Evil Dead Burn Review: कमकुवत मनाच्या प्रेक्षकांनी चुकुनही पाहू नका ‘हा; हॉररपट; हॉररप्रेमींना मात्र येणार भन्नाट अनुभव



Evil Dead Burn Review: हॉरर चित्रपट पाहण्याची आवड असेल तर ईव्हिल डेड बर्न (Evil Dead Burn) हा चित्रपट तुमच्यासाठी एक वेगळाच अनुभव ठरू शकतो. मात्र, हा चित्रपट प्रत्येकासाठी नाही. कमकुवत मनाच्या प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहण्यापूर्वी दोनदा विचार करावा. कारण अनेक दृश्यं इतकी भयानक आणि रक्तरंजित आहेत की ती पाहताना मळमळ, अस्वस्थता किंवा धक्का बसू शकतो. हॉलीवूडने पुन्हा एकदा आपल्या भन्नाट हॉरर शैलीची झलक दाखवली आहे. ‘ ईव्हिल डेड’ फ्रँचायझीतील आधीचे चित्रपट पाहिले नसले तरी हा चित्रपट स्वतंत्रपणे समजून घेता येतो. मात्र, एकच अट आहे,तुमचं मन खंबीर असायला हवं.

काय आहे कथानक?

चित्रपटाची कथा एका तरुणीभोवती फिरते. तिचे आणि तिच्या पतीचे नातं सततच्या वादामुळे ताणलेलं असतं. पतीला मूल हवं असतं, पण पत्नी त्यासाठी तयार नसते. दरम्यान, एका भीषण कार अपघातात पतीचा मृत्यू होतो. त्यानंतर ती आपल्या सासरच्या घरी राहायला येते आणि तिथून सुरू होतो भीतीचा थरार. या फ्रँचायझीतील ‘डेडाइट’ नावाची दुष्ट आत्मा एकामागोमाग एक व्यक्तींच्या शरीरात प्रवेश करू लागते. नेमकं हे का घडतं? या आत्म्याचं रहस्य काय आहे? याची उत्तरं जाणून घेण्यासाठी तुम्हाला चित्रपट पाहावाच लागेल.

 कसा आहे चित्रपट?

‘ईव्हिल डेड बर्न’ हा अत्यंत हिंसक आणि रक्तरंजित हॉररपट आहे. चित्रपटात दाखवण्यात आलेली हिंसा अनेकांना अस्वस्थ करू शकते. काही दृश्यं इतकी भयानक आहेत की प्रेक्षक नकळत डोळे झाकतील.एका दृश्यात कारच्या सीटचा हेडरेस्ट एका तरुणीच्या मानेत घुसतो, तर दुसऱ्या दृश्यात कारच्या दरवाजात बोटं अडकून ती अक्षरशः तुटताना दाखवली आहेत. अशा अनेक दृश्यांमुळे अंगावर काटा येतो.

सुमारे दीड तासांचा हा चित्रपट काही ठिकाणी थोडासा संथ वाटतो. विशेषतः संवादप्रधान प्रसंग कमी असते तर चित्रपट अधिक प्रभावी ठरला असता. मात्र, हॉरर दृश्यांची मांडणी इतकी प्रभावी आहे की पुढे काय होणार याची उत्सुकता सतत कायम राहते.चित्रपटाच्या शेवटी पोस्ट-क्रेडिट सीन आहे. तो पूर्णपणे समजून घेण्यासाठी फ्रँचायझीतील आधीचा चित्रपट पाहिलेला असणं फायदेशीर ठरेल. तरीही मुख्य कथा समजण्यासाठी त्याची गरज भासत नाही.जर तुम्ही हॉरर चित्रपटांचे चाहते असाल, तर हा चित्रपट नक्की पाहू शकता. मात्र, रात्री एकटे पाहण्याचं धाडस करू नका.

अभिनय

चित्रपटातील सर्व कलाकारांनी उत्कृष्ट अभिनय केला आहे. कोणताही कलाकार अभिनय करत असल्याचं जाणवत नाही, तर ते खरोखरच त्या भयावह जगाचा भाग असल्याचा भास होतो.मुख्य भूमिकेत सौहेला याकूब हिने प्रभावी काम केलं आहे. तिच्या अभिनयामुळे भीतीची भावना अधिक तीव्र होते. टँडी राइट , हंटर डुहान आणिलुसियान बुकेनन यांनीही आपल्या भूमिका प्रभावीपणे साकारल्या आहेत. इतर कलाकारांनीही चित्रपटाला योग्य साथ दिली आहे.

लेखन आणि दिग्दर्शन

या चित्रपटाचं लेखन सेबॅस्टियन व्हॅनिसेक आणि फ्लोराँ बर्नार्ड  यांनी केलं असून दिग्दर्शनाची धुरा सेबॅस्टियन व्हॅनिसेक यांनी सांभाळली आहे. कथेपेक्षा तिची मांडणी हा चित्रपटाचा सर्वात मोठा प्लस पॉइंट आहे. दिग्दर्शकाने भीतीचं वातावरण इतकं प्रभावी उभं केलं आहे की चित्रपट संपल्यानंतरही त्यातील अनेक दृश्यं मनातून जात नाहीत. हॉरर चाहत्यांसाठी हा चित्रपट नक्कीच संस्मरणीय अनुभव ठरू शकतो.

रेटिंग : (3.5/5)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *