Pune FDA Action: अस्वच्छता, एक्सपायर झालेले अन्नपदार्थ अन् नियमांचं उल्लंघन; पुण्यातील 12 हॉटेल्स, रेस्टॉरंट्सला एफडीएचा दणका, या बड्या ठिकाणांचे परवाने केले रद्द


पुणे : अन्नसुरक्षा व स्वच्छतेचे नियम पायदळी तुडविणाऱ्या हॉटेल, रेस्टॉरंट आणि बेकरी व्यावसायिकांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई केली आहे. मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता, मुदतबाह्य अन्नपदार्थांची साठवणूक तसेच अन्नसुरक्षा कायद्याच्या तरतुदींचे उल्लंघन आढळून आल्याने पुणे विभागातील १२ (Pune FDA Action) आस्थापनांचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले आहेत. यात पुणे जिल्ह्यातील १० व सातारा जिल्ह्यातील २ आस्थापनांचा समावेश आहे. याशिवाय प्रतिबंधित अन्नपदार्थाचा साठा जप्त करून पाच जणांना अटक करण्यात आली आहे.(Pune FDA Action)

एफडीएच्या मोहिमेअंतर्गत १८ आणि २१ जुलै रोजी पुणे विभागात विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. तपासणीदरम्यान अनेक ठिकाणी अस्वच्छ परिसर, मुदतबाह्य अन्नपदार्थाचा साठा, अन्न हाताळणीतील निष्काळजीपणा तसेच स्वच्छतेच्या निकषांचे उल्लंघन निदर्शनास आले. कारवाईत पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, मावळ, जुन्नर, खेड तसेच सातारा जिल्ह्यातील वडूज येथील आस्थापनांचा समावेश आहे.(Pune FDA Action)

पुणे जिल्ह्यात जोकर हॉस्पिटॅलिटी (वालेवाडी, पुणे), रेड अॅण्ड ह्युज (कल्याणीनगर, पुणे), टोणी दा ढाबा (नायगाव कामशेत, ता. मावळ), हॉटेल लोकप्रिय (मार्केट यार्ड, पुणे), फाऊंटन प्युअर व्हेज (आळेफाटा, ता. जुन्नर), के. एम. फुड्स (भांबुरवाडी, ता. खेड), अक्सा बेकरी (आदर्श नगर, पीसीएमसी), जय सद्‌गुरू इराणी चहा अँड स्नॅक्स सेंटर (मार्केट यार्ड, पुणे), फोक्लो टेक्नॉलॉजी प्रा. लि., स्वींस्टा एन्ट प्रा. लि. (बावधन, पुणे) या आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. सातारा जिल्ह्यातील कारवाईत शालीमार उडपी व्हेज रेस्टॉरंट (वडूज, ता. खटाव) आणि सुरभी हॉटेल अँड बार (वडूज, ता. खटाव) या १२ आस्थापनांचा समावेश आहे.(Pune FDA Action)

Pune FDA Action:  ३ लाख ४८ हजारांचा अन्नसाठा जप्त; पुणे विभागातील चिंचवडमध्ये कारवाई

याशिवाय १६ ते २१ जुलैदरम्यान पुणे विभागातील चिंचवड, पंढरपूर आणि सातारा जिल्ह्यातील वडूज येथे तीन आस्थापनांवर स्वतंत्र कारवाई करण्यात आली. या ठिकाणी ३ लाख ४८ हजार ७८ रुपयांचा प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. संबंधितांविरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

Pune FDA Action:   अन्नसुरक्षा कायद्याचे पालन करा; अन्यथा कारवाई

एफडीएने हॉटेल, रेस्टॉरंट आणि बेकरी व्यावसायिकांना अन्नसुरक्षा कायद्याचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. ग्राहकांना मोफत शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे, फूड ग्रेड दर्जाचे पॅकिंग साहित्य वापरणे, विनापरवाना व्यवसाय न करणे, वापरलेल्या खाद्यतेलाचा पुनर्वापर टाळणे तसेच मेनू कार्डवर दिशाभूल करणारी माहिती न देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Pune FDA Action:  या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधा

ग्राहकांना अन्नपदार्थांचा दर्जा, स्वच्छता किंवा इतर बाबींविषयी तक्रार असल्यास १८००२२२३६५ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन एफडीएने केले आहे.

Pune FDA Action:  मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृहाचा परवाना निलंबित

मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृहाचा परवाना निलंबित करण्यात आला आहे, एफडीएने ही मोठी कारवाई केली आहे. बृहन्मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृहाचा परवाना अन्न व औषध प्रशासनाने (FDA) निलंबित केला. उपहारगृहात सातत्याने अस्वच्छतेच्या तक्रारी येत असल्याने एफडीएने छापा टाकून सखोल तपासणी केली. काही दिवसांपूर्वी ताकामध्ये माशी आणि कांदा भजीमध्ये प्लास्टिकचा धागा आढळल्याच्या घटना समोर आल्या होत्या. तपासणीनंतर स्वच्छता नियमांचे उल्लंघन आढळल्याने परवाना निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्वच्छता नियमांची पूर्ण अंमलबजावणी होईपर्यंत परवाना निलंबितच राहणार असल्याची माहिती आहे. उपहारगृह चालकाला एफडीए आयुक्तांकडे अपील करण्याचा किंवा न्यायालयात दाद मागण्याचा पर्याय आहे, मात्र, सर्व त्रुटी दूर करून स्वच्छतेचे निकष पूर्ण केल्यानंतरच परवाना पुन्हा बहाल केला जाणार असल्याची माहिती आहे. 

हेदेखील वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *