पोलिसांच्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री गोळीबाराच्या चार वेगवेगळ्या घटना घडल्या. या घटनांमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि चार जण जखमी झाले. संशयितासाठी एक लाख डॉलर्सच्या दंडाचे अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. यापूर्वी, 6 जून रोजी इंग्लंडच्या बेस कॅम्पपासून सहा मैल अंतरावर गोळीबाराची घटना घडली होती.
इंग्लंड टीमच्या तळाजवळ गोळीबार
गोळीबाराच्या घटनांपैकी एक घटना इंग्लंड टीमच्या प्रशिक्षण तळ, स्वोप सॉकर व्हिलेजपासून सुमारे 15 मिनिटांच्या अंतरावर असलेल्या प्रॉस्पेक्ट अव्हेन्यू परिसरात घडली. प्रशिक्षक थॉमस टुशेल यांच्या नेतृत्वाखालील इंग्लंडची टीम इथे सराव करत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, टीमला त्यांच्या हॉटेलमधून प्रशिक्षण मैदानावर कडक पोलीस बंदोबस्तात नेले जात आहे. क्रोएशियावर 4-2 असा विजय मिळवल्यानंतर इंग्लंडची टीम कॅन्सस सिटीमध्ये परतली आहे. राखीव खेळाडूंचा समावेश असलेला एक सराव सामनाही बंद दाराआड आयोजित करण्यात आला आहे.
घराला आग, पण संशयित बेपत्ता
ऑस्कर सांचेझ-मुनोझ हा आरोपी इंडिपेंडन्स परिसरातील एका घरात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर, पोलिसांनी हे घर सिल करून अनेक तास बाहेर पहरा दिला. या कारवाईदरम्यान घराला आग लागली. आग विझवल्यानंतर, पोलिसांनी घराची झडती घेतली, पण संशयित सापडला नाही. मात्र, त्याची गाडी घटनास्थळावरून जप्त करण्यात आली. त्यानंतर संपूर्ण परिसरात शोधमोहीम तीव्र करण्यात आली.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ते आरोपीला अटक करण्याच्या जवळ पोहोचले आहेत. ‘जर कोणी या व्यक्तीला पाहिले, तर कृपया तात्काळ 911 वर फोन करा. आम्ही संशयिताच्या अगदी जवळ आहोत आणि त्याला लवकरात लवकर अटक करू’, असं कॅन्सस सिटीचे पोलीस प्रमुख स्टेसी ग्रेव्हज म्हणाले.
उबर ड्रायव्हरही जखमी
मिळालेल्या वृत्तानुसार, अर्जेंटिनाच्या सामन्यासाठी चाहत्यांना घेऊन जाणारा एक उबर ड्रायव्हरही गोळीबारात जखमी झाला आहे. यामुळे वर्ल्ड कपदरम्यान शहराच्या सुरक्षेबद्दल चिंता वाढली आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर शहरात एक कार अपघात आणि एका मृत्यूची घटनाही घडली आहे. पोलीस संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.
इंग्लंड टीमच्या सामानाची चोरी
गोळीबाराच्या घटनेआधी 14 जूनला इंग्लंड टीमच्या सामानाचीही चोरी झाली होती. फ्लोरिडाहून प्रशिक्षण तळाकडे नेल्या जाणाऱ्या सामनाला वाटेत लुटण्यात आलं. चोरलेल्या वस्तूंमध्ये जॉर्डन पिकफोर्डचे फुटबॉल बूट, स्वाक्षरी केलेल्या इंग्लंड जर्सी, प्रशिक्षण किट, वर्ल्ड कप फुटबॉल, स्पीकर्स आणि इतर वस्तूंचा समावेश होता. यापैकी बहुतेक वस्तू नंतर परत मिळवण्यात आल्या.
6 जूनलाही गोळीबार
6 जून रोजी स्वोप सॉकर व्हिलेज प्रशिक्षण तळापासून सुमारे चार मैल अंतरावर झालेल्या गोळीबारात 9 जण जखमी झाले. पण, पोलिसांनी स्पष्ट केले की या घटनेचा वर्ल्ड कप किंवा इंग्लंड टीमशी काहीही संबंध नाही आणि सर्व जखमी धोक्याबाहेर आहेत.
इंग्लंड टीमची आणि वर्ल्ड कपशी संबंधित सर्व कार्यक्रमांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी कॅन्सस सिटी पोलीस अधिकाऱ्यांनी अतिरिक्त पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणा तैनात केल्या आहेत.