विलासरावांचा पुढाकार, मनमोहनसिंगाची धडपड; सोनम वांगचूकांची तब्येत खालवताच राजू शेट्टींना अण्णा आंदोलनाची आठवण


मुंबई : राजधानी दिल्लीतील जंतर मंतरवर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक (Sonam wangchuk) गेल्या 17 दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. देशातील नीट पेपर फुटीची जबाबदारी स्वीकारत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजानामा द्यावी ही मूळ मागणी करत कॉकरोच जनता पार्टीसह सोनम वांगचूक यांचं आदोलन सुरू असून ते उपोषणास बसले आहेत. या उपोषणाला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं पाठिंबा दिला आहे, तर सोशल मीडियातूनही उपोषणावर भाष्य केलं जात आहे. मात्र, सरकारने अद्याप आंदोलनाची कुठलीही दखल घेतली नाही. त्याच, पार्श्वभूमीवर माजी खासदार तथा शेतकरी नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी 2011 सालच्या अण्णा आंदोलनाची आठवण करुन दिली. तसेच, तत्कालीन सरकारने विरोधी पक्षाला घेऊन उपोषण कसे सोडवली याची सत्यकथा सांगत मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. 

राजू शेट्टी आपल्या पोस्टमध्ये सांगतात, 2011 साली ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्ली येथे देशातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी आणि एका मजबूत भ्रष्टाचारविरोधी कायद्याच्या निर्मितीसाठी म्हणजेच ‘जन लोकपाल विधेयक’ (Jan Lokpal Bill) संमत करावे या प्रमुख मागणीसाठी रामलीला मैदानावर आमरण उपोषण केले होते. मी त्यावेळेस लोकसभेचा सदस्य होतो. अण्णा हजारे यांनी केलेली मागणी मान्य करावी म्हणून विरोधी पक्षातील सुषमा स्वराज , अरूण जेटली , गोपीनाथ मुंडे , नितीन गडकरी,राजनाथसिंग, कम्युनिस्ट पक्षाचे (CPI-M) प्रकाश कारत, ए. बी. बर्धन, तेलुगु देशम पक्षाचे (TDP) चंद्राबाबू नायडू, आणि जनता दल युनायटेडचे (JD-U) शरद यादव या नेत्यांनीही संसदेत अण्णांच्या आंदोलनाचा जोरदार आवाज उठवला होता. 
      
गोपीनाथ मुंडे यांच्या निवासस्थानी मी आणि मुंडे साहेब बसलो असताना विलासराव देशमुख यांचा मुंडे साहेबांना फोन आला व आपण कुठे आहात मी आपणास भेटायला येणार आहे असे सांगून आंदोलनाच्या चौथ्या दिवशी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा निरोप घेऊन तत्कालीन मंत्री विलासराव देशमुख हे गोपीनाथ मुंडे यांच्या निवासस्थानी आले होते. जवळपास दीड ते दोन तास या आंदोलनाबाबत विलासराव देशमुख व गोपीनाथराव मुंडे यांची चर्चा होवून तत्कालीन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष व सध्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी दुरध्वनीवरून चर्चा करून दोन वेळा विलासराव देशमुखांनी त्याठिकाणाहून तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना फोन जोडून दिला. त्यानंतर पुढील आठ दिवस विलासराव देशमुख व गोपीनाथ मुंडे या दोघांनी समन्वयकाची भूमिका बजावली व सरकारने संसदेत जन लोकपालच्या प्रमुख मागण्यांवर ‘संसद संकल्प’ (Sense of the House) एकमताने मंजूर केल्यानंतर 28 ऑगस्ट 2011 रोजी आंदोलन संपले. त्यावेळेस अण्णा हजारे यांनी विलासराव देशमुख यांना “सृजन प्रशासक” एक सुसंस्कृत, शब्दाचा पक्का आणि जनभावना समजणारा नेता” म्हणून माध्यमांसमोर आदर व्यक्त केला. 
       
रॅमेन मॅगेसेस पुरस्कार घेतलेले सोनम वांगचुक आज 17 दिवस दिल्लीत उपोषण करत आहेत. मनमोहन सिंग यांच्यासारख्या संवेदनशील व विलासराव देशमुख यांच्यासारखे गुण असणारा एकही नेता भाजप पक्षात नाही व एकाही मंत्र्याने या उपोषणाची साधी दखलही घेतली नाही हे लोकशाहीचे दुर्दैव म्हणावे लागेल, असे म्हणत केंद्रातील सरकारने आंदोलनाची दखल न घेतल्याने राजू शेट्टींनी जुनी आठवण सांगत रोष व्यक्त केला आहे. 

सोनम वांगचुक यांनी देशातील नीट परिक्षेत सातत्याने होत असलेल्या पेपर फुटीमुळे  जवळपास 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, याची नैतिक जबाबदारी स्वीकारून मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी उपोषण करत आहेत. 21 विद्यार्थी आत्महत्या करूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाझर फुटत नाही . मोदी यांचा माणुसकीला काळिमा फासणारा ढोंगी व लबाड चेहरा हळूहळू जनतेसमोर येवू लागला आहे. भ्रष्टाचारविरोधी कायद्याच्या निर्मितीसाठी मोदींनी अण्णा हजारे यांच्या आंदोलनादरम्यान देशभर टाहो फोडला आणि सत्ता हस्तगत केली .याच मोदींनी देशातील सगळ्या भ्रष्ट राजकारण्यांना भाजपमध्ये घेऊन त्या सर्वांचा बाप होण्याचा विश्वविक्रम केला. सत्तेच्या सारीपाटावर “मन की बात “ करून सोज्वळपणा दाखवणारे पंतप्रधानांची सामान्य जनतेसाठी “अंदर की बात“ अत्यंत क्लेषदायक आहे, अशी टीका राजू शेट्टींनी केली.

तर देश तुम्हाला माफ करणार नाही

अजूनही वेळ गेलेली नाही केंद्रातील एखाद्या ज्येष्ठ मंत्र्याला पाठवून सोनम वांगचूक यांचे उपोषण थांबवावे. जर सोनम वांगचूक यांच्या जीवाला बरेवाईट झाल्यास रॅमेन मॅगेसेस पुरस्कार विजेता व्यक्तीचा हत्यारा म्हणून तुम्ही जगभर ओळखले जाल व देशाची जगभरात बेअब्रू होईल. दुर्दैवाने तसे झालेच तर मोदीजी देश तुम्हाला कधीच माफ करणार नाही, असेही राजू शेट्टींनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

हेही वाचा

राष्ट्रवादी काँग्रेस मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देणार असल्याच्या बातम्या निराधार, आमच्याकडे कोणतीही डील आलेली नाही: सुप्रिया सुळे



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *