Last Updated:
Tukaram Mundhe FDA Raid BMC : अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) धडाकेबाज आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली एफडीएच्या पथकाने थेट बीएमसी मुख्यालयातील कॅन्टीनवर धाड टाकून ते सील (Seal) केले आहे.
सुमित तांबे, प्रतिनिधी, मुंबई: मुंबई शहराच्या आरोग्य आणि स्वच्छतेची काळजी करणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) मुख्यालयातच अन्नाच्या सुरक्षेचा आणि स्वच्छतेचा पुरता फज्जा उडाल्याचा प्रकार समोर आला होता. महापालिकेच्या मुख्य इमारतीतील उपहारगृहातील गंभीर अस्वच्छता आणि निकृष्ट अन्नाचा प्रकार उघडकीस आल्यानंतर, अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) धडाकेबाज आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली एफडीएच्या पथकाने थेट बीएमसी मुख्यालयातील कॅन्टीनवर धाड टाकून ते सील (Seal) केले आहे.
ताकात माशी अन् भजीत प्लास्टिकचा धागा!
महापालिका मुख्यालयातील या उपहारगृहातून दररोज शेकडो कर्मचारी आणि नागरिक जेवण-नाश्ता करतात. दररोज सुमारे ७-८ हजार कर्मचारी या उपगारगृहात नाश्ता, जेवण करतात. मात्र, नुकत्याच घडलेल्या प्रकारात एका ग्राहकाला दिलेल्या ताकाच्या ग्लासात चक्क मेलेली माशी आढळून आली. एवढेच नव्हे तर, कांदा भजीच्या ऑर्डरमध्ये भजीच्या आत प्लास्टिकचा धागा तळलेल्या अवस्थेत सापडला. या धक्कादायक प्रकारामुळे पालिकेतील कर्मचारी आणि नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त केला जात होता.
मुंबई महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही काही नगरसेवकांनी या कॅन्टीनच्या दर्जाबाबत सवाल उपस्थित केले होते. कॅन्टीनमध्ये केवळ अन्नाचा दर्जाच खालावलेला नव्हता, तर तिथे प्रचंड अस्वच्छता पसरल्याचा आरोप करण्यात आला होता. अनेक खाद्यपदार्थ कोणत्याही झाकणाशिवाय उघड्यावर ठेवले जात होते, ज्यावर माश्या आणि डास घिरट्या घालत होते. मुंबई महापालिकेच्या कॅन्टीनबाबत प्रश्न उपस्थित झाल्याने खळबळ उडाली.
तुकाराम मुंढेंचा सर्जिकल स्ट्राइक….
राज्यात अन्न भेसळ करणारे आणि निकृष्ट दर्जाचे अन्न विकणाऱ्यांवर सध्या आयएएस अधिकारी, एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली धडाकेबाज कारवाया सुरू आहेत. महापालिका मुख्यालयातील कॅन्टीनमधील अनागोंदीची गंभीर दखल घेत एफडीएने थेट महापालिकेतच ही मोठी कारवाई केल्याने प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. एफडीएने मुंबई महापालिकेत रात्रीच्या वेळी मुंबई महापालिकेच्या कॅन्टीनवर स्ट्राइक केला. एफडीएने धाड मारल्यानंतर कॅन्टीनची तपासणी केली. अन्न सुरक्षेच्या सर्व नियमांची पायमल्ली होत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर एफडीएने तात्काळ कठोर पाऊल उचलत कॅन्टीनला सील केले.
Mumbai,Maharashtra
Jul 23, 2026 11:12 AM IST
IAS Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंचा BMC मुख्यालयावर सर्जिकल स्ट्राईक; रात्रीच कॅन्टीनला ठोकलं टाळं, कारवाईनं खळबळ
