Last Updated:
आता जांभळाच्या फुलांपासून तयार होणाऱ्या मधाचे औषधी आणि आरोग्यदायी गुणधर्म वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाल्याने या मधाकडे नव्याने लक्ष वेधले जात आहे.
पुणे : पारंपरिक औषधोपचारांमध्ये आणि आरोग्यवर्धक आहारामध्ये मधाला विशेष महत्त्व आहे. आता जांभळाच्या फुलांपासून तयार होणाऱ्या मधाचे औषधी आणि आरोग्यदायी गुणधर्म वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाल्याने या मधाकडे नव्याने लक्ष वेधले जात आहे. पुण्यातील सीएसआयआर-राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या (एनसीएल) संशोधनातून अस्सल जांभूळ मधामध्ये ग्लुकोजचे प्रमाण तुलनेने कमी असून फ्रुक्टोज आणि अँटीऑक्सिडंट घटकांचे प्रमाण अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे.
एनसीएलमधील शास्त्रज्ञ डॉ. उदय किरण मरेली यांच्या नेतृत्वाखालील संशोधन पथकाने महाबळेश्वर परिसरातील जांभूळ मधाच्या नमुन्यांचा चार वर्षे सखोल अभ्यास केला. या संशोधनासाठी महाबळेश्वर आणि आसपासच्या जंगल परिसरातून मधमाशीपालकांच्या मदतीने तब्बल 82 मधाचे नमुने संकलित करण्यात आले. या प्रकल्पामध्ये डॉ. सपना रविचंद्रन यांच्यासह संशोधकांच्या पथकाने सहभाग घेतला होता.
डॉ. मरेली यांनी सांगितले की, देशातील विविध प्रकारच्या मधांचे मेटाबॉलिक प्रोफाइलिंग करून त्यांची स्वतंत्र रासायनिक ओळख तयार करण्याच्या मोठ्या प्रकल्पाचा हा एक भाग आहे. यासाठी एनएमआर स्पेक्ट्रोस्कोपी आणि एचपीएलसी यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. या तंत्रांच्या साहाय्याने जांभूळ मधातील रासायनिक घटकांचे अचूक विश्लेषण करण्यात आले.
संशोधनामध्ये जांभूळ मधामध्ये फिनोलिक ॲसिड्स आणि फ्लॅव्होनॉइड्स यांसारख्या जैवसक्रिय संयुगांचे प्रमाण अधिक असल्याचे आढळून आले. हे घटक शरीरातील हानिकारक मुक्त मूलकांपासून संरक्षण करण्यास मदत करतात. त्यामुळे पेशींचे नुकसान कमी होण्यास हातभार लागतो. तसेच या मधामध्ये अँटीऑक्सिडंट क्षमता इतर अनेक प्रकारच्या मधांच्या तुलनेत अधिक असल्याचेही संशोधकांनी नमूद केले आहे.
जांभूळ मधातील ग्लुकोजचे प्रमाण कमी असल्याने त्याचा ग्लायसेमिक प्रभाव तुलनेने कमी असल्याचे संशोधनात दिसून आले. त्यामुळे रक्तातील साखर झपाट्याने वाढण्याऐवजी हळूहळू वाढण्यास मदत होऊ शकते. संशोधनातील जैवसक्रिय घटकांमुळे हृदयाचे आरोग्य, यकृताचे कार्य, जखम भरून येण्याची प्रक्रिया आणि शरीरातील पेशींची पुनर्निर्मिती यांसाठी संभाव्य फायदे मिळू शकतात. काही स्वतंत्र संशोधनांमध्ये या घटकांच्या कर्करोगविरोधी गुणधर्मांचाही उल्लेख करण्यात आला आहे. तथापि, या सर्व आरोग्यदायी परिणामांची अधिक व्यापक वैद्यकीय पडताळणी होणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
या प्रकल्पामागील आणखी एक महत्त्वाचा उद्देश म्हणजे देशातील मधमाशीपालन व्यवसायाला प्रोत्साहन देणे. भारतीय मधाच्या विविध प्रकारांची शास्त्रीय ओळख निर्माण झाल्यास त्यांचे मूल्यवर्धन होऊन शेतकरी आणि मधमाशीपालकांना अधिक फायदा होऊ शकतो. जांभूळ मधावरील हे संशोधन केवळ आरोग्याच्या दृष्टीनेच नव्हे तर ग्रामीण अर्थव्यवस्था आणि मधमाशीपालन क्षेत्रासाठीही महत्त्वाचे ठरणार आहे.
Pune,Maharashtra