Last Updated:
भारत आणि पाकिस्तान यांच्यात राजकीय संबंधांपासून ते क्रिकेटचे संबंधही ताणले गेले आहेत, त्यातच आता टीम इंडियाच्या दिग्गज खेळाडूचा पाकिस्तानच्या हारिस राऊफसोबतचा फोटो आणि व्हिडिओ समोर आला आहे.
मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्यात राजकीय संबंधांपासून ते क्रिकेटचे संबंधही ताणले गेले आहेत. मागच्या वर्षी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधली दरी आणखी वाढली. या हल्ल्यानंतर भारतीय क्रिकेटपटूंनी पाकिस्तानी खेळाडूंसोबत हस्तांदोलन करणंही बंद केलं. आशिया कपमध्ये विजय मिळवल्यानंतर भारतीय क्रिकेटपटूंनी पाकिस्तानच्या मोहसिन नक्वी याच्याकडून ट्रॉफी स्वीकारायला नकार दिला.
एकीकडे भारत आणि पाकिस्तानच्या खेळाडूंचे हे वाद समोर येत असतानाच सोशल मीडियावर एक फोटो समोर आला आहे, ज्यामुळे खळबळ माजली आहे. टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटपटू आर.अश्विन आणि पाकिस्तानी क्रिकेटर हारिस राऊफ यांचा हा फोटो आहे.,
अमेरिकेमध्ये सध्या मेजर लीग क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. सोमवार 22 जूनला सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्सच्या एका फॅन मीट-अप कार्यक्रमादरम्यान अश्विन आणि हारिस राऊफ एकत्र बसले होते. याचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. हे दोन्ही खेळाडूंना चाहत्यांनी घेरलं आहे, तसंच ते चाहत्यांना ऑटोग्राफही देत आहेत, पण दोघांनी एकमेकांकडे बघितलंही नाही, हेदेखील व्हिडिओमध्ये स्पष्ट होत आहे.
राऊफ-अश्विन एकाच टीममध्ये
आर.अश्विन आणि हारिस राऊफ या मोसमात सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स टीमचा भाग आहेत. अश्विन टीमचा सगळ्यात सीनियर खेळाडूंपैकी एक आहे. आतापर्यंत अश्विन आणि राऊफ मैदानात एकत्र दिसलेले नाहीत. 19 जूनला डलासमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात हारिस राऊफ प्लेइंग इलेव्हनचा भाग होता, पण अश्विन या सामन्यात खेळला नव्हता. तर 20 जूनला झालेल्या सामन्यात हारिस राऊफला बाहेर ठेवून अश्विनला संधी मिळाली होती. सॅन फ्रान्सिस्कोने 2 सामन्यांपैकी एक जिंकला असून एका सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे. पॉईंट्स टेबलमध्ये सॅन फ्रान्सिस्को दुसऱ्या क्रमांकावर आहे.
टीमचा पुढचा सामना 24 जूनला टेक्सास सुपरकिंग्सविरुद्ध होणार आहे. या सामन्यात अश्विन आणि हारिस राऊफ एकत्र मैदानात उतरणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
Mumbai,Maharashtra
Jun 22, 2026 11:57 PM IST
