Virat Kohli Retirement : विराट कोहली कधी रिटायर होणार? अत्यंत जवळच्या व्यक्तीने थेटच सांगितलं! | क्रीडा बातम्या (Sports News in Marathi)


Last Updated:

आरसीबीला लागोपाठ दोन आयपीएल ट्रॉफी जिंकवून देण्यात विराटने महत्त्वाची भूमिका बजावली, मात्र विराट आणखी किती वर्ष सक्रिय राहिल, याबाबत चाहत्यांना चिंता वाटत आहे.

विराट कोहली कधी रिटायर होणार? अत्यंत जवळच्या व्यक्तीने थेटच सांगितलं!
विराट कोहली कधी रिटायर होणार? अत्यंत जवळच्या व्यक्तीने थेटच सांगितलं!

मुंबई : आयपीएलमध्ये एकाच टीमसाठी सलग 19 मोसम खेळणारा विराट कोहली हा जगातील एकमेव खेळाडू आहे. आयपीएल सुरू झाल्यापासून विराट आरसीबीकडून खेळत आहे, तसंच आपण रिटायरही आरसीबीकडूनच होऊ, असं विराट कोहलीने याआधीही अनेकदा सांगितलं आहे. आरसीबीला लागोपाठ दोन आयपीएल ट्रॉफी जिंकवून देण्यात विराटने महत्त्वाची भूमिका बजावली, मात्र विराट आणखी किती वर्ष सक्रिय राहिल, याबाबत चाहत्यांना चिंता वाटत आहे.

टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि महान खेळाडू विराट कोहली हा आता 37 वर्षांचा आहे. विराटने टेस्ट आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आधीच निवृत्ती घेतली आहे, त्यामुळे तो आता फक्त वनडे क्रिकेटच खेळत आहे. विराटचं पुढचं लक्ष्य 2027 मध्ये होणारा वनडे वर्ल्ड कप आहे. या वनडे वर्ल्ड कपनंतर विराट निवृत्त व्हायची शक्यता आहे, पण वनडे क्रिकेटमधूनही निवृत्त झाल्यानंतर विराट आयपीएल खेळणार का? असा प्रश्न चाहत्यांना सतावत आहे.

आरसीबीचे सीईओ राजेश मेनन यांच्या मते विराट कोहली पुढची चार वर्षे आयपीएल खेळेल. ‘आरसीबी आणि विराट एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. टीमच्या स्थापनेपासून तो आरसीबीचा सर्वात मजबूत आधारस्तंभ राहिला आहे. त्याची क्रिकेट कारकीर्द संपल्यानंतरही, आम्ही त्याच्याशिवाय आरसीबीची कल्पना करू शकत नाही; आम्हाला त्याच्यावर काम करत राहावे लागेल. खेळण्याच्या वेळेबद्दल बोलायचे झाल्यास, मला खात्री आहे की तो पुढील तीन ते चार वर्षे, किमान चार वर्षे तरी खेळत राहील,’ असं मेनन सीएनबीसी टीव्ही 18 सोबत बोलताना म्हणाले.

फिटनेसमध्ये कोहली अव्वल

विराट कोहली हा फिटनेसच्या बाबतीत अजूनही जगातील महान खेळाडूंना टक्कर देतो. गेल्या काही मोसमांमध्ये त्याने एक टी20 बॅटर म्हणून स्वतःमध्ये पूर्णपणे बदल घडवला. विराटने पॉवरप्लेमध्ये अत्यंत आक्रमक भूमिका बजावली आहे, अनेकदा त्याने आरसीबीमधला त्याचा ओपनिंग पार्टनर फिल सॉल्ट यालाही मागे टाकलं आहे.

आयपीएल 2026 मध्ये कोहलीची कामगिरी

आयपीएल 2026 मध्ये, त्याने 16 सामन्यांमध्ये 56.25 च्या सरासरीने आणि 165.85 च्या धडाकेबाज स्ट्राईक रेटने 675 रन केल्या. आयपीएलचे सगळे मोसम खेळणाऱ्या विराटचा यंदाच्या मोसमातला हा सर्वोत्तम स्ट्राईक रेट आहे. आयपीएल 2026 मध्ये विराटने एक शतक आणि 5 अर्धशतकंही झळकावली आहेत. आयपीएल फायनलमध्ये विराट कोहलीला प्लेअर ऑफ द मॅच म्हणून गौरवण्यात आलं.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *