India vs Afghanistan 3rd ODI Playing 11 : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सुरू असलेल्या 3 एकदिवसीय (ODI) सामन्यांच्या मालिकेतील अंतिम आणि तिसरा सामना शनिवारी चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाईल. हा सामना दुपारी 1:30 वाजता सुरू होईल. मालिकेतील पहिले दोन्ही सामने जिंकून शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने आधीच मालिका खिशात घातली आहे. आता भारतीय संघाची नजर अफगाणिस्तानला क्लीन स्वीप करण्यावर असेल. दुसरीकडे, पाहुणा अफगाणिस्तान संघ शेवटचा सामना जिंकून सन्मानाने मालिका संपवण्याचा प्रयत्न करेल. या सामन्यासाठी भारताच्या प्लेइंग-11 मध्ये एक मोठा बदल पाहायला मिळू शकतो.
यशस्वी जैस्वालला धावा कराव्या लागतील…
सलामीला रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल डावाची सुरुवात करू शकतात. गेल्या सामन्यात अपयशी ठरलेल्या यशस्वीची नजर या सामन्यात मोठ्या धावसंख्येवर असेल. तसेच, रोहित शर्मालाही आपल्या अर्धशतकाचा दुष्काळ संपवावा लागेल. तिसऱ्या क्रमांकावर कर्णधार शुभमन गिल फलंदाजीला येऊ शकतो. गिल सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. पहिल्या दोन्ही वन-डे सामन्यांत तो प्लेअर ऑफ द मॅच राहिला आहे, त्याने पहिल्या सामन्यात 84 आणि दुसऱ्या सामन्यात धडाकेबाज 154 धावा केल्या होत्या.
2 फिरकीपटूंना संधी
चौथ्या क्रमांकावर ईशान किशनला पाठवले जाऊ शकते, ज्याने गेल्या सामन्यात 125 धावांचे शानदार शतक झळकावले होते. पाचव्या क्रमांकावर उपकर्णधार श्रेयस अय्यरला संधी दिली जाऊ शकते, तर केएल राहुल खालच्या फळीत फलंदाजीला येऊन संघाला मजबूती देईल. चेन्नईची खेळपट्टी लक्षात घेता वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादव हे दोन फिरकीपटू मुख्य भूमिकेत दिसू शकतात.
हर्षित राणाला मिळू शकते संधी
तिसऱ्या वन-डे सामन्यापूर्वी हर्षित राणाचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. बंगळुरूच्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ (COE) मध्ये पुनर्वसन पूर्ण केल्यानंतर तो चेन्नईत टीम इंडियासोबत जोडला गेला आहे. त्यामुळे चेन्नईत त्याला प्लेइंग-11 मध्ये खेळण्याची संधी मिळू शकते. हर्षितला संधी मिळाल्यास गुरनूर ब्रार किंवा अर्शदीप सिंगला बाहेर बसावे लागू शकते.
भारताची संभाव्य प्लेइंग-11 (IND vs AFG 3rd ODI Playing 11) : यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), ईशान किशन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, केएल राहुल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव.
तिसऱ्या वन-डे सामन्यासाठी संपूर्ण भारतीय संघ (Squad)
शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), केएल राहुल (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, प्रिन्स यादव, गुरनूर ब्रार, हर्ष दुबे, यशस्वी जैस्वाल, हर्षित राणा.
हे ही वाचा –
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा घरच्या मैदानावर पराभव करत विजयीरथ रोखला