Reasons Revealed in Lohgad murder case


सिया-चेतनची पोलीस कोठडी वाढवली

पुण्यातील रिअल इस्टेट व्यावसायिक विशा अग्रवाल यांचा मुलगा केतन अग्रवालचा 18 जून रोजी लोहगडावरून पडून मृत्यू झाला. आधी हा अपघात वाटत होता, मात्र नंतर याचप्रकरणाला धक्कादायक वळण मिळालं. केतनची होणारी पत्नी सिया व तिचा मित्र चेतन चौधरी यांनीच कट रचून केतनला (Ketan Agarwal Murder ) दरीत ढकलून त्याची हत्या केल्याचं समोर आलं आणि प्रचंड खळबळ माजली. याप्रकरणी चेतन व सिया हिला अटक करण्यात आल्यानंतर न्यायालयाने 29 जून पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली होती. काल त्यांची पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर पोलिसांनी त्याना पुन्हा न्यायालयासमोर हजर केलं आणि पोलिस कोठडीची मागणी केली.

केतन हत्याप्रकरणाचा सखोल तपास सुरू असून पोलिसांनी याप्रकरणात आत्तापर्यंत 8 ते 10 जणांचे जबाबा नोंदवले आहेत. त्यामध्ये सिया हिचे आई-वडील, तिचा भाऊ साहिल गोयल तसेच आरोपी चेतन चौधरी यच्या दुकानात काम करणारा माणसू यासह अनेकांचा समावेश आहे. केतनची हत्या केल्याचा आरोप असलेले सिया आणि चेतन यांचीही कसून चौकशी सुरू असून त्यांच्या जबाबातून बरीच धक्कादायत माहिती समोर येत आहे. केतनला टक्कल होतं, तो विग वापरायाच, तसेच बोलताना अडकळायचा ते आवडतं नव्हतं, असं सियाने नमूद केलं होतं.

दरम्यान काल पोलिसांनी सिया व चेतन यांना न्यायालयासमोर हजर करत पोलिस कोठडी वाढवून देण्याची मागणी केली. दोन्ही आरोपींची कस्टडी वाढवून का मिळावी यासंदर्भातही सरकारी पक्षातर्फे न्यायालयात युक्तिवाद करण्यात आला. तसेच त्यासंदर्भातील कारणेही न्यायालयासमोर मांडण्यात आली. पोलिसांचा, सरकारी वकिलांचा युक्तिवाद काय होता, पोलिस कस्टडी वाढवून देण्यासाठी काय कारणे न्यायालयासमोर मांडण्यात आली, त्याची डिटेल माहिती समोर आली आहे.

केतन अग्रवाल हत्याकांड, पोलीस कस्टडी रिमांडची कारणं

१) प्रस्तुत गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपींनी वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी एकत्र भेटून सदर गुन्ह्याचा कट रचला असल्याची माहिती तपासात पुढे येत आहे. त्याबाबत दोन्ही आरोपींकडे त्याबाबत तपास करून त्यांनी कट रचताना एकत्रित भेटण्याची ठिकाणे निष्पन्न करावयाची आहेत.

२) आरोपींनी गुन्हा करण्याअगोदर एकत्र भेटून गुन्हा कसा करावयाचा याचा सराव केलेला आहे. तरी आरोपींनी ज्या ठिकाणी सदर गुन्हा करण्याचा सराव केला आहे ते ठिकाण निष्पन्न करून पुढील तपास करावयाचा आहे.

३) आरोपींनी गुन्ह्यातील अत्यंत महत्त्वाचा पुरावा असलेला डिजिटल डेटा डिलीट केला असून असा डिलीट केलेला डेटा रिकव्हर करण्याची प्रक्रिया चालू असून सदरचा डेटा प्राप्त करून त्या आधारे आरोपींकडे सखोल तपास करावयाचा आहे.

४) आरोपींनी गुन्हा केल्यानंतर कोणाकडे गुन्ह्याबाबत कबुली दिली किंवा चर्चा केली आहे काय? याबाबत आरोपींकडे तपास करणे आहे.

५) आरोपी नंबर १ हिने निवेदनाप्रमाणे केलेल्या गुन्ह्याचे घटनाक्रमाची पुनर्रचना दिनांक २८/०६/२०२६ रोजी करण्यात आली असून त्या आधारे आरोपी नंबर २ याचेकडूनही गुन्ह्याचे घटनाक्रमाची पडताळणी करावयाची आहे. त्यानंतर आरोपी क्र. १ व २ यांचेकडे समक्षपणे सखोल चौकशी करणे बाकी आहे.

६) गुन्ह्याचे घटनेच्या दरम्यान आरोपी नंबर १ व २ यांनी लोहमार्गावरील काही लोकांशी संवाद साधलेला आहे. त्या संदर्भाने आरोपींकांना प्राप्त सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्यांचेकडे सदर गुन्ह्याचा सखोल तपास करावयाचा आहे.

७) गुन्ह्याच्या घटनेच्या अगोदर सुद्धा आरोपी नंबर १ व २ यांनी गुन्ह्यातील मृतास जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती पुढे येत आहे. त्याबाबत आरोपींकडे तपास करणे आहे.

८) आरोपी नंबर १ सिया गोयल हिने मृत केतन अग्रवाल याच्यासोबत इंडोनेशिया, बाली या ठिकाणी फ्री वेडिंग शूट करिता जायचे नसल्याने तिने पुणे ते मुंबई प्रवासादरम्यान खालापूर फूड मॉल येथे मृत केतन याचा पासपोर्ट बॅगमधून काढून कोठेतरी फेकून दिला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तरी आरोपी नंबर १ हिचे मदतीने मृताचा पासपोर्टचा शोध घेऊन तो हस्तगत करणे आहे.

९) गुन्ह्याचे तपासादरम्यान नुकतेच काही महत्त्वाचे साक्षीदार पुढे आलेले आहेत. त्यांचेकडे चौकशी करून आरोपी व साक्षीदार यांची समोरासमोर पडताळणी करून पुढील तपास करणे आहे.

१०) आरोपी नंबर १ व २ यांनी गुन्हा करण्याचे अगोदर किल्ले लोहगड या ठिकाणी भेट देऊन किल्ल्याची रेकी करून गुन्ह्याचे ठिकाण निश्चित केले आहे का? याबाबत आरोपींकडे सखोल तपास करणे बाकी आहे.

११) आरोपींच्या कट कारस्थानामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे काय? याबाबत आरोपींकडे सखोल तपास करणे अत्यंत आवश्यक आहे.

असे पोलिसांतर्फळे न्यायालयात सांगण्यात आले. या सर्व अनुषंगाने सिया व चेतनची चौकशी करून तपास करण्यत येणार असल्याचे न्यायालयासमोर नमूद करण्यात आलं. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने दोघांची कोठडीची मुदत वाढवून त्यांना 3 जुलैपर्यंत पोलीस कस्टडीत ठेवण्याचे निर्देश दिले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *